हमीद दलवाई

Wednesday, February 1, 2012

'राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान'विषयी

दलवाईंच्या 'राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान' या 'साधना प्रकाशना'ने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे 'लोकसत्ता'मध्ये ५ जानेवारी २००३ रोजी प्रसिद्ध झालेलं परिक्षण-


मूळ पुस्तकाविषयी काही एक अंदाज यावा एवढाच हेतू हे परिक्षण ह्या ब्लॉगवर नोंदविण्यामागे आहे. बाकी सर्व श्रेय संबंधित लेखक व वृत्तपत्राकडे

***

आत्मटीकात्मक लेख

- एकनाथ साखळकर


ख्रिश्चन तसेच हिंदू धर्मीयांप्रमाणे मुस्लिम धर्मीयांतही आत्मटीकेच्या मार्गाने प्रबोधनाचे प्रवाह निर्माण व्हावेत यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये हमीद दलवाई यांचे नाव अग्रभागी आहे. प्रबोधनाच्या मार्गाने मुस्लिम समाजात विचारपरिवर्तन सुरु व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पैगंबरसाहेबांच्या कतरृत्वाबद्दल त्यांना आदर होता, परंतु पैगंबरसाहेबांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरु व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. त्यांच्या शेवटच्या आजारातही ते स्वस्थ राहिले नाहीत. त्या दिवसातही त्यांनी केलेले लेखन साधना प्रकाशनाने संपादित करुन 'राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान' या नावाने प्रकाशित केले आहे. हे लेखन प्रामुख्याने भारतीय उपखंडातील मुसल-मानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलामागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यासंबंधीचे विवेचन वाचल्यानंतर दलवाई यांच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना यावी. समाजप्रबोधनाचे कार्य करणार्‍या कोणाही द्रष्ट्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध त्यांना झाला.
''भारतीय इस्लामचे स्वरुप, भारतात इस्लामचे आगमन ज्या प्रकारे झाले... त्या संदर्भात समजून घेतले पाहिजे. इस्लामचे आगमन हिंसक पद्धतीने झाले... मुसलमान जेथे जेथे विजेते म्हणून गेले तेथील बहुसंख्य किंवा सगळीच्या सगळी प्रजा कालांतराने मुसलमान बनली.'' इस्लाम धर्माच्या स्थापनेच्या इतिहासामुळे अन्य काही होणे नव्हते. ''प्रेषित महमद हे इस्लामचे केवळ धर्मसंस्थापक नसून राज्य-संस्थापकही आहेत. मदिनेतही त्यांनी धर्म-प्रसाराचेच कार्य केले नाही, तर त्यांनी राज्यही स्थापन केले.'' असा इतिहास सांगत दलवाईंनी भारतातील मुसलमानांच्या तसेच त्यांच्या धार्मिक, राजकीय नेत्यांच्या दृष्टीसंबंधी विवेचन केले आहे.
मुसलमानांच्या धार्मिक चळवळीच्या संदर्भातही त्यांनी मतप्रदर्शन केले आहे. ''अरबस्तानात बिगरमुसलमान नसल्याने तेथील चळवळींचे स्वरुप समाजांतर्गत राहिले.'' भारतात मात्र ''येथील राज्यसत्ता आणि बहुसंख्याक हिंदू समाज यांच्या-विरोधी पवित्रा चळवळीने घेतला.'' येथे स्वातंत्र्यासाठीची चळवळ जेव्हा जोर घेऊ लागली तेव्हाही मुसलमानांचे हेच स्वरुप पुढे आले. १९३७ च्या निवडणुकीत एकूण मुस्लिम मतांपैकी केवळ ४.४ टकके मते मुस्लिम लीगला मिळाली. ते कोठेही सत्तेत येणे शकयच नव्हते. तरीही नेहरुंनी त्यांना सत्तेत सहभागी करुन न घेतल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला, अशी ओरड त्यांनी केली. दलवाईंच्या मते ''लीगची भूमिका न्याय्य होती, आसे फक्त मुसलमानच मानतात आणि आपली कुठलीही मागणी न्याय्यच असते, असे मानण्याच्या त्यांच्या परंपरेला हे धरुनच आहे.'' त्यानंतर ''जीनांनी कॉंग्रेसविरुद्ध गलिच्छ जातीय प्रचाराला सुरुवात केली.'' पुढे ''नाइलाजाने छोट्या आकाराचे पाकिस्तान स्वीकारल्यानंतर वरकरणी जीनांनी मित्र म्हणून आपण वेगळे होत आहोत,'' असे निवेदन केले. त्याचबरोबर ''मोठया पाकिस्तानच्या निर्मितीसाठी भारताशी संघर्ष कायम ठेवण्याच्या तयारीला ते लागले.'' 'भारत-पाक संबंध' तसेच 'पाकिस्तानची उद्दिष्टे' या दोन लेखांत पाकिस्तानने जीनांचे धोरण कसे चालू ठेवले आहे, याचे विवेचन आहे. ''वरवर भारताबरोबर मैत्रीचे संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करणारी निवेदने करायची.. आणि सन्माननीय पातळीवर भारत तडजोड करायला तयार नाही म्हणून वाद पुढे चालू आहे असे भासवायचे हे पाकिस्तानी राजनीतीचे प्रमुख सूत्र होते व आहे.'' हे सांगून दलवाई म्हणतात की, ''हे वर्तन 'हिटलरचे वर्तन आणि सदिच्छेची निवेदने' यासारखे आहे.''
मुस्लिम समाजात प्रबोधनपर्व सुरु झाल्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य सुकर होणार नाही अशी दलवाईंची खात्री होती. ख्रिश्चन समाजातील मार्टिन ल्युथरच्या सुधारणांमुळे आणि झंझावती प्रबोधनयुगामुळे युरोपीय समाज आमूलाग्र बदलला आणि तेथे आधुनिकतेचे मोकळे वारे वाहू लागले. भारतातील हिंदू समाजातही तेराव्या शतकात बहुजनवादी संतपरंपरा निर्माण झाली आणि समाज बदलला. मुस्लिम समाजाने मात्र प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला नाही. दलवाईंच्या मते मुस्लिम समाजाने स्वत्व टिकवून व आपल्यात प्रबोधन घडवून राष्ट्रीय ऐक्याची कास धरण्याची गरज आहे. ते अवघड आहे हे त्यांना माहीत होते. मुस्लिम मन कुराण, हदीस, पैगंबराचे जीवन व इस्लामिक परंपरा यांच्या आधारेच बनते. या शब्दप्रामाण्याच्या व धर्मांधतेच्या विळख्यातून मुस्लिम मन मुक्त करण्याचा त्यांनी निकराचा प्रयत्न केला. मुस्लिम समाज उदारमतवादी व धर्मनिरपेक्ष मुस्लिम नेत्यांकडे ढुंकूनही पाहत नाही, मुस्लिम समाजात गांधींसारखी मानवतावादी व्यक्ती निर्माण झाली नाही याचेही दलवाईंना दु:ख आहे.
दलवाई निराशावादी नाहीत. ''एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जातीयवादी शक्तींचे संघटन होत नाही हे लक्षात आले की आपोआपच योग्य ते राजकीय प्रवाह मुस्लिम समाजात दिसू लागतील.'' आसे ते लिहितात. योग्य टीका करुन मुस्लिम मन बदलू शकते, याचा त्यांना विश्वास वाटतो. मुस्लिम मन कायम सनातन्यांच्या पकडीत बंदिस्त राहील असे त्यांना वाटत नाही.
पुस्तकामध्ये ज्या विषयांची चर्चा झाली आहे त्यात आता बराच फरक पडला आहे तरीही दलवाईंनी मांडलेले विचार मूलभूत स्वरुपाचे असल्याने ते आजही महत्त्वाचे वाटावेत. पुस्तकाला भाई वैद्यांची उत्कृष्ट प्रस्तावना आहे.

No comments:

Post a Comment

Followers

या कात्रणवहीसाठी माहितीसंकलन व टायपिंग, इत्यादी खटाटोप केलेल्या व्यक्तीनंच वरील वह्याही तयार केल्या आहेत. त्याच्या सुट्या वेगळ्या वहीसाठी पाहा: रेघ