हमीद दलवाई

Monday, January 30, 2012

हमीद दलवाई यांचा परिचय

शमसुद्दिन तांबोळी यांनी संपादित केलेल्या ‘हमीद दलवाई - क्रांतिकारी विचारवंत’ या पुस्तकातून, त्यांच्या परवानगीने- 


मीदभाईंचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ला रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील मिरजोळी या गावी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये झाले व १९५१ साली ते मॅट्रिक झाले. मुंबईच्या इस्माईल युसुफ महाविद्यालय व रूपारेल महाविद्यालयात त्यांनी इंटरमिडीएट आर्ट्सपर्यंतचे शिक्षण घेतले ते १९५४ ते १९६३ पर्यंत काही किरकोळ नोकऱ्या करत राहिले. या काळापूर्वीपासून ते राष्ट्रसेवा दल व समाजवादी पक्षातर्फे राजकीय व सांस्कृतिक कार्य करीतच होते. दरम्यान, हमीदभाईंनी ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘वसुधा’ आदी नियतकालिकांतून कथालेखन चालू ठेवले होते. ‘लाट’ हा त्यांचा एकमेव कथासंग्रह १९६० साली साधना प्रकाशनाने काढला. ‘मौज’तर्फे ‘इंधन’ ही त्यांची एकमेव कादंबरी १९६६ साली प्रसिद्ध झाली. ही कादंबरी व काही कथांना मुस्लीम समाजाची पार्श्वभूमी होती. ‘कफनचोर’ या कथेमुळे हमीदभाई सर्जनशील लेखक म्हणून प्रसिद्धीस आले. ‘इंधन’ या आत्मकथनपर कादंबरीत कोकणातील एका गावात स्वातंत्र्योत्तर काळात वातावरण कसे बदलत गेले; हिंदू-मुसलमान तणाव कसा वाढत गेला; इरेस पेटलेल्या दोन्हीकडच्या लोकांनी गावचे एरवीचे वातावरण कसे ढवळून काढले, याचे तरल, संवेदनशील आणि वास्तव चित्रण आहे.

या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचे १९६६ सालचे पारितोषिक मिळाले. सामान्य वाचक व समीक्षक यांना सारख्याच आवडणाऱ्या या कादंबरीने चिपळुणात मात्र लोकक्षोभाला तोंड दिले. हिंदीमध्ये ही कादंबरी याच नावाने भाषांतरित आहे.

दलवाईंनी ‘मराठा’त १९६३ के १९६८ या काळात पत्रकारिता केली. १९६८नंतर मुस्लीम समाजसुधारणेचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. त्यांचे साहित्यलेखनही थांबले. मराठी भाषेने एक सर्जनशील, वास्तवावादी लेखक गमावला; पण मुस्लीम समाजसुधारणेच्या महत्त्वपूर्ण कामासाठी दिले गेलेले साहित्यिकाचे बलिदान वाया गेले नाही.

मुस्लीम स्त्रीची दयनीय अवस्था आणि दर्जा सुधारण्यासाठी योग्य त्या कायद्याच्या मागणीसाठी हमीदभाईंनी मुंबई येथे कौन्सिल हॉलवर सात मुस्लीम स्त्रियांचा मोर्चा १८ एप्रिल १९६६ रोजी नेला. हा मोर्चा पुढे होणाऱ्या मुस्लीम प्रबोधनवादी चळवळीची नांदी ठरला. मुस्लीम स्त्रीची शोचनीय स्थिती सुधारून समाजांतर्गत स्त्री-स्त्री समानता व धर्मांतर्गत स्त्री-पुरुष समानता हा दलवाईंच्या विचारसरणीचा गाभा होता. इस्लाम व इस्लामची ऐतिहासिक परंपरा यांची इहवादी चिकित्सा हा त्यांच्या विचारप्रक्रियेचा केंद्रबिंदू होता.

भारतीय मुस्लीम समाजाचे वास्तविक आकलन करून घेण्यासाठी हमीदभाई भारतभर फिरले. या त्यांच्या दौऱ्यासाठी ‘इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रिडम’, ‘आंतरभारती’, कोल्हापूरचा कोरगांवकर ट्रस्ट, ‘सेक्युलर फोरम’, ‘मराठा’, ‘मौज’ वगैरेंनी सर्वतोपरी साहाय्य केले.

भारतभर पसरलेले मुसलमान हे वेगवेगळ्या विचारसरणीचे, विविध व्यक्तिमत्त्वांचे आहेत व मुसलमान समाज संघटित असल्याच्या तथाकथित मुस्लीम नेतृत्त्वाचा दावा फोल आहे, असे या दौऱ्यानंतर हमीदभाईंचे मत बनले. त्यांनी आपली विश्लेषणे, विचारप्रणाली व भूमिका स्पष्टपणे मांडावयास सुरुवात केली. भारतात बहुसंख्याक असलेल्या हिंदूंना दलवाईंचे सांगणे असे, ‘ज्या हिंदूंनी मुस्लीम जातीयवादाचा प्रतिकार करायचा आहे, ते हिंदूंना सनातनी बनविण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ज्या हिंदूंना हिंदू समाजाला आणि पर्यायाने देशाला आधुनिकतेच्या रस्त्याने न्यायचे आहे ते मुस्लीम जातीयवाद्यांना मिठ्या मारीत आहे. हे दृश्य बदलले पाहिजे. मुस्लीम जातीयवादाचा प्रतिकार करणाऱ्या हिंदूंच्या मी बाजूचा आहे, पण हिंदूंना सनातनी बनविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा मी विरोधक आहे. त्याचबरोबर हिंदूंना आधुनिक बनवणाऱ्यांना माझा पाठिंबा आहे. मुस्लीम जातीयवादाचा प्रतिकार न करण्याच्या त्यांच्या धोरणाचा मी विरोधक आहे.’

हमीदभाई एक लोकशाही समाजवादी कार्यकर्ता होते. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण व काही प्रमाणात महात्मा गांधींचा त्यांच्यावर प्रभाव होता. एकंदर भारतीय समाजात व विशेषतः भारतीय मुस्लिमांत जी धर्म आणि राजकारण यांची गल्लत झाली आहे, तिच्यावर प्रहार करून त्या दोहोंची फारकत दलवाईंना अभिप्रेत होती. याशिवाय सध्याच्या मुस्लीम जातीयवादाला भारतातील सर्वच राजकीय पक्ष कारणीभूत आहेत, त्यांनीच मतांच्या राजकारणापायी मुस्लिमांचा जातीयवाद अप्रत्यक्षपणे पोसला आहे, असा विचार हमीदभाईंनी मांडला. देशातील राजकीय पक्षांना मुस्लीम अनुनय सोडण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी वारंवार केले.

धर्मातीतता, धर्मनिरपेक्षता, इहवाद या प्रतिशब्दांनी परिचित असलेले ‘सेक्युलॅरिझम’ हे मूल्य हमीदभाईंना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीयत्व, विज्ञाननिष्ठा आदी आधुनिक जागतिक मूल्यांइतकेच महत्त्वाचे वाटत होते आणि ‘सेक्युलॅरिझ’ मुस्लीम समाजाच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनात वागवणे त्यांना आपल्या कामाच्या दृष्टीने अत्याधिक आवश्यक वाटे. त्यांनी काढलेल्या पहिल्याच मोर्चापासून स्त्रियांना हक्क मिळवून देऊन स्त्रीमुक्तीच्या मार्गाने स्त्री-पुरुष समानता साधणे हे तर दलवाईंचे मिशन होते. मुस्लीम स्त्रीला तिच्या धर्मात व समाजात दुय्यम व अन्यायी स्थान आहेच, पण भारतातील प्रचलित कायद्यानुसार हिंदू स्त्रीइतकेही तिला अधिकार नाहीत. दलवाईंनी व नंतर मुस्लीम सत्यशोधक मंडळाने घेतलेले बरेच कार्यक्रम या विचारमालिकेशी संबंधित होते आणि तलाकपीडित स्त्रियांना पोटगी मिळवून देण्यासाठी झगडा उभारून केलेले विधायक कामही.

हे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी लेख, भाषणे, जाहीर सभा यांद्वारे दलवाईंनी एक मोहीमच काढली. ‘साधना ट्रस्ट’तर्फे आपल्या विचारांची व त्यांना जोड देणाऱ्या अनुभवांची मांडणी करणारी तीन भाषणे दिली. याशिवाय आपल्या विचारांच्या तरुणांशी संपर्क साधण्यासाठी त्यांनी अ. भि. शहांच्या बरोबरीने इंडियन सेक्युलर सोसायटी १९६८ साली मुंबईत स्थापन केली, परंतु त्यानंतर दोन वर्षांपर्यंत स्वतः दलवाईंखेरीज एकही मुस्लीम त्या सोसायटीकडे न फिरकल्याने दलवाई निराश झाले. दरम्यान, त्यांनी भाषणे देणे, प्रसारमाध्यमांत लेख लिहिणे, दौरे आदी चालूच ठेवले. पुणे, कोल्हापूर, बेळगाव या शहरांत आणि गडहिंग्लज, निपाणी, आजरा, उत्तूर, संकेश्वर, कुरुंदवाड या ग्रामीण भागात राष्ट्रसेवा दलातर्फे त्यांचा एह महत्त्वाचा दौरा आयोजित केला गेला. भाषणे, सभा, चर्चा इत्यादी मार्गाने मुस्लीम तरुणांशी आपल्या विचारसरणीबाबत व त्यांची प्रतिक्रिया आजमावण्यासाठी ते संवाद साधत.

अ. भि. शहा, यदुनाथ थत्ते, नरहर कुरुंदकर, प्रा. असफ ए. ए. फैजी, डॉ. मोईन शाकीर आदींबरोबरच भाई वैद्य व डॉ. बाबा आढाव या समविचारी मंडळींनी हमीदभाईंना त्यांच्या कामात साहाय्य केले. वैद्य व आढाव यांना हमीदभाईंच्या विचारांना प्रतिसाद देतील असे पुण्यातील काही मुस्लीम तरुण परिचित होते. सय्यदभाई, मुनीर सय्यद, अमीर शेख, अन्वर शेख, रफीऊद्दीन सय्यद, बशीर तांबोळी, मकबूल तांबोळी आदी तरुणांशी हमीदभाईंचा परिचय करून दिला. कोल्हापूरच्या हुसेन जमादारांचा कोल्हापूर दौऱ्यात परिचय झाला होताच. एन. आर. बारगीर, महंमदगौस नाईक, आय. एन. बेग व मुमताज रहिमतपुरे ही मंडळी जमादारांबरोबर होती. अशा प्रकारे पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, मुंबई, सातारा येथील या सर्व तरुणांशी एकत्रित चर्चा झाल्यावर मुस्लिमांसाठी, मुस्लिमांची अशी एखादी संघटना काढण्याची हमीदभाईंना गरज वाटू लागली व पुढे सुमारे दीड वर्ष चर्चा होऊन मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली.

हमीदभाईंना मुस्लीम सत्यशोधक चळवळीसाठी १९६६ ते १९७७ अशी उणीपुरी अकरा वर्षे देता आहे. नवी दिल्लीची ऑल इंडिया कॉन्फरन्स फॉर फॉरवर्ड लुकींग मुस्लिम्स, पुण्याची महाराष्ट्र राज्य मुस्लीम महिला परिषद, मुंबईची मुस्लीम सामाजिक परिषद व कोल्हापूरची मुस्लीम शिक्षण परिषद असे काही ठळक कार्यक्रम हमीदभाईंनी मंडळाद्वारे आयोजित केले व यशस्वी करून दाखवले. त्यांनी फार मोजकेच लेखन केले. ‘मुस्लीम जातीयतेचे स्वरूप – कारणे व उपाय’, ‘इस्लामचे भारतीय चित्र’ व ‘मुस्लीम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया’ हे इंग्रजी भाषेतील पुस्तक यांचा त्यांच्या लेखनसंग्रहात समावेश होतो. याशिवाय आपल्या विचारांच्या प्रचारासाठी व त्या त्या काळात घडणाऱ्या मुस्लीम समाजसंदर्भातील घटनांवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध विषयांवर अनेक लेख त्यांनी लिहिले व व्याख्याने दिली. हे लेख ‘क्वेस्ट’, ‘सेक्युलॅरिस्ट’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इंडियन एक्सप्रेस’ आदी इंग्रजी व ‘मराठा’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘साधना’ आदी मराठी प्रकाशनांत लिहिले.

हमीदभाईंनी मुस्लीम राजकारणावर टीका केल्याने चिडलेल्या मुस्लीम जातीयवादी नेतृत्वाने इस्लामविरोधक, काफीर, हिंदूंचा एजंट वगैरे विशेषणे लावून त्यांच्या बदनामीची मोहीमच आखली होती. धमक्या तर नेहमीच्याच, पण त्यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्नही झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही पुणे व मुंबई महापालिकेत मुस्लीम नगरसेवकांनी दलवाईंना श्रद्धांजली वाहण्यास विरोध केला. नरहर कुरुंदकर म्हणतात, ‘दलवाईंच्या कार्यातील अडचणी लक्षात घेता खऱ्या आश्चर्यकारक गोष्टी दोन आहेत : पहिली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना आजारी पडून मरण्याची संधी मिळाली, त्यांना हुतात्मा व्हावे लागले नाही. त्याहून अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेराशे वर्षांच्या परंपरेविरुद्ध बंड करणाऱ्या या बंडखोराला पाहता पाहता तीन-चारशे अनुयायी मिळाले.’

हमीदभाईंचा अंत ३ मे १९७७ या दिवशी झाला. त्यापूर्वी दीर्घकाळ ते किडनीच्या विकाराने आजारी होते. हमीदभाईंची अंतिम इच्छा नमूद करण्यासारखी आहे, ‘माझ्या मृत्यूनंतर माझे शव माझ्या गावी नेऊ नये, विद्युतदाहिनीत माझ्या शवाचे दहन करावे. मुसलमान किंवा हिंदू पद्धतीने कोणताही धार्मिक संस्कार अगर श्रद्धांजलीची भाषणे करून नयेत. निरिश्वरवादी म्हणून मी जगलो व निरिश्वरवादी म्हणून मला मरायचे आहे. माझे स्मारक उभारू नयेत. या देशात ‘इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट’ स्थापन व्हावी ही माझी आवडती इच्छा. काही खासगी व निमसरकारी यंत्रणांनी चालविलेल्या काही संस्था आहेत, पण त्यांच्या कामाने माझे समाधान झालेले नाही. इस्लाम व त्याची संस्कृती सुधारू इच्छिणाऱ्या माझ्या मित्रांशी अशी संस्था स्थापन करावी. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय अशा मूलभूत चळवळीचे तसेच शहरी चळवळीचे प्रतिबिंब या संशोधनात दिसले पाहिजे. इस्लामच्या समस्यांना वाहिलेले एक नियतकालिकही त्या संस्थेने सुरू करावे. जगातील इस्लामिक चळवळीची दखल या नियतकालिकाने घ्यावी. मी सुखाने जगलो. माझी आता कोणाहीविरुद्ध तक्रार नाही. माझ्याशी ज्यांचे मतभेद होते, त्यांच्याशी मी झगडलो. पण माझा कोणाहीविरुद्ध आकस नाही. म्हणून त्यांच्याशीही वैयक्तिक संबंध ठेवण्याचा मी यत्न केला.’

धर्माविषयी दलवाईंची भूमिका वेगळी व टोकाची होती, हे या अंतिम इच्छेसंदर्भात नमूद करणे आवश्यक आहे. आपण मुसलमान आहोत म्हणून आपल्या समाजातील दोषांचे दिग्दर्शन करून ते सुधारणे हे आपले पहिले कर्तव्य आहे, असा दलवाईंचा आग्रह होता. ‘धर्म ही खासगी बाब’ मानणारे दलवाई नास्तिक निरिश्वरवादी होते, पण आपली ही भूमिका त्यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळावर अथवा कार्यकर्त्यांवर लादायचा पुसटसा प्रयत्नही कधी केला नाही. नास्तिकता ही दलवाईंची वैयक्तिक भूमिका होती, पण मंडळाची नास्तिकतेची भूमिका कधीही नव्हती व नाही.

No comments:

Post a Comment

Followers

या कात्रणवहीसाठी माहितीसंकलन व टायपिंग, इत्यादी खटाटोप केलेल्या व्यक्तीनंच वरील वह्याही तयार केल्या आहेत. त्याच्या सुट्या वेगळ्या वहीसाठी पाहा: रेघ