हमीद दलवाई

Wednesday, February 1, 2012

'लाट'विषयी

'लाट' ह्या दलवाईंच्या कथासंग्रहाच्या तिसऱ्या आवृत्तीचं 'लोकसत्ता'च्या 'लोकरंग' पुरवणीत 'दखल' सदरात २० एप्रिल २००३ रोजी छापून आलेलं परिक्षण, केवळ संदर्भासाठी इथे -

पुरोगामी ललित लेखन

मीद दलवाई हे नाव पुरोगामी वैचारिक साहित्याशी निगडित आहे. पुरोगामी मुस्लीम सामाजिक चळवळींचे अध्वर्यू असणारे हमीद दलवाई यांचा ललित साहित्याच्या संदर्भात फारसा विचार होत नाही. वैचारिकता आणि लालित्य यांची एकमेकांपासून फारकतच असते, या गैरसमजुतीमधून हे होत असावे. हमीद दलवाई यांचे जे मोजकेच ललित लेखन आहे त्यातील 'लाट' या कथासंग्रहाची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली असून कसदार साहित्यनिर्मितीची सारी मूल्ये त्यात अनुभवास येतात.

लेखकाची वैचारिक भूमिका त्याच्या ललित लेखनातूनही जाणवतेच. जातिधर्माचे अडसर दूर सारू पाहणाऱ्या दलवाई यांनी धर्मनिरपेक्षपणे पात्रांच्या तोंडी प्रादेशिक भाषेचा वापर करवून सर्वधर्मसमभावाचाच पुरस्कार केला आहे. केवळ भाषाच नव्हे, तर रितिरिवाज, सामाजिक व सांस्कृतिक चालिरिती त्या विशिष्ट प्रदेशातील लोकांधमल्या धर्माच्या भेदालाही क्षीण करतात, याचा या कथा उत्तम पुरावा आहेत. दलवाईंसारख्या कार्यकर्त्या माणसाला हे जाणवावं, याचं मोल निश्चितच अधिक आहे. चाळीस वर्षांपूर्वीच्या समाजकारणात आजही बदल झालेला नाही. किंबहुना ते अधिकच बिघ़डले आहे. म्हणूनच ४० वर्षांपूर्वीच्या कथांना आजही वैचारिक मोल आहे.

'माणूस आणि गाढव' नावाची कथा कोण्या मुसलमानाची नव्हे तर कोकणी मनोवृत्तीचीच कथा सांगते. 'बेकार माणसाची गोष्ट'मध्ये एका भणंग कलावंताची चटका लावणारी कथा दलवाईंनी अप्रतिमपणे सांगितली आहे. 'पैसा असतो, त्या दिवशी मी थोडा दुःखी असतो', या पहिल्याच वाक्यानं काही वेगळं वाचायला मिळणार याची कल्पना येते. कलावंतपणाची कदर नसणाऱ्या व्यवहारी जगात कलावंताची होणारी होरपळ अत्यंत संयतपणे दलवाईंनी चित्रित केली आहे. 'मी लाचारीला, पर्यायानं सभ्यतेला चिकटून राहण्याचा निर्णय घेतो', अशा पद्धतीने दलवाई कथानायकावरच नव्हे तर आजच्या षंढ पांढरपेशेपणावरच बोट ठेवतात. 'छप्पर'सारखी कथा खास कार्यकर्त्या लेखकाने लिहिलेली गोष्ट आहे. दारिद्र्य आणि अज्ञान यांचं भय तळागाळात काम करणाऱ्याला जेवढं जाणवेल, त्याहून अधिक कोणाला जाणवू शकेल? 'कळ'ने तर गरीब-श्रीमंत, हिंदू-मुस्लीम, स्त्री-पुरुष साऱ्याच रेषा मिटवून टाकल्या आहेत. काळानुरूप नव्या संदर्भासह स्पष्टीकरण देऊ करणारे ते सकस साहित्य, अशी व्याख्या मांडली तर दलवाईंचे 'लाट' त्या व्याख्येला पुरेपूर उतरले आहे.
***
'लाट' - हमीद दलवाई, पहिली आवृत्ती १९६०, दुसरी आवृत्ती १९९०, तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशक मौज प्रकाशन गृह, मुंबई. पृष्ठे- १०९, मूल्य- १०० रुपये.

No comments:

Post a Comment

Followers

या कात्रणवहीसाठी माहितीसंकलन व टायपिंग, इत्यादी खटाटोप केलेल्या व्यक्तीनंच वरील वह्याही तयार केल्या आहेत. त्याच्या सुट्या वेगळ्या वहीसाठी पाहा: रेघ