हमीद दलवाई

Tuesday, February 7, 2012

हमीद दलवाईंविषयी सदानंद रेगे

लेखक-कवी सदानंद रेगे (१९२३-१९८२) हे हमीद दलवाईंचे जवळचे मित्र. रेग्यांसंबंधी ‘अक्षरगंधर्व’ नावाचं एक पुस्तक ‘पॉप्युलर प्रकाशना’ने काढलं. प्र. श्री. नेरूरकरांनी रेग्यांची घेतलेली एक मोठी मुलाखत या पुस्तकात आहे. या खेळीमेळीतल्या संवादासारख्या रूपातल्या मुलाखतीवेळी शरद मंत्रीसुद्धा आहेत. ह्या मुलाखती थोड्या भागात दलवाईंबद्दल बोलणं झालंय. तो भाग ह्या ब्लॉगमध्ये बसणारा आणि दलवाईंबद्दल काही गोष्टी उलगडणारा असल्यामुळे इथे देतो आहे-


रेगे – हमीद हा मला ‘सत्यकथे’च्या ऑफिसमध्ये भेटायचा. तिथे ओळख झाली. त्यावेळेला त्याचे दिवस अतिशय वाईट होते. कुठे नोकरी नव्हती. काम नव्हतं. योगायोगाने तोही रेल्वेत आमच्याबरोबर नोकरीला लागला. स्टोअर्स डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लागला...
नेरूरकर- त्या दिवशी तू, मी व हमीद एकत्र होतो... (सदानंद रेगेची आई निवर्तली त्या दिवशी)
रेगे- नेहमी यायचा ना तो माझ्याकडे...
नेरूरकर- किती वर्षे त्याने नोकरी केली?
रेगे- वर्षभर असेल... त्या नोकरीत तो रमत नसे. पण काही इलाजच नव्हता. नुक्तं मला वाटतं त्याने लग्न केलं. ती बातमीसुद्ध मला माहिती नव्हती. तसा तो यायचा माझ्याकडे... रेल्वेच्या ऑफिसमध्ये. तो लघुकथा लिहित असे. मीही लिहीत असे. पुढे त्याची माझी दोस्ती जमत गेली... त्याचा पहिला लघुकथासंग्रह मीच एडिट केला आहे.
नेरूरकर- खरं का?
रेगे- मला विचारून विचारून त्याने कथा संग्रहात घातल्या. मला तो मानतही असे. त्याच्याजवळ छक्केपंजे नव्हते. म्हणजे त्याचं माझं जमायचं म्हटलं ना. छक्केपंजे नव्हते. काय असेल ते खुल्लमखुल्ला. याला शिव्या दे. त्याला शिव्या दे. पुढे ‘मराठा’मध्ये त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्याने हिंदुमुस्लीम प्रश्नावर लेख लिहिले... अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंनी त्याला बोलावून घेतला. मग पाकिस्तानवर लिहिण्याचा विषय आला. तेव्हा तो म्हणाला, मला तो देश बघावा लागेल. पण माझ्याजवळ पैसे कुठे आहेत? मग अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी त्याची सगळी व्यवस्था केली. तो पाकिस्तानात जाऊन आला आणि मग राजकारणात ओढला गेला. पण इतका मोठा झाल्यानंतरसुद्धा नंतर त्याची माझी भेट नव्हती.
... कित्येक वर्षे त्याची माझी बेट नव्हती. सगळं प्रकरण चालू असेपर्यंत अधूनमधून कुठे भेटला तर भेटायचा. पुढे त्याचं ते किडनीचं प्रकरण सुरू झालं. पहिल्यांदा त्याला अल्सर झालाय म्हणून कित्येक वर्षे ट्रीटमेंट त्याला त्याच्या फॅमिली डॉक्टरने दिली. आणि एके दिवशी त्याला तो किडनी ट्रबल आहे असं ठरलं. त्याला भाटिया हॉस्पिटलात नेला. तर तो भाटिया हॉस्पिटलात असतानासुद्धा शेवटी मग मी काही जाऊ शकलो नाही. एक दिवस गेलो तिथे. तर तो अत्यवस्थच होता. त्याची किडनी काढून टाकायची की नाही असा विचार चालू होता. असं ते प्रकरण चालू होतं त्यावेळेला.
मंत्री- त्यावेळी मला आठवतंय... त्याची बायकोसुद्धा म्हणाली, तुम्ही येत जा हो. कारण तुमच्याकडेच आलं की ते बोलतात... तुम्ही रोज येत जा.
नेरूरकर- सदूला म्हणाली?
मंत्री- हो.
रेगे- तर... नंतरही मी गेलो नाही. कारण मी फोर्टमध्ये असायचो. बसबिस मिळायची नाही. मग ते राहात गेलं ते राहात गेलं आणि जसलोकमध्ये तो गेला आणि त्याची ती किडनीबिडनी बसवायची ते सगळं चालू होतं. तरीसुद्धा मी गेलो नाही त्याला बघायला. एक दिवस कसा कसा गेलो... आणि त्याचं ते सगळे प्रकरण... दारूवाल्याची किडनी बसवणं... गाजलं होतं ते सगळं प्रकरण.
... तरीसुद्धा मी त्याला भेटायला गेलो नाही. आणि एक दिवस असा मी लायब्ररीत (डेव्हिड ससून लायब्ररीत) बसलो होतो... फोर्टमध्ये ती जागा... जिथे आम्ही दारू प्यायला बसत होतो... तिथले मालक म्हणाले, ‘दलवाई येऊन गेले’. मी विचारलं, ‘तुम्ही बरोबर ओळखलं होतं का?’ ‘दलवाईंना काय मी ओळखत नाही!’ ते म्हणाले, ‘आले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्या लायब्ररीत भेटतो म्हणून सांगितलंय.’ दुसऱ्या दिवशी मी वाट बघत बसलो. तो लायब्ररीमध्ये आला. म्हणाला, ‘मला डिसचार्ज दिलाय. किडनी बसवलीय. आता माझं व्यवस्थित आहे’ आणि मग मी शेवटी त्याला बघितल्यावर मी त्याच्या पायावरच पडलो. अगदी म्हटलं, ‘पहिल्यांदा तू पायातला जोडा काढ आणि माझ्या थोबाडीत मार. मला लाज वाटायला पाहिजे होती की तू इतका सिरियस आजारी असताना तुला बघायलासुद्धा मी येऊ शकलो नाही किंवा मला इच्छा झाली नाही. अगदी जन्माचा पश्चाताप होतोय.’ ‘अ, जाऊ दे’, म्हणाला. काय सगळं असंच असतं. अशा तऱ्हेने त्याने ते नेलं. आणि त्याच्यानंतर रोज तो मला भेटायला लागला. लायब्ररीत येऊन बसायचा. त्याचे सगळे लोक तिथेच त्याला भेटायला यायचे. त्याची माझी फार मग शेवटच्या दिवसापर्यंत फार जवळीक आली.
त्याचे प्रश्न, त्याच्या समस्या, आम्ही तासन् तास चर्चा करीत असू..
नेरूरकर- प्रश्न म्हणजे काय?
रेगे- राजकारण, सत्यशोधक समाज..
नेरूरकर- मुस्लीम सत्यशोधक समाज?.. त्यात तू काय केलीस त्याला मदत?
रेगे- नाही. तो चर्चा वगैरे करायचा.

No comments:

Post a Comment

Followers

या कात्रणवहीसाठी माहितीसंकलन व टायपिंग, इत्यादी खटाटोप केलेल्या व्यक्तीनंच वरील वह्याही तयार केल्या आहेत. त्याच्या सुट्या वेगळ्या वहीसाठी पाहा: रेघ