हमीद दलवाई

Wednesday, September 15, 2021

हमीदनंतर...

- मेहरुन्नीसा दलवाई

 हमीद दलवाईंचे व माझे एक मित्र श्रीकृष्ण व्यवहारे यांनी त्यांच्या संस्थेमार्फत ठाणे येथे मुसलमानांच्या प्रश्नावर व्याख्यान देण्याकरता गेल्या वर्षी बोलावले होते. व्याख्यानानंतर काही प्रश्नोत्तरे झाली. एक प्रश्न होता- मुसलमान समाजातील तुम्ही अतिअल्पसंख्य. तुमच्या पाठीशी समाज नाही यावरून तुमची काही धोरणे चुकत आहेत, असे तुम्हाला वाटत नाही का? प्रश्न विचारणारे गृहस्थ हिंदू होते आणि म्हणून क्षणभर मला या प्रश्नाचे आश्चर्य वाटले. तुमच्या पाठी मुसलमान समाज नाही, तुमचे विचार तुम्ही हिंदूंपुढे मांडता वगैरे आरोप हमीद दलवाईंवर बऱ्याच ठिकाणी केले जात आणि असे आरोप करणारे केवळ मुसलमानच होते. कोणा हिंदूने तुमच्या पाठीशी समाज नाही म्हणून तुमचे विचार चुकीचे आहेत, असे दलवाईंना सांगितल्याचे माझ्या ऐकिवात नाही. म्हणून मला विचारल्या गेलेल्या प्रश्नाने मी थोडीशी चकित झाले. तरीसुद्धा या प्रश्नाचे उत्तर माझ्यासमोर स्पष्ट होते आणि ते येथे मुद्दाम नमूद करण्यासारखे आहे.

मी म्हणाले, ‘‘महत्त्वाची गोष्ट ही आहे की, प्रबोधनाची संघटना किंवा चळवळ ही विचारांवर वाढणारी संघटना आहे, संख्येवर नाही. विचार हे या चळवळीचे प्रमुख अधिष्ठान आहे. या विचारामागे काही निश्चित निष्ठांच्या प्रेरणा आहेत. विचार जर बरोबर असेल, तर या विचारामागे संख्या किती, हा मुद्दा माझ्या दृष्टीने गौण आहे. दुसरे असे की, सामाजिक सुधारणेचा विचार हा काळाच्या नेहमी दोन पाऊले पुढे असतो आणि इस्लाम धर्माच्या संदर्भात हमीद दलवाई व मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या धोरणांचा विचार केला तर, तो बराच शतकं पुढे आहे, असं मला वाटतं. आणि तो कितीही पुढे असला आणि आमची संख्या कितीही कमी असली, तरी तो गाठत राहणं हे देशहिताच्या दृष्टीने, मुसलमान समाजाच्या हिताच्या दृष्टीने आमचं कर्तव्य मानतो. हे आधुनिक विचार मुसलमान समाजाने स्वीकारले नाहीत, आत्मसात केले नाहीत; तर या समाजाला या देशात  भवितव्य नाहीच, पण सामाजिक तणाव यामुळे अधिक वाढतील आणि दोन समाजांतील दुरावा वाढेल. वैमनस्यही वाढेल. तिसरे असे की- ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाकडून आपण आपल्या जीवनामध्ये बरंच काही घेतो; पण त्याची परतफेड आपण करत नाही. प्रत्येकाने आपल्या शक्तीनुसार ही परतफेड केली, तर समाजजीवन अधिक संपन्न आणि सुदृढ होईल. आमचं कार्य हे देणं देण्याच्या स्वरूपातीलही आहे.’’

माझ्या या उत्तरानं पुढचा प्रश्न त्यांनी विचारला नाही. हमीद दलवाईंच्या निधनानंतर मी प्रा. अ. भि. शहांकडे महिनाभर राहिले, त्या काळातच मी माझ्या या विचाराची दिशा ठरवलेली. वाचन, वाचनातून चिंतन, चिंतनातून प्रबोधन आणि या प्रबोधनातून सामाजिक सुधारणेकडे जाण्याची वाट मी ठरवली. अर्थात, हे ठरवण्यामागे यशापयशाची कुठलीही चिंता नव्हती. जो समाज 1400 वर्षे एका बंदिस्त विचारप्रणालीला बांधला गेलेला आहे; तो माझ्या प्रयत्नाने प्रबोधनाच्या चळवळीत सामील होईल, त्यात साथ देईल व सामाजिक सुधारणेकडे झटपट वाटचाल करायला तयार होईल, हा विचार करण्याइतकी हमीद दलवाईंच्या सहवासात राहून मी स्वप्नाळू राहिले नव्हते. दलवाईंनी आपल्या निधनापूर्वीच्या काही वर्षांमध्ये या कार्याला वाहून घेतलेल्या बऱ्याच कार्यकर्त्यांची एक संघटना महाराष्ट्रात उभारली होती आणि त्यांची बांधिलकी दलवाईंच्या विचारांशी व मंडळाच्या ध्येय-धोरणांशी पक्की होती. दलवाईंचे विचार पुढे नेण्याकरता हे सर्व कार्यकर्ते झटतील, अशी मला आशा होती. ती कमी- अधिक प्रमाणात फलद्रूपही झाली आहे.

हमीद दलवाईंच्या निधनापूर्वी मी फारसं स्टेजवर येणं पसंत केलं नव्हतं. त्यांनी आयोजित केलेल्या बहुतेक सभासंम्मेलनांना मी उपस्थित असायची आणि काही मदतही करायची. द्विभार्याप्रतिबंधक कायद्याच्या मागणीसाठी, समान नागरी कायद्याच्या मागणीसाठी त्यांनी एप्रिल 1966 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर आयोजित केलेल्या मोर्चांत माझा सहभाग होता आणि त्याच्यानंतरही मुंबईत आयोजित केलेल्या काही मोर्चांत माझा क्रियाशील सहभाग असायचा. पण व्यासपीठावर येण्याचा प्रसंग मराठा मंदिरमध्ये आयोजित केलेल्या मुस्लिम सामाजिक परिषदेचा अपवाद वगळल्यास आला नव्हता, तो त्यांच्या निधनानंतर आला; अमरावतीमध्ये विदर्भातील मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संघटक शेख वजीर पटेल यांनी डिसेंबर 1977 मध्ये आयोजित केलेल्या मुस्लिम घटस्फोटित महिलांच्या परिषदेत. या परिषदेला 300 हून अधिक महिला हजर होत्या आणि त्यांचे अनुभवकथन शेवटी वजीर पटेल यांना आवरावे लागले. या बायकांना बोलण्याची संधीच मिळाली नव्हती. ती मिळाली, तेव्हा फुटलेल्या धरणातील पाण्याप्रमाणे त्या धो-धो बोलू लागल्या. इस्लाम हा सामाजिक न्याय देणारा धर्म आहे, सहिष्णुवृत्तीचा आहे- ही एक भली मोठी ऐतिहासिक थाप आहे, हे त्या दिवशी प्रत्यक्ष पाहण्यात आलं आणि या महिलांची गाऱ्हाणी जिथे तिथे मांडण्याचं मी ठरवलं- यात धर्माच्या सामाजिक अंगाचं विश्लेषण व टीका आली- आणि हे जाहीरपणे मांडण्याचं धोरण, प्रसंग येईल तिथे वापरण्याचं ठरवलं.

धर्माच्या सामाजिक अंगाचं चिकित्सक मूल्यमापन केल्यानं मुसलमान समाज चिडतो, हे सर्वश्रुत आहे. पण मला एक वेगळा अनुभव माझ्या अलिगढच्या भेटीत आला. अलिगढ येथे 1978 मध्ये फार मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या. हमीद दलवाईंचे एक निकटचे सहकारी कोल्हापूरचे श्री. हुसेन जमादार यांनी असं सुचवलं की, वर्तानपत्रांतून येणाऱ्या बातम्या वाचून या दंगलीविषयी आपण कुठलंही निवेदन करण्यापूर्वी अलिगढला प्रत्यक्ष भेट देऊ या. अलिगढला भेट देताना मनात थोडीशी भीती होती. कारण हमीद दलवाईंना आपल्या अलिगढच्या पहिल्या भेटीमध्ये फार कटू अनुभव आला होता आणि त्या वेळी ते सुदैवाने बचावले होते. अलिगढ विद्यापीठातील ज्या प्राध्यापकांनी दलवाईंना त्या वेळी सुखरूप बाहेर पडण्यास मदत केली होती, ते प्राध्यापक मला व माझ्या सहकाऱ्यांना आपल्या घरी राहू देण्यास उत्सुक दिसले नाहीत. त्यांनी आम्हाला एका हिंदूकडे पाठवले. त्या हिंदूने आमची व्यवस्था केली, पण या आश्रमात राहणं येण्या-जाण्याच्या दृष्टीनं गैरसोईचे वाटलं. म्हणून आम्ही अलिगढ विद्यापीठातील एक दुसऱ्या प्राध्यापकांकडे गेलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या प्राध्यापकाने आमची सोय विद्यापीठातील एका गेस्ट हाऊसमध्ये केली. या विद्यापीठाच्या प्राध्यापकवर्गाध्ये ज्यांना-ज्यांना मी भेटले, त्या सर्वांनादलवाईंचं नाव परिचित होतं; पण त्यांनी मला कुठल्याही प्रकारची गैरवागणूक दिली नाही.

एकच प्राध्यापक असे भेटले; त्यांनी मला सांगितलं की, तुम्ही हमीद दलवाईंच्या बेगम आहात, हे कुणाला सांगू नका. (हे प्राध्यापक महाशय हमीद दलवाईंचे मित्र आणि एके काळचे खासदार, स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवणारे)  मी विद्यापीठाच्या अतिथीगृहात आठ-दहा दिवस राहून  रात्रंदिवस फिरते आहे, हे जेव्हा त्यांना सांगितलं; तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. या गृहस्थांनी मला चहासुद्धा न देता माझा पाहुणचार केला आणि परत पाठवलं. अलिगढमध्ये झालेल्या दंगलीची यांच्या सेक्युलर विचारांना बरीचशी झळ लागली होती, हे त्यांच्या बोलण्यातून मला स्पष्ट जाणवत होते. या प्राध्यापक महाशयांच्या घरी जाताना त्यांचा पत्ता विचारण्यासाठी म्हणून मी टांगा थांबवला आणि एका सद्‌गृहस्थांना विचारलं तेव्हा त्यांनी पत्ता सांगितला; पण माझं नाव सांगितल्यानंतर मात्र तो उसळला, ‘‘वो जनसंघ का बगलबच्चा एजंट हमीद दलवाई? उसकी आप बेगम?’’ हुसेन जमादारांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्याने आपल्या आरोपांचं पालुपद चालूच ठेवलं. अर्थात, रस्त्यावर कुठलाही अतिप्रसंग झाला नाही.

दलवाईंच्या आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या ध्येय-धोरणांशी चर्चा करण्याचा प्रसंग हमीद दलवाईंच्या एका परिचित महिलेच्या घरी आला, श्रीमती वसीफा अन्सारी सिंग यांच्या घरी. लखनऊमधील प्रसिद्ध फिरंगी महल या घराण्यातील या महिला. कम्युनिस्ट चळवळीशी त्यांचा संबंध आला आणि श्री.सिंग यांच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांनी आपल्या परीनं माझं फार आदरातिथ्य तर केलंच, शिवाय 80-85 महिलांना बोलावून चर्चेचा कार्यक्रम आखला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आम्ही मांडलेल्या विचारांना या महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. धर्माच्या सामाजिक अंगाची बाजूही गतिमान असली पाहिजे, घटस्फोटित महिलेला न्याय मिळाला पाहिजे, सुधारणा घडवून आणण्यासाठी समान नागरी कायदा अतिआवश्यक आहे; हे या महिलांनी मान्य तर केलेच; इतकंच नव्हे, तर या मागण्यांसाठी सहकार्य देण्याचंही आश्वासन त्यांनी दिलं. दुर्दैवाची गोष्ट ही की, अशा देशभर विखुरलेल्या शक्ती एकत्र आणण्यासाठी आमची ताकदच कमी पडते.

या शक्ती अर्थातच दुर्बल आहेत; त्या अलिगढमध्ये असोत किंवा देशातील इतर कुठल्याही विभागातील असोत. ह्याचं मुख्य कारण असं आहे की, मुस्लिम समाज हा समुदायवृत्तीचा आहे. कोणत्याही प्रश्नावर विचार करताना धर्माचा दृष्टिकोन केंद्रीभूत मानला जातो आणि धर्माच्या नावावर तो कोणत्याही प्रश्नावर झट्‌कन एकत्र येतो. फाळणीपूर्व व फाळणीनंतरच्याही काळात मुसलमानांच्या या वृत्तीमध्ये फरक पडला आहे, असं वाटत नाही. उर्दू भाषा  आणि इस्लाम धर्म याचा तसा काहीच संबंध नाही; तरीसुद्धा पाकिस्तानच्या चळवळीमध्ये उर्दू भाषेचा फार मोठा वाटा होता. जसे केवळ धर्मावर अधिष्ठित एखादं राष्ट्र उभं राहू शकत नाही, तसेच केवळ धर्माशी बादरायण संबंध जोडलेली भाषाही देश उभारणीसाठी उपयोगी पडत नाही आणि हे बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर मुसलमानांना उमजायला पाहिजे होतं. पण ते तसं त्यांना उमजलंय, असं मला वाटत नाही. कारण सर्व राष्ट्रात उर्दूला दुसऱ्या अधिकृत राजभाषेचा दर्जा देण्याची मुसलमान समाजाची एकमुखी मागणी आहे. या राज्यात मुसलमान कितीही अल्पसंख्य असले तरीही मागणी केली जाते आणि ही मागणी करण्याऱ्यांमध्ये केवळ मुसलमानांच्या जातीयवादी संघटना आहेत असं नव्हे, तर सेक्युलर पक्षातील मुसलमानसुद्धा याच मागणीचा पुरस्कार करताना दिसतात. किंबहुना, आपल्याला असं दिसेल की, उर्दूशिवाय इतर प्रश्नांवरसुद्धा सर्व मुसलमान नेते (ते आणि संघटना कुठल्याही पक्षातील असोत) एकाच व्यासपीठावर आलेले आपल्याला दिसतात. उदा.- सरकारी इत्यादी नोकरीतील आरक्षणाचा प्रश्न, अलिगढ विद्यापीठाला अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याचा प्रश्न किंवा धर्मांतराचा प्रश्न. या त्यांच्या एकत्र येण्यावरून मुसलमान समाज धर्माच्या नावावर कसा समुदायवृत्तीचा बनतो, हे आपल्याला दिसून येईल.

इस्लामच्या स्थापनेपासून मुसलमानांची ही समुदायवृत्ती निरनिराळ्या प्रकारे पोसली गेली आहे. या समाजाचा एकत्रितपणा ही त्याची जबरदस्त शक्ती आहे. समाज कुठलीही भाषा बोलो, कुठलाही वेश परिधान करो, कुठल्याही प्रदेशात राहो; उम्मत या संकल्पनेचा त्याच्यावर एक जबरदस्त पगडा आहे. जोपर्यंत ही त्याच्या मनावरील पकड ढिली होत नाही, तोपर्यंत या समाजात वेगळा विचार निर्माण होणं, मूळ धरणं संभवनीय नाही.

विवेक, तर्कनिष्ठ विचार या गोष्टी या धर्माला संत नाहीत आणि समाजसुधारणेकरता आवश्यक असलेली तार्किक विवेचनाची-विश्लेषणाची एक परंपरा निर्माण होणं आवश्यक असतं, ती या समाजात झालेली नाही. ज्या ग्रीक संस्कृतीने साऱ्या जगावर आपला प्रभाव पाडला, त्याचा इस्लामशी सरळ संपर्क आला नाही, हे त्याचं एक कारण असू शकेल. इस्लामी जगतात अशा प्रकारची विचारसरणी निर्माण होईल, हे संभवनीय व शक्य नाही आणि... इस्लाममध्ये नवा विचार यावयाचाच असेल तर तो या देशातच येऊ शकेल, हे विचारवंतांचं मत अगदी बरोबर आहे.

या देशात काही गोष्टी अनुकूल आहेत. उदा.- लोकशाही संकल्पना, धर्मनिरपेक्ष राजकीय व्यवस्था, समाजसुधारणा, राजकीय समता आणि न्याय यांच्या लढ्याची शतकाहूनही अधिक पार्श्वभूमी, संघटित उदारमतवादी लोकमत इत्यादी. पण इतक्या अनुकूल गोष्टी असूनसुद्धा समाजप्रबोधनाची चळवळ मुसलमानांत दुर्दैवाने पसरू शकलेली नाही. त्या समाजातील सुधारणेला विरोध करण्याची ऐतिहासिक प्रवृत्ती, नव्या विचाराला विरोध ही कारणे आहेत. पण या देशातील हिंदूसुद्धा मुसलमानांतील समाजसुधारणेबाबत बरेचसे तटस्थ आणि उदासीन आहेत, असं मला वाटतं; राजकीय पक्षांची तर गोष्टच सोडा. नानासाहेब गोरेंनी असं एके ठिकाणी म्हटलंय की, सर्व राजकीय पक्ष समाजसुधारणेच्या प्रश्नाबाबत प्रतिगामी वृत्तीचे बनले आहेत आणि ते खरंच आहे. दत्तकविधेयक हे याचे उत्तम उदाहरण म्हणून देता येईल.

समाजसुधारणेचा आणि सामाजिक न्यायाचा टाहो फोडणाऱ्या जनता पक्षाच्या सदस्यांनी एक दिवस दत्तकविधेयक राज्यसभेत मांडलं आणि दुसऱ्या दिवशी ते परत घेतलं. त्याला अर्थात अपवाद आहेत आणि एक मुद्दाम नमूद करण्यासारख्या अपवाद म्हणजे श्रीमती प्रमिला दंडवते यांचा. सुप्रीम कोर्टाच्या श्री. कृष्णा अय्यर यांनी दिलेल्या या निकालानुसार घटस्फोटित मुस्लिम महिलेला पोटगीचा हक्क मिळतो, तो राजकीय दबावाने नष्ट करण्याचा उद्योग आणि घटस्फोटित मुसलमान स्त्रीला निर्वासित बनवण्याचे धार्मिक कार्य जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार शाहबुद्दीन करत आहेत. श्रीमती दंडवते यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या 185 कलमाला दुरुस्ती सुचवणारं आणि घटस्फोटित मुस्लिम महिलेचा पोटगीचा हक्क अबाधित व कायद्यात स्पष्ट करणारं एक बिल लोकसभेत सादर केलं आहे. या बिलाला किती पक्षांचा पाठिंबा मिळतो, ते पाहूया.

मुसलमान समाजात सामाजिक सुधारणेला पुरेसा प्रतिसाद न मिळण्याचं आणखी एक कारण मला दिसतं, ते असं की- या समाजातील काही पुरोगामी मानले गेलेले विचारवंत हे बौद्धिकदृष्ट्या अप्रामाणिक आहेत, भोंदू आहेत. ही मंडळी डाव्या विचारसरणीची आहेत, असं मानलं जातं. ही मंडळी स्वत:ला निरीश्वरवादी समजणारी आहेत. तरीसुद्धा मुसलमानांच्या वैयक्तिक कायद्यात कुठलाही बदल करण्याचं आमचं धोरण नाही, असं जाहीरपणे सांगताना त्यांची सदसद्‌विवेकबुद्धी त्यांना जराही बोचत नाही. बोहरा धर्मगुरू त्यांच्या जमातीतील सुधारणावादी गटांवर जो अन्याय  करतात, त्याची चौकशी करण्यासाठी नाथवानी आयोग स्थापन झाला होता आणि त्या स्थापनेमागे काही मान्यवर हिंदूंचेच प्रयत्न होते. एरवी अशा प्रकारची चौकशी होणंच शक्य नव्हतं. इतकं असूनसुद्धा या देशात राहणं आपल्याला असुरक्षित वाटतं, असं या बोहरा सुधारणावादी चळवळीचे एक नेते श्री. असगरअली इंजिनिअर यांनी मोरादाबाद येथे झालेल्या जातीय दंगलीच्या संदर्भात आचार्य दादा धर्माधिकारी यांना सांगितलं. असे दुटप्पी धोरण किंवा विचारातील अप्रामाणिकपणा घेऊन पुढे जाऊ पाहणारे लोक मुलगामी समाजसुधारणा घडवून आणू शकतील, असं मला वाटत नाही. जे समाजसुधारणेच्या बाबतीत मुसलमानांतील मान्यवर तथाकथित विचारवंतांविषयी मी म्हटले आहे, तेच जातीय दंग्याबाबतीतसुद्धा म्हणता येईल. जवाहरलाल नेहरू इत्यादी विद्यापीठांमध्ये अशी काही प्राध्यापकमंडळी आहेत, त्यांचे असे मत आहे की; जातीय दंग्याची आता नवी केंद्रे बनत आहेत. ही केंद्र कशी आहेत, जिथं मुसलमान आर्थिकदृष्ट्या प्रबल झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये बिहारमध्ये दंगे झाले, उत्तर प्रदेशात दंगे झाले, महाराष्ट्रातही झाले आणि या सर्व राज्यांतून झालेल्या दंगलीची केंद्रस्थाने या शतकाच्या जवळजवळ सुरुवातीपासूनच निर्माण झालेली आहेत.

सन 1920 नंतर बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, बंगाल या राज्यांतील शहरे ही दंगलीची मुख्य केंद्रं होती. या केंद्रांध्ये सोलापूर हे महाराष्ट्रातील शहर होते. या सोलापुरात अलीकडेच जातीय दंगली झाल्या. तेव्हा जातीय दंगली होण्यामागे मुसलमानांची सुधारित आर्थिक परिस्थिती आहे, हे तर्कट मोठं अजब वाटतं. मोपल्यांचं बंड हा एक वर्गसंघर्ष होता, असं म्हणण्यासारखंच हे हास्यास्पद आहे. मशिदीवरून वाद्य वाजवण्याचा प्रश्न असो किंवा गोहत्येचा प्रश्न असो; जी निमित्तं 1922 पासून होणाऱ्या दंगलींना कारणीभूत होत होती, तीच कारणे बऱ्याच हिंदू-मुस्लिम दंग्यांना आजही कारणीभूत आहेत.

मुसलमानांतील जातीयवादी संघटनांविषयी तर बोलायलाच नको. यात केवळ जमाते इस्लामी सामील नाही. जातीय तणावाला हीच एक संघटना कारणीभूत आहे, असं समजून तिच्यावर टीकास्त्र सोडण्यात येते. टीका जरी योग्य असली तरी मुसलमानांतील जातीय संघटना ही एकच नाही, किंवा मुस्लिम लीगही नाही. जमा-तुल्‌-उलेमा हीसुद्धा कर्मठांची आणि मूलभूततावाद्यांची एक संघटना आणि तीही जमाते-इस्लामीइतकीच मागे पाहणारी व कडवी आहे. त्यांच्यातील फरक हा ‘उडदामाजी काळे  गोरे’ असाच. मध्यवर्ती कायदे मंडळात बालविवाहविरोधी एक बिल 1927 मध्ये सादर करण्यात आले. त्याला विरोध करण्यात जमा-तुल्‌-उलेमा आघाडीवर होती. अर्थात, त्या काळातही टी. ए. के. शेख यांच्यासारख्या सदस्यांनी या बिलाला पाठिंबा दिला होता. बॅरिस्टर जीनांनीही सुरुवातीला याला पाठिंबा दिला, पण उलेमाच्या त्यांच्यावरील जहरी टीकेमुळे त्यांनी हा पाठिंबा आस्ते- आस्ते काढून घेतला. मुख्य म्हणजे ब्रिटिश सरकारने मुसलमानांच्या विरोधाला अक्षरश: वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. मोहंमद अली आदी काही मौलानांच्या शिष्टमंडळाला व्हाईसरॉयने तर भेटणेही नाकारले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की, सदर बिल म्हणजे मुसलमानांच्या वैयक्तिक कायद्यातील हस्तक्षेप आहे. मौलानांचा आणि कर्मठ मुसलमानांचा हा विरोध न जुमानता व्हाईसरॉयने या बिलावर शिक्कामोर्तब केलं होतं. जमा- तुल्‌-उलेमांचा हा पूर्वेतिहास आणि या बिलावरील त्यांची भूमिका (या बिलाच्या चर्चेच्या वेळी या संघटनेचे सदस्य असे म्हणाले होते की, मी पहिल्यांदा मुसलमान आहे आणि नंतरच भारतीय आहे.) ही तमिळनाडूत झालेल्या धर्मांतरावरील त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात तपासून बघितली; तर या संघटनेची खरीखुरी जातकुळी काय आहे, हे कळून येणं अवघड ठरू नये. ही मंडळी काही ऐतिहासिक गैरसमजुतीमुळे उगाचच राष्ट्रीय समजली गेलेली आहेत. खरं तर हे सारे शहा वली उल्ला किंवा शिबली नोमानी यांचेच औरस पुत्र शोभतील.

ब्रिटिशांनी काही बाबतींत मुसलमानांच्या विरोधाला न जुमानण्याची भूमिका जरी घेतली असली, तरी एकंदर स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांची भूमिका मुसलमानांना गोंजारण्याचीच होती आणि मुसलमानांना या तिसऱ्या पक्षाच्या फार मोठा आधार होता. हा कायम स्वरुपाचा आधार नाही, हे मुसलमानांना अर्थातच कळत होते. किंबहुना यासाठीच तुर्कस्थानचं स्वातंत्र्य अबाधित राहावं आणि खलिफाची सत्ता व सामर्थ्य वाढावं, ही त्यांची खिलाफत चळवळीमागील भूमिका होती. हे अर्थातच साकार झाले नाही.

इस्लाममधील उम्मतच्या कल्पनेविषयी मी वर लिहिलं आहेच, पण त्याहीपुढे जाऊन जमाते-इस्लामी आणि जमा-तुल्‌-उलेमा या संघटनांतील मौलाना आपल्याला थेट पैगंबरांचे वंशज मानतात. जमा-तुल्‌-उलेमाचे एक शंकराचार्य मौलाना हुसेन अहमद मदनी यांचे असे म्हणणे होते की, यांच्या धमन्यांतून अरबी रक्त वाहत आहे. उत्तर प्रदेशातील फैझाबाद जिल्ह्यातील हे गृहस्थ आपल्या आत्मचरित्रात असं म्हणतात की, त्यांच्या वडिलांच्या स्वप्नांध्ये एकदा प्रॉफेटचा पुतण्या आला आणि त्याने असं सांगितलं की, तू इमाम हुसेनचा पुत्र आहेस. अशा कित्येक कल्पित कथा त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिल्या आहेत. एकदा त्यांनी आपल्या स्वप्नामध्ये पैगंबरांना आणि पहिले खलिफा अबू बकर यांना आपल्या शेजारी उभं असताना पाहिलं होतं. अशी वंशावळ सांगणारे नेते राष्ट्रीय मानले गेले. खरं म्हणजे, हे नुसते मूलतत्त्ववादी नाहीत, तर ते समाजविघातक आहेत आणि अशी मंडळी मुसलमान समाजात कर्मठपणा वाढवत आहेत. अरब देशांतील पेट्रो डॉलर या कारवायांना अप्रत्यक्षपणे पण सबळ खतपाणी पुरवीत आहे.

दुर्दैवाने मुसलमान समाजात या देशात कुठला शरियत कायदा लागू आहे, या संबंधी एक भयंकर अज्ञान आहे. मी एकदा सफाळे येथे गेले होते. काही मुसलमान मंडळीशी तेथील सेवादलातील मित्रांनी एक चर्चा घडवून आणली. या चर्चेत बोलताना आपल्या देशात ब्रिटिशांनी घालून दिलेला शरियत कायदा मुसलमानांना लागू आहे, असं जेव्हा मी सांगितलं; तेव्हा तुम्ही थाप मारता आहात, खोटं बोलत आहात, असं एक मौलाना मला म्हणाले. मुसलमान समाजातील हे अज्ञान घालवणं, हे फार महत्त्वाचं कार्य आहे आणि हे सोपं नसलं, तरी करणं आवश्यक आहे.

अज्ञानाबरोबरच चुकीचा प्रचार हाही मुसलमान समाजात कुठल्याही सुधारणावादी कार्यक्रमांना विरोध पोहोचवण्यास मदत करतो. ‘रेडियन्स’ या जमाते- इस्लामीच्या मुखपत्राचे संपादक अमी-नुल-हसन रिझवी यांनी इतर मुसलमानांप्रमाणेच दत्तक विधेयकालाही विरोध करण्याची आघाडी उघडली. मी त्यांना एकदा विचारलं की, तुम्ही त्याला विरोध का करता? त्यांचं उत्तर फार मजेशीर होतं. ते म्हणाले की, ‘समजा एका गृहस्थाने एका मुलीला दत्तक घ्यायचं ठरवलं, दत्तक घेतल्यानंतर त्या मुलीविषयी या गृहस्थाच्या मुलाला जर प्रेम वाटू लागलं आणि त्यांची विवाह करण्याची इच्छा निर्माण झाली, तर शरियत कायद्यात ते संमत होणार नाही.’ मी त्यांना सांगितलं की, ‘यातून मार्ग आहे; आणि तो हा की, दत्तक घेण्यापूर्वीच मुलाला बापाने विचारावं, तुला हिच्याशी लग्न करायचं आहे का? त्याची जर इच्छा असली, तर हे लग्न करून द्यावं आणि नसलीच, तर दत्तक घेण्याचा मार्ग खुला होतो.’ तेव्हा असल्या खुळचट प्रचाराला मुसलमान समाज बळी पडतो  आणि त्यामुळेच एकूण सुधारणेचे वारे या समाजात वाहू लागलेले दिसत नाहीत.

दत्तक विधेयकाला विरोध करण्यामागे मुसलमानांच्या जातीय संघटनांप्रमाणेच सेक्युलर पक्षातील मुसलमान आणि काही हिंदूही आघाडीवर होते. दत्तक विधेयकाचा पुरस्कार करणाऱ्या काही सामाजिक संघटनांनी मुंबईतील सध्याचे उपराष्ट्रपती श्री. हिदायतुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा आयोजित केली होती. या सभेला प्रा. फैजी आणि छगलासाहेबही उपस्थित होते. मी तिथे असं सांगितलं की, 1400 वर्षांपूर्वी इस्लामच्या इतिहासात एक गोष्ट घडली आणि मुसलमानांना दत्तक घेणं निषिद्ध मानलं जाऊ लागलं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही हे बंधन एखाद्या समाजावर लादणं, गैर आहे. धर्माचा तसा आदेश असला तर तो सामाजिक न्यायासाठी चक्क झुगारून दिला पाहिजे. सभेनंतर हिदायतुल्ला मला म्हणाले, ‘‘फार स्पष्ट आणि चांगलं बोललात.’’ काही बुजुर्ग मंडळींना भेटत असताना जनाब मोहिनुद्दीन हॅरिस यांना सलाम करण्याचा प्रयत्न केला, पण ते लक्ष देईनात. तरीसुद्धा मी परत समोर जाऊन उभी राहिले. माझ्या सलामचा रागाने स्वीकार करत ते म्हणाले, ‘‘तुम्ही 1400 वर्षांपूर्वीची गोष्ट काय करताहात; 1400 वर्षांनंतरही हेच चालू राहील! तुम्हाला इस्लाम आणि कुराण समजलेलं नाही. चार लोक टाळ्या वाजवतील, पण मुसलमान समाज तुमच्यापाठी येणं शक्य नाही.’’

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये हमीद दलवाईंनी एक लेख लिहिला होता- ‘राष्ट्रीय मुसलमान, एक धोकादायक प्राणी’. यात दलवाईंनी हॅरिस यांच्यावरही टीका केली होती. सामाजिकदृष्ट्या लोकशाही समाजवादी पठडीमध्ये वाढलेले, सेवादलाच्या परंपरेत शिक्षण घेतलेले मुसलमानही कसा विचार करतात, ते पाहा- असाच एक प्रश्न- ज्यावर सबंध देशातील मुसलमान एकत्र येतात- तो आहे, आसाममधील परकीय नागरिकांच्या चळवळीसंबंधी. या चळवळीच्या नेत्यांची साधी व सरळ मागणी आहे की- जे नागरिक नाहीत, जे घुसखोर आहेत; त्यांना देशाबाहेर घालवा. ही मागणी अत्यंत न्याय्य अशी आहे. बिगरनागरिकांना अशा तऱ्हेने देशात अनिर्बंधपणे येण्यास मुभा दिली, तर अनवस्था प्रसंग ओढवेल. आसाममध्ये मोठ्या प्रमाणात बंगाली मुसलमानांची आयात केली गेली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तिथे सादुल्ला याचं मंत्रिमंडळ असताना आसाम मुस्लिमबहुल प्रांत व्हावा, असे हेतुपुरस्सर करण्यात आले. या धोरणाचे सूत्रधार सुऱ्हावर्दी आणि चौधरी खलिकुल्झमान हे होते. खलिकुल्झमान तर असं म्हणत असत की, काही महिन्यांतच आसाम मुस्लिमबहुल प्रांत होईल. सादुल्लांच्या या धोरणासंबंधी लिहिताना लॉर्ड वेव्हेल यांनी आपल्या ‘व्हाईसरॉइज परसल’ या आत्मचरित्रात असं लिहिलं आहे की, सादुल्लांनी अधिक धान्य पिकवा (ग्रो मोअर फूड) या मोहिमेचं निमित्त केलं. पण त्यांचं खरं उद्दिष्ट आसाममधील मुस्लिमांची संख्या वाढवणं हे होतं (ग्रो मोअर मुस्लिम). अर्थात, त्यांना पाहिजे होता तसा इतिहास त्या वेळी घडला नाही. तरीसुद्धा अपूर्ण राहिलेली इच्छा पुरी व्हावी म्हणून काही समाजघटक तसा प्रयत्न पुढेही करत राहतात. तेव्हा आसामातील वाढत्या घुसखोरांच्या प्रश्नाबद्दल स्थानिक लोकांध्ये आणि हिंदूंध्ये काही गंभीर शंका निर्माण झाल्या, तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. अस्थिरता निर्माण होणं आणि तेही सीमेवरील एका प्रदेशामध्ये, हे फार धोक्याचं आहे. गेल्या निवडणुका आसामात होऊच शकल्या नाहीत आणि एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट अशी आहे की, बेगम फकरुद्दीन अली अहमद यांना आपल्या मतदारसंघात जाणेही कठीण झाले. फकरुद्दीन अली अहमद हे आता हयात नसले तरी सादुल्लांचे धोरण कमी-अधिक प्रमाणात पुढे चालू ठेवण्याचा त्यांनीही प्रयत्न केला होता, हे विसरता येणार नाही.

आसामच्या चळवळीतील नेत्यांच्या मागणीला ‘अल्पसंख्याकावर अन्याय होतो’ अशी ओरड करून विरोध करण्याचा कसलाही अधिकार मुसलमानांना पोहोचत नाही. शिक्षणाचा प्रश्नही फार मोठा आहे. त्याच्यावर मदरसा शिक्षणाचा प्रभाव हा शालेय किंवा महाविद्यालयातील शिक्षणापेक्षा अधिक आहे. विज्ञानाधिष्ठित शिक्षण घेण्याची परंपरा व प्रवृत्ती फार कमी आणि आधुनिक शिक्षण घेऊनसुद्धा एकूण धार्मिक दृष्टिकोन प्रगतीच्या आड येतो. पाकिस्तानचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते डॉ.अब्दुल सलाम यांनी आपल्या मुंबई भेटीत एकदा असं सांगितलं की, धर्म हा मुसलमानांच्या प्रगतीच्या आड येतो आणि हे खरंच आहे. या समाजाला प्रगतीची दिशा कुठल्याही इस्लामी देशातून मिळणं शक्य नाही. या चळवळीचे मुख्य केंद्र या देशातच निर्माण करता येणे शक्य आहे.

०००

मूळ प्रकाशित: रविवार सकाळ, दिवाळी अंक, १४ नोव्हेंबर १९८२. पुनर्प्रकाशित: 'साधना' साप्ताहिक, १५ ऑगस्ट २०१५.

हमीदच्या गोष्टी

- भाऊ पाध्ये

‘आज मी फक्त महात्मा गांधींच्या गोष्टी सांगणार आहे.’ डॉक्टर लोहिया यांनी एकदा असे सांगूनच महात्मा गांधींवर भाषण दिले होते. मीदेखील आज हमीदच्या गोष्टी सांगणार आहे, त्यापलीकडे त्याचे माझ्याकडे काही राहिले नाही. मी अलीकडे त्याला भेटलो नव्हतो. तो कधीही मान पुढे करून डोकावत, मला शोधत आला नाही आणि त्यामुळे एखाद्या हॉटेलात बसून गप्पाटप्पा झाल्या नाहीत. तो गोष्ट अत्यंत रसाळपणे सांगायचा. अरेबियन नाईट्‌स ते हमीद दलवाई- सारेच मुसलमान वर्णन करण्यात मोठे रसाळ. ऐकत राहावी. दळवी यांचे दलवाई कसे बनले किंवा कुणा तरी मुसलमानाने आपल्या दुष्मनाला आपल्या मुसलमानी घराच्या भूलभुलैय्यामध्ये दावत देऊन त्याचा काटा कसा काढला वगैरे.

दै. मराठाची नोकरी सोडून तो मुसलमानांना अक्कल शिकवण्याच्या पाठीमागे हात धुऊन लागला होता. त्याचा थांगपत्ता कुठे असेल, ते काय सांगावे? दै. मराठात असताना त्याच्या सहकाऱ्यांना मी विचारायचो, ‘हमीद सध्या कुठे आहे?’ ते विनोदाने म्हणत, ‘तो आता पाटण्याला असेल जे. पी.शी वाद घालत. मग आला की सांगेल, मी जे.पींना एक सवाल टाकला. जे. पी. त्यावर नॉन-प्लस्ड ना!’ मला एकदा तो असाच रेल्वेच्या डब्यात एकटा बसलेला आढळला. मी त्याच्याजवळ बसलो. मी त्याला डिवचण्यासाठी म्हणालो, ‘‘काय हे मुस्लिम सत्यशोधक समाजाचे लफडे सुरू केले आहेस?’’ तो म्हणाला, ‘‘तुला काही मिळत नाही वाटतं हातात! तू काढ शोधून!’’

हां, मी काही दिवस सिनेमा-व्यवसाय शोधून काढला. हां! आमच्या दोघांच्या लेखी काही तरी शोधून काढणे, हा एक आवश्यक भाग होता. कारण एकदा आम्ही एकाच प्रवाहात होतो. समाजवाद्यांच्या, साहित्याच्या आणि बेकारीच्या त्या प्रवाहात आम्ही गटांगळ्या खात नेहमीच  एकत्र येत असू. हमीद दलवाई या नावाविषयी मला कुतूहल वाटले ते त्याच्या सत्यकथेमध्ये (पंचवीस वर्षांपूर्वी) छापून आलेल्या ‘बेकार माणसाच्या गोष्टी’मुळे. मी कामगार चळवळीमधून बाहेर पडून आता बेकारच होतो. बेकारीचे चटके बसल्यामुळे हमीदची ती कथा मला एकदम भिडली होती.

एक दिवस माझी बायको शोषण्णा युनियनच्या कचेरीवर हमीदला घेऊन आली. हमीद त्या वेळी फारच कोवळा, भाबडा, साधा समाजवादी कार्यकर्ता होता. असा कार्यकर्ता म्हटला म्हणजे, तो शोषण्णाला चिकटायचाच. आमच्या युनियनच्या नीरस मंडळींत लिहिण्याची धडपड करणारा आणि थोडेफार वाचलेला मीच. हमीदचीही सत्यकथेतली गोष्ट मी वाचली होती. त्यामुळे त्याची आणि माझी दोस्ती जमली. साहित्यक्षेत्रात हमीद हा मला सीनिअर होता. फ्रेंड, गाईड, फिलॉसॉफर म्हणून तो तीनही भूमिका पार पाडू लागला. दोस्तोव्हस्की नामक कुणा रशियन कादंबरीकाराचा ग्रंथोबा तो काखेत घेऊन यायचा. त्यामधील काही मजकूर तो माझ्यासमोर ठेवायचा, ‘वाच- असं लिहिता आलं पाहिजे!’ त्यामुळे मी दोस्तोव्हस्कीच्या पाठीमागे लागलो. साहित्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याला फारच उत्साह. त्या वेळी साहित्याच्या चर्चा अशा चालत- ‘बा. सी. मर्ढेकरांनी कवितेला नवे वळण दिले.,’ ‘गंगाधर गाडगीळांनी मराठी कथा गोष्टीच्या फॉर्ममधून सोडवली’. असल्या चर्चांना हमीद मला फरफटत घेऊन जायचा. त्याने रूपारेल कॉलेजमध्ये एक चर्चा मंडळही स्थापन केलं होतं. शिवाय प्रा. शांता शेळके यांचे दादरचे घर, अभिरुचीकार चित्रे यांचे घर, इकडेही तो मला घेऊन जायचा. कधी तरी या चर्चेमध्ये ‘हमीद दलवाईने मराठी साहित्यात मुसलमान जीवन आणले’ असे बोलले जावे आणि आपले कान तृप्त व्हावेत, असे त्याला मनापासून कुठे तरी वाटत असावे. त्या वेळी लेखकमंडळी असेच लिहीत. श्री.ना.पेंडसे कोकणावर किंवा व्यंकटेश माडगूळकर माणदेशी माणसांवर. माझ्या पहिल्या दोन्ही कादंबऱ्या कामगार चळवळीवर होत्या. मला हमीद म्हणाला, ‘‘तूदेखील चळवळ हाच विषय घेतला आहेस काय?’’ मी त्याला म्हणालो, ‘‘मी कामगार चळवळीला कायमचा रामराम ठोकलाय!’’

तो काळ असा होता की, राजकारण आणि साहित्य हातात हात घालून जात नसे. हमीद आणि मी अशी चार- दोनच तरुण माणसे राजकारणातही रमत असू आणि लिहीतही असू. हमीदला माझ्या लिखाणात खूप इंटरेस्ट असे आणि मलाही त्याच्या लिखाणात खूप इंटरेस्ट असे, याचे कारण हेच असावे. हमीद माझ्या कथा घेऊन सत्यकथेत जायचा आणि परत घेऊन यायचा. त्यावर संपादक राम पटवर्धन यांनी लिहिलेला शेरा, त्याच्या टिपिकल खटक्या-खटक्याने हसण्याबरोबरच वाचून दाखवायचा, ‘‘घ्या - तुमचा अनुभव गोळीबंद नाही.’’

त्या वेळी विजय तेंडुलकर ‘वसुधा’ मासिकाचे संपादन करायचे. एक दिवस मला त्यांच्याकडे घेऊन गेला. माझ्या लिखाणाविषयी विजयरावांनी त्या वेळी सहानुभूतीने चौकशी केली. याचे कारण, माझ्या लेखनगुणासाठी हमीद जामीन राहिला होता ना!

लेखक म्हणून आयुष्यात कमाई करण्यासाठी असा आमचा दोघांचा स्ट्रगल चालला होता. एरवी आमची उमेदवारी चालली होती, तरी आमच्या उड्या फार मोठ्या होत्या. आपल्या हातून काही तरी युगप्रवर्तक लिखाण झाले नाही तर काही खरे नाही, असे आम्हाला मनोमन वाटायचे. दोस्तोव्हस्की तर आमच्या माथ्यावरच बसला होता. नाकेला, उंच, फाटक्या देहाचा, गोरा, दाढी वाढवलेला, तोंडात सतत ‘सिमला’ सिगारेटचे थोटूक चोखत असलेला हमीद म्हणजे मला दोस्तोव्हस्कीच वाटे. दोस्तोव्हस्की म्हणजे एक तुफान जीवन जगलेला लेखक. त्याचे अनुभव किती मोठे असतील! हमीदने एक दिवस मला एक किस्सा सांगितला. लहानपणी गावातल्या नदीमध्ये भर पुरात त्याने होडके हाकारले नि मग पुराने त्याला असे काही वाहून नेले की, आपण जिवंत राहतो की मरतो याची त्याला भ्रांत पडली. ‘‘अनुभव हा असा असतो-’’ मला तो म्हणाला. असे अंतर्बाह्य तुफान जगण्यासाठी आणि जीवघेण्या अनुभवासाठी काहीही करायचे. पण वाटून काय उपयोग? बेकारी हात धुऊन पाठीमागे लागली होती आमच्या. बेकारीने आमच्या जीवनातला बराचसा मौल्यवान वेळ आणि संधीही वाया गेली. एक दिवस मी निराश झालो असता हमीद मला म्हणाला, ‘‘प्यासा सिनेमा बघ- तुझा लेखकाचा इगो त्यामुळे सुखावला जाईल.’’

हमीद आणि माझे त्या वेळचे संबंध म्हणजे ‘रोमन हॉलिडे’मधल्या राजवाड्यातून काहीही न घेता पळालेली राजकन्या आणि जुगारात कमाई घालवून बसलेला पत्रकार यांच्यामधील ‘फिफ्टी-फिफ्टी’ भागीदारासारखे. हमीदला पैशाची गरज नेहमीच असायची आणि त्या वेळेला त्याच्या पद्धतीने डिप्लोमॅटिकली पैशाचा विषय काढण्यासाठी तयारी करून तो यायचा. अत्यंत गांभीर्याने तो पैशांची मागणी करायचा. पैसे परत देण्याबद्दल अत्यंत आशादायक चित्र रेखाटायचा. तोपर्यंत मी एक शब्दही बोलत नसे. खिशातील पैशांचा अंदाज घेऊन, आणखी दोन दिवस चालतील एवढे पैसे ठेवून त्याला किती देता येतील, न देता आल्यास आमचा कॉमन मित्र विठ्ठल वाळिंबे किंवा दुसऱ्या कुणाच्या गळ्यात त्याला बांधता येईल का- वगैरे वगैरे ठरवायचो. परिस्थितीच इतकी बेकार झाली होती की, दिलदारपणानेही लाजून तोंड लपवावे.

एकदा हमीदने धंदा करायचे ठरवले. त्या वेळी त्याने माझ्याकडे चक्क 250 रुपयांची मागणी केली. त्या वेळी माझा पगारही 250 रुपये नव्हता. मी मोठा हुशार. हमीदला दुखवायचे नाही आणि आपल्या खिशाला चाट नको, म्हणून त्याला विठ्ठल वाळिंबे या आमच्या भाबड्या मित्राच्या गळ्यात बांधले. बिचारा विठ्ठल फसला. पैसे देऊन बसला, पण ते मुदतीच्या आत येण्याची शक्यता दिसेना. तो चिडून हमीदला अद्वातद्वा बोलू लागला. हमीद अगदी खालच्या आवाजात त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागला. मी सेफ होतो. अर्थात, पैसे देण्या-घेण्यामुळे आमचे संबंध बिघडले नाहीत. हमीद आमच्याकडे येत राहिला.  हमीदने एकदा बॉक्सेसचा धंदा सुरू केला, नंतर ट्रकचा. दोन्ही धंदे बुडाले. त्याच्या ट्रकच्या धंद्याचा किस्सा विजय तेंडुलकर वर्णन करून सांगत, तो ऐकण्यासारखा आहे. पैशांवरून संबंध तुटतात म्हणतात, पण हमीदचे संबंध कधीच तुटले नाहीत. पैसे घेऊन व देऊनही तो भेटायला येतच असे. 

हमीद कसा यायचा? तुम्ही कधी हॉलीवुडहून येणारी ‘ट्रिनिटी’ ही विनोदी स्टंट चित्रपटाची मालिका पाहिली आहे? ‘वॉच आऊट- वुई आर मॅड’ वगैरे! त्यातला तो तरुण पोरगा टेरेन्स हिल पडद्यावर दिसला की, काही तरी आता गडबड-धमाल होणारच असे वाटते - तसे हमीद आला की, वातावरण व्हायचे. त्याच्या ‘कोपरी’मध्ये काही तरी ‘मिश्चिफ’ असायचीच! त्याने आपल्या एखाद्या मित्राचे प्रेम प्रकरण पाहिले असेल, आपल्याविषयी कुणी तरी काही तरी बोलल्याचे ऐकले असेल... किंवा दुसऱ्या कुणाविषयी त्याला काही तरी गॉसिप सांगायचे असेल... त्या सर्वांना तो वाट करून द्यायचा!

‘‘अरे, तुझा तो मित्र एका जून आणि थोराड पोरीबरोबर  फिरताना पाहिला!’’ हमीदने असा बाँबगोळा टाकला की, आमचे मित्रमंडळ हादरलेच पाहिजे. एकदा त्याच्या ऑफिसातल्या एका पोरीवर माझी लाईन होती. मी म्हणालो, ‘‘हमीद, आपले जुळवून दे ना!’’ तो म्हणाला, ‘‘ती कुठे आणि तू कुठे!- तुला ती शोषण्णाच ठीक आहे!’’ हमीदने मला बऱ्याच दीक्षा दिल्या. काही सांगण्यासारख्या, काही न सांगण्यासारख्या. फटकळपणा हा प्रथम मी हमीदकडून शिकलो. तो चार-चौघांत सरळ विचारायचा- ‘‘बाईकडे जातोस की नाही? तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे!’’ त्या काळात समाजवादी पक्षाचे दोन तुकडे झाले आणि आम्ही लोहिया समाजवादी झालो. बाटग्याला आपल्या आधीच्या धर्माचा जसा राग असतो, त्याप्रमाणे आम्ही प्र.सो.पा.चा तिटकारा करायचो आणि आमच्या कळपात एखादा प्र.सो.पा.वाला आला की, मी त्याला उचलून हमीदपुढे टाकायचो. एखाद्या खाटकाप्रमाणे त्याच्यावर शाब्दिक सुरी फिरवून हमीदने त्याची बोटी-बोटी करून नाही टाकली, तर नावच नको. हमीदभाईने मनात एका कादंबरीची जुळवणी केली. तिचे नाव होते ‘पछाडलेली!’ खरा पछाडलेला असायचा हमीदच! नाना धंद्यांत मार खाऊन, नाना-पैशाच्या भानगडी करून आणि बेकारीमध्ये व तब्येतीच्या तक्रारींमध्ये पोळूनही तो आपल्या संकल्पित कादंबरीप्रमाणे (‘पछाडल्या’प्रमाणे) वागायचा. त्याची आक्रमक वृत्ती कुठल्याही अडी-अडचणीमुळे कणभरही कमी झाली नव्हती. हा लेखक लिहायचा कमी. प्रसंगी अखंडित तात्त्विक वादावरून कुणाशीही भांडाभांडी काढावी, त्याला निरुत्तर करावे, याशिवाय त्याला सुखाची झोप लागत नसावी.

हमीदभाईचा एक सीरिअस प्रश्न होता. एक दिवस त्याने माझ्याजवळ वाच्यता केली- लग्न! हमीदसारखा फटकळ माणूस हा प्रश्न सीरिअसली घेईल, असे मला कधी वाटले नव्हते. ऑफिसमधल्या कार्बन पेपर्सचे काळे डाग खादीच्या कपड्यांवर उमटले आहेत, बोकडासारखी दाढी वाढवली आहे, तोंडात सिमलाचे सिगारेटचे थोटूक आहे- असा हमीदचा बकाल अवतार. शोषण्णाला तितक्याच धश्चोटपणे सांगायचा, ‘‘अगं, तू कशाला माझी बहीण म्हणवतेस? तुझ्या एकाही मैत्रिणीची माझ्याशी ओळख करून देत नाहीस.’’ शोषण्णा तरी काय करणार? हा असामी कितीही चांगला लेखक असला तरी, त्याचे फटकळ तोंड उघडले की, शोषण्णाची कुठली मैत्रीण त्याला घाबरली नसती? पण एक दिवस त्याचा लग्न हा प्रश्न खरोखरीच सीरिअस असल्याची मला जाणीव झाली. हा एक चांगला लेखक, राष्ट्रीय व समाजवादी वृत्तीचा मुसलमान- याने कधी सुखाचा संसार करायचा ठरवला; तर आपल्या भाभीशी चार शब्द बोलायचे सोडा, तिचे नखही दृष्टीस पडणार नाही- कारण ती असणार बुरख्यात. शिकलेली असणार, ‘अलिफ बे’ इतपावत. आपल्याला आपल्या तोडीची तरी- किमान मॅट्रिकपर्यंत शिकलेली, ‘पडदा’ वगैरे न पाळणारी आणि मित्रांचे आदरातिथ्य वगैरे व्यवस्थित पार पाडेल अशी बायको मिळणे दुरापास्त आहे, याची चिंता त्याला जाळायची.

एक दिवस अचानक तो ‘आर्किमिडिज’प्रमाणे ‘युरेका - युरेका’ म्हणतच माझ्याकडे आला. त्याने माझ्या कानावर बातमी घातली ती अशी- खादी बोर्डात एक मेहरुन्निसा नावाची मुलगी आहे. ज्या अर्थी खादी बोर्डात लागली आहे, त्याअर्थी ती किमान मॅट्रिक असणारच- वगैरे. ‘पुढे प्रगती?’ होईल, म्हणाला. पण आपल्यासाठी खुदाने मुलगी निर्माण केली आहे, हे काय कमी आहे? त्यानंतर एक दिवस तो फोर्टात मिस्त्री भवनमध्ये जिथे खादी बोर्ड होते, त्याच्या टेरेसवर तिच्याशी दोन-तीन तास प्रेमालाप करून आला. त्याने आपण बाजी मारल्याचा किस्सा सांगितला. त्या वेळी मी हा फटकळ आणि बेछूट असामी एका तरुण मुलीशी प्रेमालाप कसा करत असेल, हे चित्र डोळ्यांसमोर उभं करत होतो. काही केल्या ते चित्र डोळ्यांसमोर उभे राहिना. एकूण हमीद लग्न करत होता.

हमीदचे लग्न म्हणजे ते साधेसुधे अन्‌ मिळमिळीत कसे होईल? काही तरी त्याला झणझणीतपणा हवाच होता. मेहरुन्निसाच्या सग्यासोयऱ्यांनी हमीदला नापास केले होते. आता हमीद एलेमेंटस्‌मध्ये आला. काही तरी विरोध होतो आहे, कोणी तरी आपल्यासमोर लढण्यासाठी उभा राहिलाय हे पाहिलं की, हमीदमधील लढवय्याचे सगळे गुण उफाळून यायचे. त्या वेळी हमीदची सासुरवाडी दादर (सेंट्रल रेल्वे) स्टेशनजवळच्या त्या बकाल वस्तीत होती. मी नायगावला स्प्रिंग मिलमध्ये कामाला. हमीदला माझ्याकडे यायचं म्हणजे, सासुरवाडी समोरून यावं लागत असे. हमीदचा मी मित्र असल्यामुळे त्या वस्तीसमोरून जाताना माझ्याही कण्यातून एक थंडगार शिरशिरी जात असे. एक दिवस एका असामीने हमीदची गर्दन गप्‌कन धरली. झाले- त्याच्याशी झटापट करून हमीद निसटला आणि माझ्याकडे आला. त्याची तोळामासा प्रकृती त्या दिवशी संतापाने पेटली होती. जीभ चाबकाप्रमाणे सपासप चालली होती. 

मेहरुन्निसा धीराची. तिने हमीदला वरले होते, म्हणजे वरले होते. लग्नाचा दिवस ठरला. त्या वेळी आपले दुष्मन आपल्या वाटेमध्ये काय काय अडचणी आणतील, या शंकांनी हमीद घेरलेला असे. अखेर मेहरुन्निसा घरातून बाहेर पडली, शादी नीटपणे झाली. हमीद आणि मेहरुन्निसा मुंबईच्या एका उंच शिखरावर अँटॉप हिलवर पोहोचले. ते एक मुसलमान होस्टेल असावे. एक दिवस हमीद मला पाहुणचारासाठी घेऊन गेला. हमीद नेहमीच अशा भलत्याच वैराण ठिकाणी राहायचा. प्रथम जोगेश्वरी स्टेशनपासून ओशिवरा येथे भन्नाट रस्त्यावर एकच एक दलवायांची बंगली होती. तिथे तो राहायचा. आता अँटॉप हिलवर ह्या नवपरिणत युगुलाचा तो संसार पाहण्यासाठी मला अक्षरश: तंगड्या तोडाव्या लागल्या. पण वर गेल्यावर बरं वाटलं. मला मुसलमानांच्या संस्कृतीचे एक आकर्षण नेहमीच वाटले. ते म्हणजे, त्यांच्या देवाच्या घरात भरपूर मोकळी जागा ठेवतात. मला आता ते घर संपूर्ण आठवत नाही, पण खूप मोकळे वाटत होते. माझ्या स्वागतासाठी चहा व भजी होती आणि मी त्यांना कसलेच प्रेझेंट घेऊन गेलो नव्हतो. आपल्या सुखी संसाराविषयी सांगण्याऐवजी त्या दोघांनी दुष्मनाच्या हालचाली इतक्या ऐकवल्या की, त्या रीत्या जागेच्या भिंतींना कान तर नाहीत ना, असे मला भय वाटू लागले.

अखेर हमीदची आणि सग्यासोयऱ्यांची गोडी झाली असावी. हमीद आणि मेहरुन्निसाबाई They lived happily everafter असे जीवन जगू लागली होती. धर्मेच म्हणजे सत्यशोधक समाजाच्या कार्यात व अर्थेच- कारण मेहरुन्निसाही नोकरी करत होती. दोघांनी परस्परांना चांगलीच साथ दिली. हमीदने काढलेला पहिला मुस्लिम स्त्रियांचा मूक मोर्चा आठवतो. एक हमीद आणि पाच मुस्लिम बायका मागे. प्रत्येकाच्या हातात एक एक घोषणा- फलक. एकूण असा मोर्चा काढायला, नव्हे तर, त्यात सहभागी व्हायलाही हिंमत असावी लागते. मेहरुन्निसाबाई त्यांत एक होत्या. मी हमीदची बायको असतो, तर त्या मोर्चात मुळीच गेलो नसतो.

‘डोंबाऱ्याचा खेळ’ ही माझी पहिली कादंबरी हमीदच्या पहिल्या पुस्तकाच्या आधी आली. एक प्रकारे मी शर्यतीत आघाडीच मिळवली होती. लेखकाचे पहिले पुस्तक त्याच्या वाङ्‌मयीन जीवनातील घटना असते. माझ्यापेक्षा सीनिअर असलेले हमीद, दिलीप चित्रे यांची पुस्तके रेंगाळली आणि त्यामुळे त्यांच्या लिखाणावर लक्षणीय परिणाम झाला, असे माझे मत आहे. माझी स्प्रिंग मिलमधील नोकरीही याच वेळी संपली. हमीद त्या वेळी मला ना.वि. काकतकर संपादन करत असलेल्या ‘रहस्य-रंजन’ मासिकाच्या फोर्टमधील कचेरीत घेऊन गेला. तिथे माझी अशोक शहाणेशी गाठ पडली. अशोक शहाणे ‘डोंबाऱ्याचा खेळ’ वाचत होता. त्याने पुढील अंकातच माझ्यावर फर्मास परीक्षण लिहून मला आघाडीच्या लेखकांत नेऊन बसवले. त्यामुळे माझी हस्तरेषाच बदलून गेली. आतापर्यंत मी एक पाय राजकारणात आणि एक पाय लेखनात, अशी वाटचाल करत होतो; पण मी आता राजकारणातून माझा पाय उचलून फक्त लेखनाच्या दगडावर ठेवायचे ठरवले. माझ्या पुस्तकानंतर लगोलग हमीदचा ‘लाट’ हा कथासंग्रह अशोकच्या हातात दिसू लागला. ‘लाट’वर अशोकने लिहिलेल्या परीक्षणाचे हस्तलिखित मला वाचायला मिळाले. त्याने हमीदचे पुस्तक झोडून काढले. मला त्यामुळे फारच वाईट वाटले. मी अशोकला म्हणालो, ‘‘तुला काय म्हणायचे आहे? हमीद चांगला लिहित नाही का? हमीदचे अनुभव किती समृद्ध आहेत ना!’’

‘‘आहेत ना! मला ठाऊक आहे. त्याच्याजवळ अनुभवांचा खूप साठा आहे. पण त्यापैकी लेखनात काहीच उतरत नाही.’’ अशोकच्या परीक्षणानंतर हमीदची हस्तरेषाही बदलली असावी. त्या परीक्षणामुळे तो नक्कीच दु:खी झाला असावा, पण त्याला इलाज नव्हता. त्या परीक्षणानंतर हमीद लेखनातून आपला पाय उचलून राजकारणात हळूहळू ठेवतो आहे, असा भास झाला.

हमीदचे त्यानंतरचे पुस्तक ‘इंधन’. त्याच्यावर मी ‘नवशक्ती’मध्ये चांगले परीक्षण लिहिले असले, तरी मी हमीदकडून अधिक जोरदार लेखनाची अपेक्षा करत होतो. हमीद जी माणसं पाहत असे - ज्या घटना पाहत असे, ती उघडी दिसतील अशा पद्धतीने त्यांचा आपल्या लिखाणात उपयोग करायचा. ‘इंधन’मधल्या व्यक्तीमुळे चिपळूणमध्ये निदर्शने झाली, ती त्यामुळेच. हमीदच्या ‘इंधन’ला राज्य पारितोषिक मिळाले, त्याच वेळी वासूनाक्याचे वादळही उठले होते. आचार्य अत्रे माझ्यावर जोरात हल्ले करत होते. एक दिवस हमीदचा मला फोन आला. तो म्हणाला, ‘‘मी आणि शिरीष पै, साहेबांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो आहोत. तू अस्वस्थ होऊ नकोस.’’ वगैरे.

हमीदने ‘इंधन’नंतर मराठी साहित्यात काही भर टाकली नाही किंवा मराठी साहित्यात कोकणचा मुसलमान आणला नाही वगैरे- म्हणून काहीच बिघडले नाही- अर्थात, त्याचे; मराठी साहित्याचे नव्हे! मराठी साहित्यात आता प्रादेशिक कादंबऱ्यांची पहाट झोपडपट्टी, वासूनाक्याची दुपार आणि कोसला व बॅ.धोपेश्वरकर यांची संध्याकाळ संपून चक्क भयाण रात्र सुरू झाली होती. या रात्रीमध्ये मलाही चांगली प्रसिद्धी मिळाल्यानंतर फारसा इंटरेस्ट राहिला नव्हता. आता साहित्याच्या माध्यमापेक्षा चित्रपटाच्या माध्यमांतच काही करता आले तर ते बरे, असे मला वाटू लागले होते. मग उगीच या साहित्याच्या अंधारमय जीवनात ठेचकाळण्यापेक्षा हमीद मुसलमानांमध्ये सुधारणेचे कार्य करू लागला. त्यामुळे त्याचे कर्तृत्वही प्रकाशात आले.

मी हिंदू-मुसलमान वाद मानत नव्हतो. त्यामुळे रॉड स्टीगर या गोऱ्या नटाला ज्याप्रमाणे काळ्या सिडने पोशिएने म्हणे वर्णभेदाचे स्वरूप समजावून दिले, त्याचप्रमाणे मला हमीदने या जातीयवादाचे स्वरूप समजावून दिले. आम्ही सेवादलवाले काय किंवा राष्ट्रीय चळवळवाले काय, एखाद्या हिंदूलाच मुसलमानी टोपी चढवून, दाढी चिकटवून आणि लुंगी नेसवून दुसऱ्या हिंदूचा हातात हात धरून ‘हिंदू- मुसलमान भाई भाई’ म्हणून घोषणा देत होतो. त्या बकवास होत्या, हे हमीदमुळे मला समजले.

पुढे ‘नवशक्ती’मध्ये असताना हमीदच्या चळवळींना पाठिंबा देण्याचे आमचे धोरणच होते. हमीद ज्या ‘दै. मराठा’त काम करत होता, त्या मराठापेक्षा नवशक्तीने हमीदचा पाठपुरावा केला. हमीदच्या साऱ्या चळवळींचे रिपोर्टिंग करणे माझ्याकडेच असे. त्याचे पुस्तक आले की, त्याच्यावर परीक्षणे लिहिणेही माझ्यावरच सोपवले जाई.

हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या प्रश्नाला हमीदने एक वेगळा, अधिक तर्कशुद्ध आणि धडाडीचा दृष्टिकोन दिला, यात शंका नाही. मला एकदा तो म्हणाला होता, ‘‘काय तुम्ही डरपोक हिंदू. तुम्ही चाळीस कोटी असून, आठ कोटी मुसलमान तुम्हाला टरकवतात!’’ त्या वेळी मला माझे बालपण आठवले. लहानपणी आम्हाला ज्याने-त्याने मुसलमानाचा बागुलबुवा दाखवावा. त्यामुळे आम्ही टरकू बनलेले- आता मोठेपणी मग आर. एस्‌. एस्‌. मध्ये जाऊन आणि हिंदू महासभेत जाऊन आमची भीती कशी जाणार? अर्थात, मुस्लिमांच्या प्रश्नाबाबत माझा इंटरेस्ट यथातथाच होता. हमीद म्हणजे, त्याच्या न लिहिलेल्या कादंबरीच्या नावाप्रमाणे मुसलमानांच्या प्रश्नाने पछाडलेला होता. त्याचे  ते पाकिस्तान दौरे, जयप्रकाशांपासून बाळ ठाकऱ्यांपर्यंत ज्या-त्या पुढाऱ्याला हिंदू-मुस्लिम प्रश्नाबाबत समज देण्याची धडपड, बुजुर्ग नेते एम्‌. हॅरिस यांच्याशी सवाल, जबाब- अशी सारखी धुमश्चक्री चालली होती. त्या वेळी मुंबईमध्ये युवक क्रांती दल ऊर्फ यूक्रांद ही संस्था हमीदच्या कार्याचा पाठपुरावा करायची. हमीदला युक्रांद आणि युक्रांदला हमीद असे समीकरण झाले होते.

एकदा दादरच्या साने गुरुजी विद्यामंदिरात युक्रांद आणि जनसंघाच्या विद्यार्थी परिषदेचे तद्दन confrontation झाले होते. हमीदचे भाषण ऐकण्याचा त्या वेळी मला प्रथम योग आला होता. मला पूर्वी नेहमी वाटायचं की, हमीद बोलण्यात माझ्यासारखाच आहे. व्याख्याने टाळणारा. पण आता हमीद चांगलाच बोलायला शिकला होता. त्याच्या भाषणाचा रिपोर्ट देताना हमीदने विद्यार्थी परिषदेचा धुव्वा उडवला म्हणून मी लिहिले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते माझ्यामागे लागले होते. हमीदच्या ह्या भाषणावर दुसरीकडे लिहिताना मी कॉमेंट्‌स केल्या. ‘हमीदचे भाषण म्हणजे, पैगंबरापासून औरंगजेबापर्यंतचा इतिहास ऐकावा लागतो!’ त्यानंतर हमीद मला भेटला तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘आज माझं अमुक तमुक ठिकाणी भाषण आहे; मी पुन्हा पैगंबरापासून औरंगजेबापर्यंतचा इतिहास सांगणार आहे. ये, तुझा इतिहास पक्का होईल.’’ हमीदबरोबर पूर्वीप्रमाणे दिलखुलासपणे बोलायचा माझा हा अखेरचा प्रसंग.

त्यानंतर हमीद एका चळवळीचा पूर्ण नेता झाल्याचे दृश्य पाहण्याचा योग आला. मराठा मंदिर येथे भरलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या परिषदेत. मुस्लिम सत्यशोधक ह्या चळवळीने आता विचारात येण्याइतके मोठे स्वरूप धारण केले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते, अनेक मुसलमान महिला आणि चळवळीच्या अग्रस्थानी हमीद विराजमान झालाय. एक विचारवंत, धडाडीचा मुत्सद्दी आणि आपले सर्वस्व त्या चळवळीमध्ये झोकून देणारा लढवय्या. अचानक त्याचा जीवनपट माझ्या डोळ्यांसमोरून हलला. लहान मुलाने हातातला रंगीत गॅसचा फुगा हवेत सोडून द्यावा आणि त्याचा अस्मानात क्षणोक्षणी उंच जाणारा प्रवास कुतूहलाने पाहत राहावा, त्याप्रमाणे परिषदेच्या कोपऱ्यामध्ये बसून मी हमीदकडे पाहत होतो. इतक्यात दोन कार्यकर्ते आले आणि त्यांनी मला उचलून पत्रकारांच्या रांगेत नेऊन बसवले.

त्यानंतर माझ्या नि हमीदच्या मुलाखती कमी. हमीदला आमच्यासारखे वेगवेगळ्या विषयांत इंटरेस्ट नाहीत आणि मुस्लिम चळवळीमध्ये त्याने लक्ष घातल्यामुळे तो पछाडल्यासारखाच वागत होता. एकदा मी चक्क त्याच्याबरोबर चर्चगेट ते बांद्रा हा प्रवास केला. या प्रवासामध्ये तो इतका काही आपल्या विचारात गढला होता की, मला तो विसरलाच होता. दुसरी गोष्ट, माझ्या लक्षात आली होती- ती म्हणजे, तो सतत अस्थिर होता. आपले हात, बोटे व भिवया अशा काही हलवायचा की, मलाही बेचैन वाटू लागले. बांद्रा येताच मी त्याचा निरोप न घेताच उतरलो- त्या वेळी माझ्यावरचे एक दडपण दूर झाल्यासारखे वाटले. मुंबई हे एक दुरावा निर्माण करणारे शहर आहे. एखाद्या क्यूमध्ये अधिकाधिक माणसे घुसू लागली म्हणजे आपण जसे दूर फेकले जातो, तसे मुंबईमध्ये आपण एकमेकांपासून दूर फेकले जातो. हमीदला मी अलीकडे भेटत नसे. मी अतिशय आळशी, एकलकोंड्या आणि माणूसघाण्या झालो होतो. मुंबईमध्ये मधुमेह आणि हे स्वभावदोष एकदम येतात. मला आठवते- एकदा मी मेहरुन्निसा भाभीला चलाखीने टाळून सटकण्याचा प्रयत्न करत होतो, पण भाभीने मला पकडून चांगलेच शरमिंदा केले होते. हमीदपासून मी दूर गेलो, याच्याबद्दलही मला अशीच शरमिंदगी वाटते...

परवा हमीद गेल्याचे वृत्त आले. तेव्हा एक मित्र, हमीदचे कुठल्या मशिदीमध्ये दफन होणार याची माहिती काढण्यासाठी फोनवर फोन करत होता. अखेर तो ‘झूम’च्या कचेरीमध्ये आला नि मला म्हणाला, ‘‘काही कळत नाही, हमीदला कुठे नेला ते?’’ मी म्हणालो, ‘‘त्याला चंदनवाडीत इलेक्ट्रिक भट्टीत नेण्यात आले आहे. जा तिथे.’’ तो म्हणाला, ‘‘तू चौकशी केलीस का?’’ मी म्हणालो, ‘‘नाही, पण मला ठाऊक आहे.’’ हमीद निरीश्वरवादी होता. तो ज्या आपत्तीशी झगडला, तशा आपत्तीत निरीश्वरवादी राहणे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यात तो धर्माने मुसलमान. आमच्या वयाच्या लोकांना फालतू सांसारिक आपत्तींना तोंड देता-देता सिद्धिविनायकाला आणि शिर्डीला शरण जाताना मी पाहिले आहे. डॉ.लोहियांच्या मृत्यूनंतर अत्यंत साधेपणाने आणि कसलेही धार्मिक विधी न करता हमीदचे दहन झाले. हमीदच्या सर्व सत्यशोधक चळवळींपेक्षा त्याचे निर्वाणच मला स्पर्शून गेले.

०००

मूळ प्रकाशित: 'सोबत' साप्ताहिक, ७ जून १९७७. पुनर्प्रकाशित: 'साधना' साप्ताहिक, १५ ऑगस्ट २०१५.

Tuesday, October 20, 2020

हमीद दलवाईंवरील एक माहितीपट


ज्योती सुभाष यांनी दिग्दर्शित केलेला हमीद दलवाईंवरचा माहितीपट यू-ट्यूबव १६ ऑक्टोबर २०२० रोजी अपलोड झाल्याचं दिसलं, तो इथे यू-ट्यूबद्वारेच जोडला आहे. 

Monday, January 16, 2017

हमीद दलवाईंची एक मुलाखत

हमीद दलवाई
हमीद दलवाई यांना 'महाराष्ट्र फाउंडेशन'नं २०१६ सालचा समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार मरणोत्तर दिला. या पुरस्कारांच्या निमित्तानं 'साधना' साप्ताहिकानं १४ जानेवारी २०१७चा विशेषांक प्रसिद्ध केला. त्या अंकात हमीद दलवाई यांची 'मनोहर' साप्ताहिकाच्या वाचकांनी घेतलेली एक जुनी मुलाखत पुन्हा प्रकाशित करण्यात आली.  ती इथं नोंदवली आहे (ती या ब्लॉगसाठी युनिकोडमधे पुन्हा टाइप केली). मुळात ती 'मनोहर'च्या २६ ऑगस्ट १९७३च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. सोबत चिकटवलेला दलवाईंचा फोटो 'साधने'च्या इथं उल्लेखित अंकात आला होता.



मुलाखत

प्रकाश भागवत (यवतमाळ): जातीय दंलगींना मुख्यतः कोण जबाबदार आहे?
- जातीय दंगलींना बरेचदा मुसलमान आणि अनेकदा हिंदू जबाबदार असतात.

मेधा गोळवलकर (दादर): आपल्या विचारसरणीत आणि भारतीय जनसंघाच्या ध्येयधोरणात काय मतभेद आहेत?
- मला गोहत्याबंदी साफ अमान्य आहे. व्यक्तीच्या समानतेवर नवी समाजरचना अस्तित्वात यावी असे मला वाटते. अलीगड व बनारस या विद्यापीठांच्या नावातून अनुक्रमे मुस्लिम व हिंदू हे शब्द गाळण्यात यावे व ती राष्ट्रीय विद्यापीठे म्हणून घोषितकरावीत असेही माझे मत आहे. स्त्रियांना पुरुषांइतकेच समान अधिकार असावेत म्हणून मी समान नागरी कायद्याचा गेली काही वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. सर्वांनीच कुटुंबनियोजन करावे, इतकेच नव्हे तर, ते सर्वांना सक्तीचे व्हावे असे माझे मत आहे. थोडक्यात या देशाचे शासकीय निर्णय कुठल्याही धर्मसमुदायाला काय प्रिय किंवा अप्रिय आहे किंवा काय मंजूर किंवा नामंजूर आहे, यावरून न ठरवता, या देशातील कोट्यवधी जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीकरता काय आवश्यक आहे याचा विचार करून ठरविले जावे असे मला वाटते. जनसंघाचे यासंबंधी कोणते धोरण आहे हे आपल्याला या पक्षाच्या ध्येयधोरणविषयक सिद्धांतात सापडू शकेल. मेधाबाई, आमच्यातील मतभेद हुडकून काढणे आपल्याला वरीस उत्तरावरून सोपे जाईल, अशी मी आशा बाळगतो.

अशोक परब (जोगेश्वरी): आंतरजातीय विवाहाबद्दल आपले प्रामाणिक मत काय?
- आंतरजातीय विवाह ज्यांना करायचे असतील त्यांना अनिर्बंधपणे करता आले पाहिजेत असे माझे मत आहे. विवाह ही व्यक्तिगत बाब आहे, त्यात इतरांनी लुडबूड करू नये असे मी मानतो.
मी मांडीत असलेली सर्वच मते प्रामाणिक असल्यामुळे माझे हे मत प्रामाणिक आहे, हे लिहायची आवश्यकता नाही असे मला वाटते.

रमेश उदारे (मुंबई): 'जो मूर्तिपूजक त्याचा समूळ नाश करा' असं विधान कुराणात आहे का?
- आपण म्हणता तसे विधान नाही. मात्र मूर्तिपूजकांवर, त्यांना अवमानीत करण्यासाठी कर लावावा असे एक विधान आहे. यातूनच 'जिझिया' कराचा जन्म झाला आहे.
वास्तविक कुराणामध्ये काय लिहिले आहे, यापेक्षा आपण आत्ता मानवी संबंध कोणत्या पातळीवर ठेवायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा प्रकारची सामाजिक असमतेचा पुरस्कार करणारा विधाने सर्वच धर्मशास्त्रात आढळतील. मनुस्मृतीनेदेखील स्त्रियांना आणि कनिष्ठ वर्गीयांना समान स्थान दिलेले नाही.  आता भारतीय समाज मनुस्मृती अथवा कुराणचे आदेश यावर आधारलेले राहणार नाही. भारतीय समाजाची जडणघडण सर्व व्यक्तींच्या समानतेवर आधारलेली असेल, हे हिंदू आणि मुसलमान या दोहोंनी ओळखणे आवश्यक आहे.

अ. रा. कस्तुरे (गुलटेकडी): भारताबाहेर मुस्लिम आणि मुस्लिमेतरांचे संबंध कसे काय आहेत?
- काही ठिकाणी चांगले आहेत. काही ठिकाणी वाईट आहेत. उदा. इंडोनेशियात ख्रिश्चन, बौद्ध व हिंदू अल्पसंख्याक आहेत, पण तेथे धार्मिक तणाव नाहीत. मलेशिया, तुर्कस्तान, लेबेनान, ट्युनिशिया इत्यादी देशांत बिगरमुस्लिम अल्पसंख्याक राहतात आणि त्यांचे संबंध चांगले आहेत. काही अरब देशांतून ज्यू आणि ख्रिश्चन यांची हकालपट्टी झालेली आहे. बांगलादेशामध्ये आता हिंदू अल्पसंख्याकांना सुरक्षितता लाभलेली आहे असे हे चित्र आहे.

महादेव कोकाटे, चंद्रकांत धर्माधिकारी (अंधेरी): जातीयवादी मुसलमानांची संख्या वाढताच भारतात पुन्हा नव्या 'पाक'ची मागणी होण्याची शक्यता आहे, असं आपल्याला नाही का वाटत?
- जातीयवादी मुसलमान कोणती मागणी करतील यासंबंधी आपण फारशी चिंता बाळगण्याचे कारण नाही. ते 'भेंडीबाजारात पाकिस्तान हवे' असेसुद्धा सांगतील. त्यांनी अशी मागणी केल्यामुळे तसे काही आता घडण्याची शक्यता आहे असे समजणे बरोबर ठरणार नाही. एक तर आता वेगळे राष्ट्र द्यायला परकीय सत्ता अस्तित्वात नाही आणि मुस्लिम बहुसंख्याकांचे राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक तेवढे मोठे प्रदेश अस्तित्वात नाहीत.

महंमद समी कॉन्ट्रॅक्टर (औरंगाबाद): आपण स्वतःला मुसलमान समजता का? असल्यास नमाज, रोजा, कुराण आणि आखीरत याबद्दल आपली धारणा काय आहे?
- मी नमाज पढत नाही, उपवास करीत नाही. कारण हे ईश्वरनिर्मित नसून महंमदनिर्मित आहे असे मी मानतो. यामुळे आखीरतवर माझा विश्वास नाही, हे ओघानेच आले. आणि तरीही मी मुसलमान आहे, कारण मी मुस्लिम समाजात जन्माला आलो आहे. नेहरू निरीश्वरवादी होते आणि तरीही ज्या अर्थाने हिंदू होते, त्या अर्थाने मी मुसलमान आहे. कारण मुस्लिम अथवा हिंदू असणे याची केवळ पोथीबद्ध व्याख्या मी मान्य करीत नाही. ती अधिक व्यापक आहे असे मी मानतो.

बाळ जांभेकर (वसई): तुमचे राजकीय गुरू कोण? तसेच बाळ ठाकऱ्यांप्रमाणे तुमच्याबरोबर शरीररक्षक असतात काय?
- माझा राजकीय गुरू मीच. शरीररक्षक ठेवायला पैसा कुठे आहे?

गुलाम अहमद (औरंगाबाद): महाराष्ट्रातील दहा टक्केच मुस्लिम मराठी भाषा समाजतात. तरी तुम्ही तुमचं कार्य मराठीतून का करता?
- महाराष्ट्रातील नव्वद टक्के मुसलमान मराठी समजतात. फक्त शहरी विभागातील दहा टक्के मुसलमान मोडकेतोडगे उर्दू जाणतात. हे उर्दूदेखील 'धावत धावत म्हावर लानेको गया' किंवा 'झाडावरनं पडल्याबरोबर पाव फुट्या' अशा पद्धतीचे उर्दू बोलतात. हे उर्दू ऐकून लखनौच्या उर्दू भाषिकाला चक्क मूर्च्छाच येत असेल!
गुलाम अहमदभाई, आमचे कार्य आम्ही मराठीत का करतो, हे आता आपल्या लक्षात आले ना?

सुधीरकुमार आचार्य (कल्याण): समाजसुधारणेच्या कार्यक्रमात आपणास आपल्या कुटुंबीयांचे साह्य कितपत मिळते?
- अनेक प्रकारे मिळते. कुटुंबीय म्हणजे कोण, हे आपण स्पष्ट केलेले नाही. माझी पत्नी नोकरी करून द्रव्यार्जन करते आणि पर्यायाने माझ्यावरील कौटुंबिक जबाबदारीचा भार कमी करते, हेही मोठेच साह्य आहे असे मी मानतो.

स्वामीप्रसाद पंडित (पिंपरी): सर्जनशील लेखक राजकारणात पडल्यास त्याला ते कितपत साधेल? आपण एक समर्थ ललित लेखक आहात, सध्या ललित लेखन सोडले का?
- राजकारण मला कितपत साधले आहे यावरून आपणच आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधणे योग्य ठरेल. ललित लेखनाला पुरेशी मनाची उसंत मिळत नाही. त्याची खंतही वाटते. खंत वाटणे ही बाब कदाचित मी पुन्हा ललित लेखन करू शकेन असा दिलासा आपल्याला द्यायला तूर्त पुरेशी आहे.

मीनाक्षी ताटके (पुणे): आपली स्वतःची धर्माबद्दलची मते जी काही आहेत, ती घरातील सर्व मंडळींना विशेषतः आई, वडील, पत्नी, मुले यांना पटतात का?
- पटतातच असे नव्हे, पटावीत असा माझा आग्रहही नसतो. त्यांचा दृष्टिकोन त्यांनी माझ्यावर लादू नये. प्रत्येकाला धार्मिक मतस्वातंत्र्य असावे, असे मी मानतो. या दृष्टीने आम्ही आमच्या घरात लोकशाही स्वातंत्र्य अंमलात आणले असून, शांततामय सहजीवनाचे युग सुरू केले आहे. आपण हा प्रयोग करून पहायला काही हरकत नाही.

शेख सिराज अहमद (समशेरपूर): महाराष्ट्रातील बहुसंख्य मुस्लिम समाज ग्रामीण भागात राहात असताना, सत्यशोधक समाज शहरी भागात का?
- कुठलीही चळवळ प्रथम शहरात सुरू होते. मागाहून ती ग्रामीण भागात पसरते. आमची चळवळ आता सुरू झाली आहे. ती वाढेल तशी ग्रामीण भागात पसरेल. सध्या ती शहरातच का, याचे उत्तर आपल्याला सापडले ना?

संजीव पोहेकर (बुलढाणा): जर तुम्हाला 'ब्लॅक डिसेंबर'ने खुनाची धमकी दिली तर तुम्ही काय कराल?
- तुम्हाला मदतीला बोलावेन!

अरुण चव्हाण (सातारा): हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे आज भारतात मुसलमान सर्वसाधारणपणे सुखाने कालक्रमणा करीत असताना, मुसलमान समाज आपल्यात एकरूप का होऊ शकत नाही?
- या प्रश्नाचे समग्र उत्तर द्यायला एक प्रबंधच लिहावा लागेल. मुस्लिम समाजातील विभक्तवादी चळवळी त्या समाजाला एकरूप होऊन देत नाहीत, हे आपल्या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर होऊ शकेल. पण हिंदूंना आधुनिक बनवूनच मुस्लिम समाजातील विभक्ततावाद मोडावा लागेल.

सुधाकर जोशी (जामनेर): राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीय आहे काय?
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीय आहे, असा त्यांच्या प्रवक्त्यांचाच दावा आहे. संघाच्या नेत्यांची भाषणे, त्यांचे लिखाण आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेली भूमिका यावरून आपल्याला याची प्रचिती येईल.

विश्वास डिग्गीकर (उमरगा): राजकारणातील चांगली माणसे आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेली क्वचितच आढळतात, म्हणून विचारतो आपल्या उपजीविकेची साधने कोणती?
- मला सी.आय.ए. (अमेरिकन गुप्तहेर संघटना), के.जी.बी. (रशियन गुप्तहेर संघटना), ख्रिश्चन धर्मोपदेशक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, तसेच पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्या परस्परविरोधी विचारसरणीच्या व्यक्ती व संघटना यांच्याकडून पैसा पुरविण्यात येतो, असे मुस्लिम जातीयवाद्यांचे म्हणणे आहे. तर मी पाकिस्तानचा छुपा हस्तक असून, याह्याखान व सध्या झुल्फिकार अली भुट्टो मला पैसा पुरवतात, असे काही निवडक हिंदुत्ववादी आपसात कुजबुजत असतात.
वस्तुस्थिती अशी आहे की, मी 'इंडियन सेक्युलर सोसायटी'चा पूर्णवेळ कार्यकर्ता असून, सोसायटीकडून उपजीविकेला आवश्यक तेवढे मानधन घेतो. तसेच माझी पत्नी नोकरी करते व मुंबईच्या उपनगरात एका चाळीवजा डबल रूममध्ये मी राहतो. देणग्या मिळवून तसेच काही कार्यक्रमाच्या निमित्ताने स्मरणिकाद्वारा जाहिराती मिळवून आम्ही सोसायटीला आर्थिक साहाय्य मिळवतो.
विश्वासराव, आपला माझ्यावर विश्वास असेल असे समजून माझ्या उपजीविकेविषयी आपले मत बनविणे, मी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोपवतो.

व्यंकटेश लिगदे (मुंबई): सर्वांसाठी समान नागरी कायदा इंदिरा सरकार का लागू करत नाही? 'एकगठ्ठा' मतासाठी मुसलमानांच्या 'शरियत'मध्ये बदल करणार नाही असे काँग्रेसवाले म्हणतात, ते खरं आहे काय?
- आपण एकूण दोन प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न तुम्ही इंदिरा गांधींना विचारणे बरे! 'एक गठ्ठा' मतासंबंधीचे आपले मत खरे आहे, परंतु काँग्रेसचे नेते 'आम्ही मुस्लिम कायद्यात सध्या बदल करणार नाही' असे म्हणत असतात. यातील 'मुस्लिम कायद्यात' आणि 'सध्या' हे काँग्रेसजनांचे दोन शब्दप्रयोग फार महत्त्वाचे आहेत. भारतात मुसलमानांना 'मुस्लिम कायदा' अस्तित्वात आहे, 'शरियत' नव्हे. शरियत सौदी अरेबिया वगळता इतर कुठेच अस्तित्वात नाही. आणि 'सध्या कायदा करणार नाही' याचा अर्थ, वेळ येताच करू असा मी तरी घेतो.

दिलीपकुमार पाटणेकर (चिपळूण): हमीदभाई, मुस्लिम लीग ही मुसलमानांना शाप आहे की वरदान?
- शाप! केवळ मुसलमानांनाच नव्हे तर हिंदूंना, तसेच आपल्या देशालाही तो शापच आहे असे मी समजतो.

सुबोध वि. थरवळ (खेड, रत्नागिरी): इस्लाम हा जास्तीत जास्त लोकशाहीवादी आणि समताप्रधान धर्म आहे. आपले मत काय?
- कुठलाच धर्म लोकशाहीवादी तसेच समतावादी नाही. इस्लामही ह्याला अपवाद नाही. धर्म आध्यात्मिक पायावर समाजाती उभारणी करीत असतात. ते मध्ययुगीन आहेत आणि लोकशाही, स्वातंत्र्य, समानता या आधुनिक कल्पना आहेत. धर्माच्या पायावर आता सुसंस्कृत समाजव्यवस्था निर्माण होऊ शकणार नाही, हे आपण सगळ्यांनी ओळखले पाहिजे.

दिगंबर पाठक (अमरावती): आपण नेहमी हिंदू-मुसलमान ऐक्याबद्दल लिहिता-बोलता, परंतु आजचा सुशिक्षित मुसलमान समाजसुद्धा भारताबद्दल आपुलकी जिव्हाळा दाखवावयास तयार नाही, हे बऱ्याच घटनांनी दाखवून दिलेले आहे. यावर आपले मत काय?
- मी काय मत सांगणार? भारतीय सुशिक्षित मुसलमान समाज भारताबद्दल जिव्हाळा दाखवत नाही, असे मीच अनेक उदाहरणे देऊन म्हटले आहे. आणि माझ्या या मताबद्दल माझे मत काय, असा प्रश्न आपण मला विचारता! इतका विनोदी प्रश्न विचारल्याबद्दल आपल्याला 'मनोहर'चे (ललित पद्धतीचे) 'नोबेल' पारितोषिक दिले पाहिजे, असे माझे मत आहे.

क्षमा तावडे (मुंबई): मुसलमान लोक कुटुंबनियोजनाला विरोध करतात, हा देशद्रोह नाही का?
- कुटुंबनियोजनाला सनातनी मुसलमान, कॅथॅलिक समाज, जनसंघाचे काही नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुरीचे शंकराचार्य आणि आचार्य विनोबा भावे इतक्यांचा विरोध आहे. ही सर्व मंडळी राष्ट्रद्रोही आहेत असे आपल्याला सुचवायचे आहे काय?
वस्तुतः या देशाच्या कोट्यवधी जनतेच्या आर्थिक उन्नतीकरता जी राष्ट्रीय धोरणे आपण आखली आहेत. ती सर्वांनी अंमलात आणली पाहिजेत असे माझे मत आहे. कुटुंबनियोजन हे त्यातील एक धोरण आहे. ते सर्वांना सक्तीचे केले पाहिजे असे मी मानतो.
त्याचबरोबर ज्या देशात भाकड गुरांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांची संख्या पद्धतशीरपणे तेहतीस टक्के कमी करण्याची जरूरी आहे, असे देशातील बहुसंख्याक शेती-अर्थतज्ज्ञ सांगत असताना गोहत्याबंदीचा पुरस्कार करणे हेही देशाच्या प्रगतीत खीळ घालणारे आहे, असे आपल्याला नाही का वाटत?

विनोद वि. तंब्रे (नाशिक): बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटते?
- बांगलादेश नुकताच स्वतंत्र झाला आहे आणि मुक्तिलढ्याच्या काळात तेथे प्रचंड विध्वंस होऊन चुकला आहे. यामुळेच तेथे सध्याचे अस्थिर वातावरण दिसते आहे. आर्थिक पुनर्रचनेचा वेग वाढला की,  तेथे हळूहळू राजकीय स्थैर्य प्राप्त होईल. आणि भारताशी त्याचे संबंध चांगले राहतील असेही मला वाटते.

श्यामकांत कुलकर्णी (मालेगाव): आपणास हिंदू होणे आवडेल काय?
- या आधी श्री. महंमद समी कॉन्ट्रॅक्टर यांनी विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेल्या उत्तराकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. मी जन्माने मुसलमान आहे आणि संस्कृतीने हिंदू आहे. त्यामुळे मी हिंदू अथवा मुसलमान न राहता, चांगला माणूस बनावे या माझ्या आंतरिक इच्छेकडे एक पाऊल तरी प्रगती केली आहे असे मला वाटते. कारण धर्म ही बाब आता रूढ अर्थाने कालबाह्य झाली आहे, असे मी समजतो.
श्यामकांतराव, याकरता तूर्त मला माणूस म्हणूनच राहू द्या! उगाच हिंदू-मुस्लिमात माझी ओढाताण करू नका!

सुलभा बाकरे (अमरावती): आपल्या कार्यत आपल्याला पदोपदी अपेक्षाभंग, अपमान, निराशा पदरी येत असेल. अशा वेळी माणसाला आपलं मन हलकं करायला, कुणाचा तरी आधार, सहानुभूती हवी असते, तर असे आपले आधारस्थान कोणते?
- मी या दृष्टीने खरोखरच कधी विचार केला नव्हता. आपली कल्पना चांगली आहे. मी तिच्यावर विचार करतो आहे.

रवींद्र अफझुलपूरकर (सोलापूर): केवळ ब्राह्मण, पारशी यांसारख्या अल्पसंख्या जाती सोडून इतर 'अल्प(?)संख्य' जातींबद्दल सरकारने जे धोरण अवलंबिले आहे, ते मुसलमानधर्जिणेच आहे. निधर्मी नव्हे, खरे की नाही?
- मुसलमानांकडे 'गठ्ठा' मते आहेत म्हणून सत्ताधारी पक्ष त्यांना सांभाळून घेते असे आपल्या प्रश्नांचे योग्य उत्तर ठरेल.

अनिल चनाखेरकर: बुद्धिवादी मुसलमान मध्यमवर्गीयांअभावी मुस्लिम समाजात वैचारिक क्रांती होणे अशक्यप्राय आहे. हा समाज निर्माण करण्यात आपण कशा दृष्टीने प्रयत्नशील आहात?
- मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्य हा अशा प्रकारचे वैचारिक नेतृत्व निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे.

गणेश परशुराम बावकर (दोनिवडे): मुल्लामौलवींना व धर्मांध मुस्लिम समाजाला उघडउघड सामोरे जाऊन नवीन मते प्रतिपादन करताना आपल्याला जीवाची भीती वाटत नाही?
- भीती वाटली असती तर मी हे काम केले असते असे आपल्याला वाटते काय?

Monday, July 22, 2013

हमीद दलवाई - नरहर कुरुंदकर

नरहर कुरुंदकरांचा हा लेख १९७९ साली 'हमीद' या पुस्तिकेसाठी लिहिलेला, नंतर तो कुरुंदकरांच्या 'वाटचाल' या पुस्तकातही होता. जुलै २०१३मध्ये कुरुंदकरांच्या लेखनाचा पहिला निवडक खंड 'व्यक्तिवेध' प्रकाशित झाला. (संपादन - विनोद शिरसाठ. प्रकाशक - देशमुख आणि कंपनी). या पुस्तकातून संपादकांच्या परवानगीने हा लेख इथे नोंदवतो आहे.
***

हमीद दलवाई
हमीद दलवाई यांच्या निधनाला ३ मे १९७८ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. ३ मेला त्यांची प्रथम पुण्यतिथी येत आहे. या योगाचे निमित्त करून मुस्लिम राजकारणाचे विवेचन करणारी दलवाईंची एक जुनी पुस्तिका व अगदी शेवटच्या दिवसांतील त्यांची एक मुलाखत पुन्हा एकत्र करून पुनर्मुद्रित करण्यात येत आहे. दलवाई हे नानाविध कारणांनी आपली कर्मठ धर्मश्रद्धा टिकवून ठेवणाऱ्या मुस्लिम समाजात उदयाला आलेले लोकविलक्षण धडाडीचे आणि आपल्या लोकप्रियतेचा कोणत्याही क्षणी होम करण्यास तयार असलेले कार्यकर्ते होते. आधुनिक भारतीय राजकारणाच्या इतिहासात दलवाईंच्या इतका मूलगामी चिंतन करणारा निर्भय विचारवंत दुसरा नाही. महात्मा फुले यांच्या काळात त्यांचे कार्य जितके अवघड होते, त्यापेक्षाही दलवाईंचे काम काही बाबतीत अधिक कठीण होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली तर दलवाईंना त्यांच्या समाजातून फार मोठा प्रतिसाद कधीच का मिळू शकला नाही, यावर थोडासा प्रकाश पडेल. महात्मा फुले आणि हमीद दलवाई यांना समोरासमोर ठेवून विचार करताना माझ्यासमोर त्यांची तुलना करणे हा हेतू नाही. माझा हेतू अगदी मर्यादित आहे. आणि तो म्हणजे, मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजात दलवाईंना पाठिंबा मिळण्यास अडचण कोणती आली, या बाबींकडे लक्ष वेधणे. तेवढ्या सीमित प्रश्नापुरताच हा मुद्दा विचारात घ्यायचा आहे.

महात्मा फुले यांचा काळ कितीतरी जुना. जवळजवळ एका शतकाचे अंतर दोघांच्यामध्ये आहे. फुले यांच्या काळी हिंदू समाज आजच्या मानाने कितीतरी रूढीप्रिय, अंधश्रद्ध आणि परंपरावादी होता. पण हिंदू समाजाची रचना व जडण-घडण पुष्कळशी विस्कळित आणि विविधतेला वाव देणारी अशी आहे. वेगवेगळ्या जातीजमाती, चालीरीती, परस्परविरोधी (भिन्नभिन्न) विचार हिंदू समाजात नेहमीच वावरत आले. सुसंघटित व एक ग्रंथाचे प्रामाण्य मानणारा असा हिंदू समाज नव्हता; आजही नाही. विचार मांडण्याच्या बाबतीत खूप मोठे स्वातंत्र्य हिंदू समाजात राहत आले आणि सर्व विचारांना माना डोलवीत त्याच वेळी चिवटपणे आपला परंपरावाद जतन करण्याची हिंदू मनाची शक्तीही फार अफाट आहे. आजही महात्मा फुले यांचा पुरस्कार व जयजयकार करीत परंपरावाद जतन करण्याची मनोवृत्ती हिंदूंच्यामध्ये दिसते. महात्मा फुल्यांचे पुतळे उभे करणे, आपले महान नेते म्हणून त्यांना लक्ष अभिवादन करणे आणि आपले बुरसटलेले मन तसेच जतन करून ठेवणे, हे हिंदूंना अजिबात कठीण वाटत नाही. मुस्लिम समाज यापेक्षा निराळा आहे.

मुस्लिम समाजातही शिया-सुन्नींच्यासारखे मतभेद आहेत. त्याहून थोडे दूर असणारे अहमदियाही आहेत. पण हा फरक फारसा नाही. एक प्रेषित, एक धर्मग्रंथ यांमुळे आणि जवळपास एक असणाऱ्या कायद्यामुळे मुस्लिम धर्माचे स्वरूप हिंदूंच्या मानाने कितीतरी सुसंघटित आहे, आणि विचारस्वातंत्र्याची त्यांची परंपराही मर्यादित आहे. प्रेषित, कुराण आणि परंपरा यांचा मला परिपूर्ण पाठिंबा आहे असे मानणाऱ्या दोन माणसांत जितका मतभेद असू शकतो, तितकेच विचारस्वातंत्र्य मुस्लिम समाजात असे. एक विचार जाहीर रीतीने मान्य करायचा, तो विचार मांडणारा आपला नेता समजायचा व तरीही परंपरावादी मन जतन करायचे, असा दुटप्पीपणा मुस्लिम समाज फारसा पेलू शकत नाही. आचार-विचारस्वातंत्र्य यांची परंपरा नसणाऱ्या या समाजात दलवाई उदयाला आले होते. त्यामुळे फुले यांच्यापेक्षा त्यांच्या समोरच्या अडचणींचे स्वरूप उग्र होते, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.

दुसरी बाब अशी की, आपला पराभव झाला, आपले राज्य गेले त्या अर्थी आपल्या परंपरेतच काही मूलभूत चूक आहे, असे मानण्यास हिंदू समाज क्रमाने शिकत होते. आपल्या धर्माची, परंपरेची कठोर चिकित्सा करणारे लोक फुले यांच्या शेजारी होते. लोकहितवादी या मंडळींत सर्वांत महत्त्वाचे. आपला पराभव झाला, कारण आपल्या धर्मात, आपल्या परंपरेत, आपल्या समाजरचनेत काहीतरी उणिवा आहेत, असे मानण्याकडे हिंदू विचारवंतांचा कल दिसतो. म्हणून परंपरेच्या चुका दाखवणारा विचारवंत हिंदू समाजात आचारांचा मार्गदर्शक होत नसला तरी सभ्य ठरतो. मुस्लिम समाजालासुद्धा इंग्रजी राजवट आल्यामुळे आपला पराभव झाला, असे वाटतच होते. पण या पराभवाचे कारण आपल्या धर्मात अगर परंपरेत काही चूक आहे असे त्यांना वाटत नसे. आपला धर्म व परंपरा निर्दोष आहेत; पण या धर्मावर मुसलमानांची श्रद्धा पुरेशी बळकट नाही म्हणून आपला पराभव होतो असे या समाजातील नेत्यांना वाटे. इंग्रजी विद्या व ज्ञान यांविषयी आस्था असणारे सर सय्यद अहमदखानसुद्धा आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार करतात; स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार करतात, पण यापुढे जाऊन इस्लामची चिकित्सा ते करत नाहीत. ग्रंथप्रामाण्य झुगारून देऊन चिकित्सा करणारे पहिले मुस्लिम हमीद दलवाई हेच होत. दलवाईंची चिकित्सा ही नेहमीच मुसलमानांच्या हिताला बाधक आहे, असे त्यांच्या समाजाला वाटत आले. मुस्लिम समाजातील विचारवंतांचे मनच धर्माच्या चिकित्सेला फारसे तयार नसते. आजही ते तयार नाही. मुस्लिम समाजात राजकीय पराभव विचारवंतांना अधिक कर्मठ आणि परंपरावादी होण्याची प्रेरणा देतो, ही दलवाईंच्यासमोर दुसरी अडचण होती.

आमच्या देशातील पुरोगामी राजकारणाची एक शोकांतिका आहे. महात्मा फुले यांच्या काळी फुले यांच्या प्रयत्नाला इंग्रजांनी फार मोठा पाठिंबा दिला नसला तरी त्यांचे शाब्दिक कौतुक केले. त्यांच्या उपक्रमास गौरवपूर्वक सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्यावर इतरांना सरळसरळ आक्रमण करता येऊ नये याची शासनाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काळजी घेतली. दलवाईंच्या बाबतीत असे घडले नाही. पारतंत्र्याच्या काळात, इंग्रजांनी हिंदू-मुस्लिम मतभेदाचा फायदा घेऊ नये म्हणून मुसलमानांच्याविषयी फारसे बोलायचे नाही, होता होईतो त्यांच्या कर्मठपणाला पाठिंबाच द्यायचा, अशी आमच्या नेत्यांची पद्धत राहिली. पुरोगामी राजकीय नेता हिंदू समाजातील असेल तर तो हिंदू समाजातील परंपरावादावर कडाडून हल्ला करी; पण मुस्लिम समाजातील सर्व परंपरावाद मात्र सांभाळून घेई. मुस्लिम समाजातील कोणताही पुरोगामी नेता आपल्या धर्मपरंपरेवर काही टीका करण्यास धजावतच नसे. इस्लाममध्ये लोकशाही आहेच, इस्लाममध्ये समाजवाद आहेच, असे काहीतरी बोलून आपण इस्लामच सांगतो आहोत, असा आव हे नेते आणीत. स्वातंत्र्योत्तर काळात मते फुटू नयेत म्हणून मुसलमान समाजातील सर्व परंपरावाद जतन करण्याची चढाओढ आपल्या राजकीय पक्षांत सुरू झाली. काँग्रेस तर सोडाच, पण ज्या राजकीय पक्षाशी दलवाईंचा निकट संबंध होतो, तो समाजवादी पक्षसुद्धा दलवाईंना निवडून येण्यासाठी तर सोडा, पण पडण्यासाठीसुद्धा तिकीट देण्याची हिंमत दाखवू शकला नाही!

भारतीय कम्युनिस्ट पक्ष हमीद दलवाईंना हिंदू जातीयवादी आणि अमेरिकन साम्राज्यवादी यांचा हस्तक समजत असे. त्यामुळे 'धर्म ही अफूची गोळी' मानणाऱ्या त्या पुरोगामी क्रांतिकारक पक्षाला दलवाईंच्या निषेध करण्यापलीकडे कधी विचार करावासा वाटला नाही! काँग्रेस पक्षाचा पाडाव झाल्यामुळे गेल्या वर्षापासून ही परिस्थिती बदलली आहे, असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिम समाजातील सर्व परंपरावाद जिव्हाळ्याने जतन करण्याचे काम जनता पक्ष अतिशय चोखपणे व काँग्रेसइतक्याच उत्साहाने पार पाडीत आहे! शासन प्रतिकूल, राजकीय पक्ष प्रतिकूल, यांमुळे तर दलवाईंचे कार्य अधिकच बिकट झाले.

महात्मा फुले यांच्यापेक्षा दलवाईंचे कार्य अधिक बिकट होते, तरीही त्यांना मुस्लिम समाजातील तरुण कार्यकर्त्यांचा एक गट आपल्या अल्पशा आयुष्यात स्वतःभोवती गोळा करता आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणी मिळून तीन-चारशे स्त्री-पुरुष तरुण कार्यकर्ते पाहता पाहता दलवाईंभोवती गोळा झाले. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत इतके कार्यकर्ते दलवाईंना मिळाले, हेच आश्चर्य आहे. हा प्रपंच मुद्दाम नोंदवण्याचे कारण हे की, हमीद दलवाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मित्रांनीसुद्धा त्यांच्याविषयी लिहिताना दोन गोष्टींचा वारंवार उल्लेख केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे, दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा कधीच मिळाला नाही! आणि दुसरे म्हणजे, आयुष्याच्या अखेरीला दलवाई मुस्लिम समाजापासून तुटून पडलेले होते. दलवाईंच्या कार्यातील अडचणी लक्षात घेता खऱ्या आश्चर्यकारक गोष्टी दोन आहे. पहिली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना आजारी पडून मरण्याची संधी मिळाली; त्यांना हुतात्मा व्हावे लागले नाही. त्याहून अधिक आश्चर्याची दुसरी गोष्ट म्हणजे तेराशे वर्षांच्या परंपरेविरुद्ध बंड करणाऱ्या या बंडखोराला पाहता पाहता तीनशे-चारशे अनुयायी मिळाले!

दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा कधीच नव्हता; तो असणारही नव्हता, हे अगदी उघड आहे. मुस्लिम समाजातील सर्व राजकीय नेते प्रामुख्याने दलवाईंना विरोध करत होते. दलवाईंनी अतिरेकी भूमिका घेतलेली होती, म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या मागे गेला नाही, हे म्हणणे खरे नाही. दलवाईंनासुद्धा महान विचारवंत म्हणून किर्ती मिळवण्याची इच्छा नव्हती. त्यांना समाजपरिवर्तनाचे आंदोलन अधिक प्रिय होते. महंमद पैगंबर आणि कुराण यांबाबत चर्चा करून दररोज समाजाचे मन दुखवावे आणि पुरुषार्थ मिरवावा असे त्यांनाही वाटत नव्हते. दलवाई स्वतः नास्तिक आणि अश्रद्ध होते; पण मुस्लिम समाजाने नास्तिक व अश्रद्ध असलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह नव्हता. समाजाचे आमूलाग्र परिवर्तन होणे आवश्यक आहे, इतके मान्य असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आरंभ म्हणून कोणताही एक छोटासा कार्यक्रम घ्यावा आणि सुधारणेसाठी समाज तयार करावा हे दलवाईंना मान्य होते.

इस्लामवरील श्रद्धा, पैगंबरांवरील श्रद्धा, इस्लामच्या धार्मिक व राजकीय इतिहासावरील श्रद्धा या सर्व चर्चा बाजूला सारून तलाकपीडित महिलांचा प्रश्न हाती घेऊन सामाजिक आंदोलन करायला ते तयार होते. पण दलवाई अतिरेकी जरी नसले तरी सुधारणेचा लहान अगर मोठा कोणताच कार्यक्रम स्वीकारून मुस्लिम मन ढवळण्यास त्या समाजातील कार्यकर्ते तयार नव्हते. कोणत्याही प्रकारचा बदल मान्य न करता आपला परंपरावाद जतन करीतच आपण राहू; तेच आपल्या सोयीचे आहे, असे नेते समजत आणि या सेक्युलॅरिझमच्या सर्वद्रोही नेत्यांना हिंदू पुरोगामी नेते नेटाने पाठिंबा देत. मग दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा मिळू नये ही परिस्थिती बदलणार कशी?

माझा आणि दलवाईंचा अगदी आरंभापासून म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन करण्याच्या काही वर्षे आधीपासून संबंध होता. दलवाईंनी मुस्लिम तरुणांना व कार्यकर्त्यांना पुनःपुन्हा हे सांगण्याचा प्रयत्न केला की, आपण एखाद्या छोट्या प्रश्नापासून आरंभ करू. एकदा तर ते असे म्हणाले की, बाकी सगळे सोडा, आपल्या सर्व सभा जन-गण-मन या राष्ट्रगीताने संपल्या पाहिजेत, इतक्या मुद्द्यावर तरी तुम्ही आंदोलन करायला तयार आहात काय? पण त्यालाही कुणी फारसा प्रतिसाद दिला नाही. आपल्या विजयाचा एके काळचा इतिहास सदैव स्मरणात जागता ठेवणाऱ्या परंपरावाद्यांना परिवर्तनाच्या कार्यक्रमाचा प्रत्यक्षात उतरू शकेल असा कोणताही प्रामाणिक आरंभच नको होता.

तरीही दलवाईंना आरंभाला दहा-वीस कार्यकर्ते मिळालेच. दरसाल हे कार्यकर्ते वाढतच जात होते. तलाकपीडित महिलांच्या परिषदा हळूहळू सर्वत्र भरू लागल्या. आरंभी या परिषदांना पंधरा-वीस मुस्लिम महिला जमणे कठीण होते; पण गेल्या डिसेंबरात अमरावती येथे भरलेल्या तलाकपीडित महिलांच्या परिषदेला संचालकांच्या अपेक्षेच्या बाहेर इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की पुरुष प्रेक्षकांना हॉल रिकामा करून द्यावा लागला! हे चित्र क्रमाने प्रतिसाद वाढत आहे, याचे आहे.. दलवाईंचा विचार क्रमाने समाजात रुजतो, पाझरतो आहे, याचे चित्र आहे. दलवाई समाजातून तुटून बाजूला गेले याचे हे चित्र नाही.

आपण स्वतःच्या मनाशी विचार करतो त्या वेळी सतत एक प्रश्न विचारला पाहिजे की, गुलाम राष्ट्रातील स्वातंत्र्यलढे पुनःपुन्हा पराभूत होतात म्हणून गुलामगिरी अमर राहील असे आपण मानणार आहोत काय? दहा उठाव फसतील, पण शेवटी संपणार आहे ती गुलामगिरी. स्वातंत्र्याची आकांक्षा संपत नसते. आज बोहरी समाजात धर्मगुरूंच्या विरुद्ध आंदोलन चालू आहे. अजून धर्मगुरूंचीच अधिसत्ता समाजावर चालते. पण उद्याचा विजय दाउदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंचा असणार नाही; तो स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा राहील. अतिशय अजिंक्य आणि बलवान असणाऱ्या तटबंद्या कितीही बलवान असोत, त्या शेवटी कोसळत चाललेल्या मावळत्या शक्ती आहेत. या मावळत्या शक्तींचा विजय फार काळ टिकणारा नसतो. मुस्लिम समाजही बदलतच जाणार आहे. तोंडाने 'नाही नाही' म्हणत गोषा सोडून बाहेर येणाऱ्या स्त्रियांची संख्या सारखी वाढतच आहे, तिथून वाढतच जाणार आहे. मुस्लिम समाजातही यापुढे नवे विचार वाढतच जाणार आहेत. मुस्लिम समाजातही यापुढे नवे विचार वाढतच जाणार आहेत.

थोडा उशीर लागेल हे मान्य केले तरी अंधश्रद्धा, जळमटलेली मने कायमची गुलाम राहणार नाही. सगळेच हमीद दलवाईंप्रमाणे बंडखोर नसतील; पण कालमानानुसार 'मुस्लिम पर्सनल लॉ'मध्ये, मुस्लिम समाजात परिवर्तनाची भूक वाढवून दमादमाने बदल घडवून आणावा लागेल, असे म्हणणारे लोक त्याही समाजात तयार होत आहेत. परंपरावाद्यांचे बळ हे शेवटी मावळत्या शक्तींचे बळ असते. दलवाई हा नवा उगवता विचार आहे. दलवाईंच्यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी दलवाईंचा विचार वेगाने पसरत कसा जाईल, याची काळजी घ्यावी. दलवाईंचे चाहते व अनुयायी तो विचार करतीलही, करीतही आहेत. पण उरलेल्यांनी हे लक्षात ठेवावे की पराजय दलवाईंचा होणार नसून परंपरावाद्यांचा होणार आहे. वर्षांची संख्या थोडी वाढेल; पण भवितव्याच्या या दिशेत बदल होण्याची शक्यता अजिबात नाही. ज्या शक्ती कदाचित दहा-वीस वर्षांत विजयी होणार नाहीत, ज्यांना विजयी व्हायला कदाचित शंभर वर्षे लागतील, त्या शक्तीचा पराभव झालेला आहे, असे समजत बसण्यात आपण आत्मवंचनेशिवाय दुसरे काही मिळवत नसतो.

Sunday, March 4, 2012

हमीद

प्रकाशक- नीलकंठ प्रकाशन. मुखपृष्ठ- दिलीप भंडारे
‘हमीद’ ह्या अनिल अवचट यांनी लिहिलेल्या नि ‘नीलकंठ प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकातला काही निवडक भाग थोडीफार रचना बदलून अवचटांच्या परवानगीने इथे प्रसिद्ध केला आहे. ऐंशी पानांच्या या छोट्याशा पुस्तकाची पहिली आवृत्ती ३ जून १९७७ची आहे. 
हमीद दलवाई यांच्या एका पत्रकार मित्राने त्यांच्या निधनानंतर उत्सफूर्तपणे लिहिलेला हा मजकूर आहे... आपल्या फार जवळचे माणूस जाते त्यानंतर त्याच्या आठवणी जागवीत आपण त्याच्या जाण्याने पडलेला प्रचंड खड्डा भरून काढण्याचा प्रयत्न करतो तसे या मजकुराचे स्वरूप आहे. अशा आठवणीत चरित्राचा मुद्देसूदपणा, नेमकेपणा अपेक्षिणे गैर. हे एक प्रकारचे ‘जागरण’ आहे. मित्राच्या जाण्याने बेचैन झालेले मन भूतकाळ उगाळीत त्या मित्राचा पुनः कधीही न मिळणारा सहवास, त्यातले कडू गोड दिवस आठवते आहे’, असं विजय तेंडुलकरांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय.
***

एक
हमीद अस्वस्थ आणि आक्रमक व्यक्तिमत्त्वाचा माणूस होता. जी गोष्ट करायची ती निधडेपणाने, मनस्वीपणे, मनमुरादपणे, असा त्याचा खाक्या होता. मुस्लीम समाजात आधुनिक मूल्ये रुजवणे हे तर त्याचे मिशनच होते. त्याचा त्याला अहोरात्र ध्यासच लागला होता. गप्पांमध्येही इतर विषय त्याला सहन होत नसत. त्याच्या गप्पा ऐकणाराला वाटावे की, भारतात या प्रश्नाखेरीज दुसरा प्रश्नच अस्तित्वात नसावा.

मैत्रीही मनमुराद करायचा. माणसांचे त्याला व्यसनच होते. जीवनातली अनेक सुखे तो आसक्तीने उपभोगीत असे. दोस्त जमवून गप्पा मारणे, खाणे-पीणे, सिनेमे बघणे, गाणी ऐकणे, पुस्तके वाचणे... जे जे तो करायचा, त्यात तो स्वतःस पूर्णपणे झोकून द्यायचा.

पुण्याला वरचेवर यायचा. तो आला की ते दोन-चार दिवस आमचे राहायचेच नाहीत. ते त्याचे असायचे. आम्हा चारसहा मित्रांचे एरवीचे कार्यक्रम तो पार मोडून-तोडून टाकायचा. कधी मरगळ आली आणि कळले की, हमीद पुण्याला आला आहे की मरगळ अगदी विरून जायची. आम्ही त्याच्यापासून उदंड उत्साह घेतला.

हमीद रंगून बोलायला लागला की, एका हाताची बोटे छातीजवळ घेऊन हात पुढे-मागे झटकायचा. भुवया सतत वरखाली करायचा. जोकमधले स्फोटक वाक्य डोळे मोठे करून, जाड्या खर्ज आवाजात बोलायचा. बसला की मांडी उडवत बसायचा. परवाच्या दुखण्यात तो एवढा अशक्त झाला होता- इतर काही करता येत नव्हते, तर तळपायाची बोटे सारखी हलवत राहायचा. शरीराच्या कुठल्यातरी भागाची हालचाल नाही, असा क्षणही पाहण्यात नसायचा.

त्याच्या तोंडात सतत सिगारेट असायची. दिवसाकाठी तीन-चार पाकिटे ओढायचा. सिगारेटचा ब्रँडही बदलता असे. प्रथम पिवळा हत्ती, चारमिनार, विल्स. अलीकडे तो सिमला ओढीत असे. मधे केंट या परदेशी सिगारेटची त्याला आवड निर्माण झाली होती. बॅगेत अनेक औषधी गोळ्यांच्या स्ट्रिप्सही पडलेल्या असत. ग्लॉकोमामुळे डोके दुखायचे, मग क्रोसिनच्या गोळ्या घ्यायच्या.

हमीद देखणा होता. घारे डोळे, गोरा रंग, तरतरीत नाक, बोलणे नाकात-कोकणी व हेलात असायचे. आदल्या रात्री निरोप आल्यावर ‘पूनम’वर सकाळी भेटायला जायचो, तेव्हा हमीद रिसेप्शन-रूमपाशी फेऱ्या मारत, हातात पेपर उघडून वाचत, मधूनच घडी करून काखोटीला मारीत असायचा. ते त्याचे दिवसातले पहिले ताजे, टवटवीत, प्रसन्न दर्शन असायचे.

अंगात सुरेख टेक्श्चरचा, सौम्य आल्हाददायक रंगाचा खादी सिल्कचा बुशशर्ट असायचा. खाली खादीची पांढरी पँट असायची. लहानपणी सेवादलात असल्यामुळे आणि मोठेपणी टेक्श्चर व फील आवडतो म्हणून खादी घालीत असे. प्रवासात दिल्ली, आसाम, कलकत्ता कोठेही गेला तरी मिळतील तिथून छान छान कापडाचे पीसेस आणीत असे. त्याच्या रंगाच्या निवडीविषयीचे कौतुक बोलून दाखवताच तो म्हणे, ‘सिलेक्शन! अवचटजी इसे कहते है सिलेक्शन. इस बारेमें हमको माननाही पडेगा.’ ‘माननाही पडेगा’ ही त्याची आवडती टर्म. इतरांच्या बाबतीतही ती तो मुक्तपणे वापरे.

आम्ही बाहेर पडलो की, प्रथम कार्यक्रम ठरवायचो. त्याच्या आवडीनिवडी मला माहीत झाल्या होत्या. त्याला पहिल्यापासून वरचेवर लघवीला जावे लागे. कुणाकडे जायच्या आधी लघवीला जाऊऩ आले की, त्याला स्वस्थ वाटे. (हे कदाचित काही व्याधीमुळे असेल या शंकेने मी एकदा डॉक्टरकरवी लघवी व इतर तपासणी करून घेतली होती. पण रिपोर्टात सर्व काही ठीक निघाले होते.) म्हणून कार्यक्रम ठरवताना मी ‘आपण आधी अमक्याकडे जाऊ, तिथून तमक्या (हमीदच्या आवडत्या) हॉटेलात नास्ता करू, तिथे मागे मुतारीही आहेच, तिथून तिसरीकडे जाऊ’ असे ठरवीत असे. ते ऐकून हमीद म्हणे, ‘बस अवचटजी, इसलिये हम तुमको मानते है.’

...

हमीद सदैव प्रवासाला जायचा. परत आल्यावर त्याच्या गप्पा आणखीनच फ्रेश व्हायच्या. तिथं भेटलेली नाना तऱ्हेची माणसं, त्यांच्या लकबी यांचे पूनमधल्या खोलीत हमीदचे परफॉर्मिंग आर्टचे प्रयोग सुरू व्हायचे. आम्हाला हसवण्याच्या उद्देशाने सांगितलेल्या गप्पा असल्या तरी त्यातून नकळत त्या त्या गावचे चित्रच उभे राहात असे. हमीदच्या कलावंताच्या नजरेने ती ती वैशिष्ट्ये बरोबर टिपलेली असायची.

परवा दोन आजारपणांच्या मध्ये कोल्हापूरला जाऊन आल्यावर सांगत होता, ‘सालं ते गावच और. फेटेवाले, लुंगीवाले, मिशीवाले. रिक्षाने चाललो होतो. रस्ता होता, कडेला फुटपाथ होता. रस्त्याच्या मधूनच पाच-सहा आडदांड माणसं चाललेली. रिक्षाला रस्ताच नाही. रिक्षावाला थांबून बाहेर मान काढून म्हणाला ‘अबे राव, जरा हटा की. त्याबरोबर तिघे-चौघे एकदम वळले. त्यातला एक फुटपाथकडे हात करून रिक्षावाल्याला म्हणाला, ‘तूच घाल की तिकडनं.’ त्यावर रिक्षावाला काही बोलू लागताच दुसरा म्हणाला, ‘उचला रे याला रिक्षासगट.’ रिक्षावाल्याने निमूटपणे अबाऊट टर्न घेऊन दुसऱ्या रस्त्याने रिक्षा घेऊन गेला. आता काय यांच्यापुढे करणार बोला.’

मी म्हटले, ‘कोल्हापूरला मटन जहाल असतं. तू चापलं असशीलच.’ हमीद म्हणाला, ‘तिथं सगळीकडे मटन इकडच्यापेक्षा खूप तिखट. पण तिथेही एका खानावळीत आणखीच तिखट. तिथं गेलो होतो. जेवायला बसलो. शेजारच्या टेबलावर मारामारीचा प्रसंग. दोन-तीन पैलवान मंडळी नळी मागत होती. (नळी म्हणजे बोन पीस त्यातून मॅरो शोषून घेतात.) वेटर म्हणत होता, ‘अहो साहेब, पहिल्यांदा मटनाच्या बशीत येते तेवढीच नळी मिळते.’ मालक आला. त्याने भिंतीवर लावलेली पाटी दाखवली, ‘येथे नळी एकदाच मिळेल.’ त्यांना कसेबसे शांत केले. दुसऱ्या अशाच ‘तिखट’ हॉटेलात गेलो, तिथे गिऱ्हाइके ‘कट’ मागत होती. कट म्हणजे मटनाच्या रश्श्यावरच्या तेलाचा तवंग. ह्यात तिखट आणखीच उतरलेले असते. आता तो रश्श्याबरोबर येतो तेवढाच कट प्रत्येकाला मिळणार. जादा कसा येणार? त्याही हॉटेलात अशी पाटी लावली होती, येथे जादा कट मिळणार नाही. अशी ही माणसं. काय करणार यांच्यापुढे? अवचटजी, आहे का इलाज काही तुमच्याकडे यांच्यावर?’

हमीद मुसलमान प्रश्नाच्या अभ्यासासाठी भारतभर फिरला होता. मुसलमानांची सांस्कृतिक बैठक ज्या प्रांतात आहे, त्या उत्तर प्रदेशात तो फिरला होता. तिथले खानदान, अदब पाहून आला. देवबन, अलिगड ही मुसलमानांमधली विचारप्रवाहन निर्माण करणारी केंद्रे पाहून आला. लखनऊची नबाबी संस्कृती पाहून तो सांगत होता, ‘तिथे बोलण इतक सॉफ्ट की विचारायची सोय नाही. तिथले लोक मागून खंजीर खुपसून. पुढून आदाबर्ज करून ‘जनाब, आपको तकलीफ तो नहीं हुई?’ असे विचारतील.’

लखनऊला मनोहर तांबे नावाच्याय तिथे स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीय माणसाकडे हमीद उतरला होता. तांब्यांनी त्याचे छान आदरातिथ्य केले. हमीदने त्याचे ‘मराठी माणसाला न शोभेल असे आदरातिथ्य त्यांनी केले’, असे वर्णन करीत असे.


...

नव्या ठिकाणी गेल्यावर तो भाग पाहण्याची हमीदची दृष्टी एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलाची असायची. त्याने अगदी लहानपणीची आठवण एकदा मला सांगितली होती. त्याच्या आईली टी.बी. झाला म्हणून तिला मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये ठेवले. उपचारही होतील आणि देशावरच्या मोकळ्या हवेत बरेही वाटेल, असा त्यात विचार होता. छोट्या हमीदलाही तिने बरोबर नेले होते.

या भेटीविषयी हमीद मला एकदा म्हणाला होता, ‘मी प्रथमच गाव सोडून इतक्या लांब आलो होतो. माळरानावरचा सुसाट वारा मला आठवतोय. लांबच लांब पसरलेली सपाट जमीन पाहून मी चकितच होऊन गेलो. आमच्या तिकडे चिपळूणला टेकड्या-टेकड्यांचा भाग. तिकडे टेकडीवर गावं. टेकडी संपली की गाव संपले असे सहजच समजता येतं. इकडं सगळं आपलं सपाट. इथं गाव संपलं, असं लोकांना कशावरून समजत असेल, असा मला तेव्हा प्रश्न पडला होता.’

हीच बालसुलभ वृत्ती मोठा झाल्यावरही कायम राहिली होती. मध्यंतरी तो पाकिस्तानला जाऊन आला. बायकोकडचे काही नातेवाईक तिकडे आहेत. परदेशी जायचा त्याचा तो पहिलाच प्रसंग. तो सांगत होता, ‘परदेश म्हणजे काही तरी वेगळं असणार असं वाटायचं. नकाशात दोन देशांना वेगळे रंग दिलेले असतात, तसं काही दिसेल अशी कल्पना होती. बॉर्डर क्रॉस करायच्या क्षणाची उत्सुकता होती. प्रत्यक्षात वेगळं काही घडलंच नाही. ट्रेनने गेलो होतो. आधीचं स्टेशन भारताचं नंतरचं स्टेशन पाकिस्तानचं. मध्ये रेषा वगैरे काही आखलेली नव्हती. सगळा प्रदेश सारखा. सरहद्द म्हटल्यावर दोन्हींकडे बंदुकी एकमेकांवर रोखून लोक उभे असणार असे वाटायचे. तसेही नव्हते. लोक शेतात शांतपणे काम करीत होते.’

जरा थांबून तो पुढे सांगू लागला, ‘पुढे स्टेशनावर पाकिस्तानी पोलीस चेकिंगला आले. रस्त्यांवर स्त्रियांच्या बुरख्यांच्या जाहिराती दिसून लागल्या. आपल्याकडे कधी बुरख्यांच्या जाहिराती पाहिल्यात? मग हळूहळू ‘पाकिस्तान’ दिसू लागले.’

...

हमीद कधी खास मूडमध्ये असायचा. मग त्याला त्याचे लहानपण आठवायचे. चिपळूणजवळचे मिरजोळी हे त्याचे गाव. त्याच्या ‘इंधन’ कादंबरीत किंवा ‘लाट’ या कथासंग्रहातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये ते गाव पार्श्वभूमीला आहे. हमीद गावाकडच्या गोष्टी सांगायचा. तिथली गमतीशीर पात्रे सांगताना एका उत्साही पोराची त्याने एकदा हकीगत सांगितली होती. गावात एका विवाहित बाईबरोबर एका माणसाची भानगड होती. ती कळल्याने गावातले काही लोक अतिशय संतप्त झाले. तो माणूस बाईकडे रात्री गेल्याचे कळल्यावर सगळे त्या बाईच्या घरासमोर जमले व हा खाली आला की, त्याला ठोकायचे असे ठरवले. घरामागे ओढा होता. घराच्या मागच्या दाराने ओढ्यातून त्या माणसाने पळून जाऊ नये म्हणून एका उत्साही वीराला पहाऱ्याला तिथे उभे केले. हा वीर सोटा घेऊन उभा राहिला. तो बाईकडे गेलेला माणूस पुढच्या दाराने खाली आल्यावर लोकांनी त्याला धरले. पिटायचे ते पिटले. पुढे तडजोड होऊन सगळे घरी गेले. उत्साही वीर मात्र सोटा घेऊन ओढ्यातच उभा. सकाळी त्याच्या घरचे लोक त्याच्या मित्रांना विचारू लागले की, हा (वीर) कुठंय? तेव्हा सगळे शोधायला लागले, तर हा सोटा घेऊन अटेन्शनमध्ये ओढ्यात उभा असलेला दिसला.

...

हमीदला माणसांचे व्यसन होते. पुण्या-मुंबईत आणि भारतात इतरत्र खूप माणसे त्याच्या जिवाभावाची हती. हमीदची पत्त्यांची डायरी चाळली तरी त्याच्या अफाट मनुष्यसंग्रहाची कल्पना यायची. तो एकटा विचार करीत पडलाय असे दृश्य आजारपणाच्या आधी कधीच दिसायचे नाही. पुण्यात आल्यावर सकाळपासून आमची माझ्या स्कूटरवर भ्रमंती सुरू व्हायची. रावसाहेब पटवर्धन हयात असताना आम्ही त्यांच्याकडे जायचो. रावसाहेबांचे हमीदवर मुलासारखे प्रेम. आपल्या खर्ज आवाहा ‘काय दलवाई, कधी आलात? कार्य कसे चालले आहे’ वगैरे चौकशी करायचे.

प्रभाकर पाध्यांकडेही आम्ही दर भेटीच्या वेळी जायचो. सरिता व मंगेश पदकींच्याकडे, स.शि. व सुमित्रा भाव्यांकडे चक्कर असायची. ही त्यांची लेखक मित्रमंडळी. सरिता पदकींकडे पूर्वी तो उतरत असे. आम्ही गेलो तेव्हा सरिताबाई म्हणाल्या, ‘दलवाई, तुमच्याविषयी आमची तक्रार आहे. तुम्ही तुमच्या कार्यापायी ललित लेखन अजिबात बंद केले, हे बरोबर नाही.’ मी म्हटले, ‘अहो, लेखक आपल्याला मिळतील. पण मुसलमानात असा माणूस प्रथमच निपजला आहे. तेच कार्य जास्त महत्त्वाचे आहे.’ हमीद अशावेळी काहीच बोलत नसे.
मुंबईतल्या लेखकमित्रांचाही त्याच्या बोलण्यातून उल्लेख यायचा. सदानंद रेगे हे त्याचे जवळचे मित्र. रेग्यांविषयी तो एकदा म्हणाला, ‘रेगे हा भांडणं करतो, अशी त्याची प्रसिद्धी आहे. त्याच्याशी मैत्री झाली की, लगेच तो त्याच्याबरोबर भांडण करतो. म्हणून काही लोक आता उघड म्हणतात, ‘रेगे तुझ्याबरोबर आम्हाला मैत्री करायची नाही, कारण तुझ्याबरोबर आमचं भांडण व्हावं असं आम्हाला वाटत नाही.’’
पुण्यात ‘साधने’च्या कचेरीला त्याची हमखास भेट असायची. साधनेने व यदुनाथ थत्त्यांनी हमीदला सुरुवातीपासून उचलून धरलेले.

हमीद ज्यांना मार्गदर्शक मानायची अशी मंडळी म्हणजे श्री. पु.  भागवत, अ. भि. शहा, वसंत नगरकर, मे. पुं. रेगे, नरहर कुरुंदकर. कुरुंदकरांनी हमीदच्या बरोबरीने मुस्लीम जातीयवादावर कोरडे ओढले. त्यांनी एकदा हमीदला नव्या वर्षाच्या शुभेच्छा पाठविल्या होत्या. कार्डावर त्यांनी त्यांच्या अशुद्ध लेखनाचे नियम पाळून लिहिले होते, ‘तुम्हाला नवे वर्ष सुखा-समाधानाचे, समृद्धीचे जावो असे मला म्हणवत नाही. कारण तसे म्हणणे म्हणजे आपण अंगिकारलेले कार्य सोडून द्या, असे म्हणण्यासारखे आहे. तुम्ही हे कार्य करीत राहावे अशी इच्छा असल्याने तुम्हाला नवे वर्ष खडतर कष्टाचे जावो असे लिहितो.’

शहांविषयी हमीदला खूपच आदर होता. ‘शहा हा अतिशय डिसेंट व उमदा माणूस आहे. आमचे काही वेळा वैचारिक मतभेद झाले तरी ते शहांनी त्या पातळीवरच ठेवले. मनानेच ते डेमोक्रॅटिक वृत्तीचे आहेत.’ असे तो म्हणे. शहा मुस्लीम सत्यशोधक अधिवेशनात उंच फरची टोपी घालून बसत. त्याची तो थट्टाही करे. शहांच्या ‘कमिटी फॉर कल्चरल फ्रिडम’ या समितीवर अमेरिकाधर्जिणी अशा शिक्का असल्याने व ती चालविणाऱ्या शहांशी हमीदचे संबंध असल्ने हमीदचे जातीय मुस्लीव व हिंदू विरोधक, कम्युनिस्ट मंडळी हमीदवर सी.आय.ए.चा एजंट असल्याची टीका करीत. हमीद म्हणे, ‘सालं, त्या सी.आ.ए.चा पत्ता तरी सांगा आम्हाला. मी अर्जच करणार आहे; डिअर सी.आय.ए. आम्ही तुमचे एजंट व्हायला तयार आहोत. तुमचे पैसे कुठे मिळतात ते कळवावे. म्हणजे त्या पत्त्यावरून नेण्याची व्यवस्था करू.’ जरा थांबून तो म्हणे, ‘अरे, सी.आ.ए. एजंट म्हणून ज्यांच्यावर पेपरमधून उघड टीका होते, त्यांना पैसे द्यायला सी.आय.ए.वाले काय मूर्ख आहेत? ज्याचा संशयही येणार नाही, अशीच माणसे त्यांचे एजंट असणार. उघड उघड एजंट व्हायला सी.आ.ए. हे काय वर्तमानपत्र आहे?’

शहा, कुरुंदकर, यदुनाथ हे समविचाराचे लोक हमीदचे मित्र असतील यात फारसे आश्चर्य नाही. हमीदचे ज्यांच्याशी कडवट मतभेद होते अशांशीसुद्धा तो उत्तम संबंध ठेवीत असे. काहींशी तर त्याची दाट मैत्रीही जमली होती. कर्तारसिंग थत्ते हे हिंदुत्वनिष्ठ चमत्कारिक गृहस्थ. शस्त्र बाळगता यावे म्हणून शीख धर्म स्वीकारलेला. मुसलमानांच्याविषयी, त्या सगळ्यांना ठार केले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. हमीदला ते भेटले की प्रथम म्हणायचे, मला दहा रुपये द्या. हमीदही निमूटपणे नोट काढून द्यायचा. एकदा हमीदला टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगसमोर कर्तारसिंग थत्ते भेटले. ते काही बोलायच्या आत हमीदने दहाची नोट त्यांच्या हातावर ठेवली आणि तो त्यांना म्हणाला, ‘माझ्या पूर्वजांनी तुमच्या पूर्वजांकडून जो जिझिया कर घेतला होता. त्याची प्रथम भरपाई होऊ द्या, मग दुसरे बोलू.’ कर्तारसिंग गडगडून हसले, व म्हणाले, ‘दलवाई, तुला आम्ही मानला. हिंदुस्थानातल्या सगळ्या हिंदूंना च्युत्त्या बनवलंस तू. आम्ही गेली वीस-पंचवीस वर्षे मुस्लीमविरोधाची धार लावत आणली होती. तू दोन वर्षांत ती बोथट करून टाकलीस. मानलं तुला!’

...

दोन
हमीद दलवाईला मुस्लीम समाज सुधारणेचा ध्यास लागला होता. जळी स्थळी तोच प्रश्न. या विषयावर त्याची अखंड बडबड ऐकून मी एकदा कंटाळलो व म्हणालो, ‘आता हे हिंदू व मुसलमान दोघेही खड्ड्यात जाऊ देत. आपण संध्याकाळी भेटू तेव्हा निराळ्या विषयावर बोलायचे.’ त्याला तो कबूल झाला. संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो. मी पाहिलेल्या एका चांगल्या सिनेमाची त्याला गोष्ट सांगू लागलो. मधेच थांबवून सिनेमातला संदर्भ घेऊन मला म्हणाला, ‘म्हणजे हे आमच्या शेख अब्दुल्लासारखं झालं. डू यू नो व्हेन शेख अब्दुल्ला...’ असे म्हणून मुस्लीम प्रश्नावर परत त्याचा धबधबा सुरू झाला.

एखाद्या प्रश्नावर एवढा झपाटलेला माणूस माझ्या पाहण्यात नाही. इतर मौजमजा चालली असली तरी ती करत असतानाही हमीदची या प्रश्नातली इन्व्हॉल्व्हमेंट कुठे कमी पडली नाही. माझ्यासमोर त्याची दहा-बारा वर्षे गेली. त्या आधी नुकते त्याचे काम सुरू झालेले होते. आजाराची गेली दोन वर्षे सोडली तर आठ-दहा वर्षे एवढाच काळ त्याला काम करायला मिळाला. पण एवढ्याशा काळात त्याने सबंध भारतातल्या मुसलमान समाजाला हादरा दिला. आणि दूरवर पाहता जागतिक इस्लामच्या इतिहासात अभूतपूर्व घटना करून दाखवली. त्याच्या कामगिरीचं गमक म्हणजे त्याने घेतलेली भूमिका आणि ती पुस्तकात न ठेवता तिचे मास-मूव्हमेंटमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याने केलेली धडपड.

‘अल्ला हा स्तुतीस पात्र असा जगातील एकमेव देव आहे. महंमद पैगंबर हा अल्लाचा रसूल (दूत) असून त्याच्याकरवी अल्लाने कुराण ही शिकवण माणसासाठी सांगितली आहे.’ ही इस्लामची थोडक्यात भूमिका. आजपर्यंत इस्लामच्या तेराशे वर्षांच्या इतिहासात या भूमिकेला कोणी जाहीररित्या आव्हान दिलेले नव्हते. ते हमीद दलवाईने दिले. यापूर्वी प्रागतिकक विचारसरणीचे अनेक मुस्लीम विचारवंत होऊन गेले. मौलाना आझादांसारख्यांनी कुराणाची निराळी इंटप्रिटेशन्स केली. न्या. छगलांनी मुस्लीम जातीच्या राजकारणावर टीका केली. पण कुराण हा ईश्वरी ग्रंथ आहे, यावर कोणी शंका घेतली नाही. काही मुस्लीम मार्क्सिस्ट झाले. त्यांनी मार्क्सिझम स्वीकारला. पण इस्लामच्या मूलतत्त्वांविषयी जाहीर भूमिका घेण्याचे त्यांनी टाळले. हमीदने त्याच्या कार्याच्या सुरवातीपासून ‘महंमद पैगंबर हा माणूस होता. त्याने त्यावेळच्या समाजधारणेसाठी कुराण हा ग्रंथ लिहिला, त्या काळात त्या समाजाला ते नियम आवश्यक वाटले असले तरी कालमानानुसार त्यातील काही नियम चुकीच्या पायावर आधारलेले आहेत, ते रद्द व्हावेत’ अशी भूमिका घेतली यात कुठेही कधीही त्याने लपवाछपवी केली नाही. कुठे तडजोडही केली नाही.

या त्याच्या भूमिकेमुळे इस्लामच्या जगतात खळबळ उडाली. अशा गद्दार माणसाला नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मृत्यूच्या छायेत हमीद सततच वावरत राहिला. मुस्लीम पुढाऱ्यांनी हमीदच्या मृत्यूनंतर साधे उपचार म्हणूनसुद्धा दुःखप्रदर्शन केले नाही. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे आलेल्या दुखवट्याच्या ठरावालाही त्यांनी विरोध केला, इतका त्यांच्या मनात हमीदविषयी कडवटपणा भरलेला होता.
पासष्ट-सहासष्ट साली हमीदचे भाषण मी पन्हाळ्याच्या शिबिरात ऐकले. वजनदार कुऱ्हाडीने घाव घालावा तसं वाटलं. त्याच्या भाषणाच्या आधी एस.एम. जोशांनी ‘मुस्लीम समाजातला आगरकर’ अशी त्याची ओळख करून दिलेली होती. परवा त्याच्या मृत्यूनंतरच्या पुण्यातल्या शोकसभेत नानासाहेब गोरे, बाबा आढाव, पु. ल. देशपांडे आणि इतर वक्त्यांनी त्याला महात्मा फुल्यांची उपमा दिली. पण ‘मुस्लीम समाजाचा महात्मा फुले’ अशी उपमा न देता, ‘हा सर्व समाजाला आवश्यक, महात्मा फुल्यांचा वारस आहे’ असे सर्वांनी म्हटले. आठदहा वर्षांतली हमीद दलवाईच्या कार्याची ही वाटचाल आहे.

हमीदने गांधीटोपी घालण्यावरून वडिलांच्या हातचा मार खाल्ला. पुढे हट्टाने तो टोपी घालू लागला. सेवादलात जाऊ लागला. गावच्या काही पुढाऱ्यांच्या हातचा मार खाल्ला, तरी डरला नाही. पुढे मुंबईला आल्यावर सेवादलाच्या संपर्कामुळे तो सोशालिस्ट पक्षाच्या परिघात वावरू लागल्यावर या प्रश्नाची इतर सहकाऱ्यांबरोबर चर्चा करू लागला. त्याला समाजवादी पक्षातही या विषयाचा कोणी सखोल विचार केलेला आढळला नाही. वैचारिक पातळीवर भोंगळपणा आणि कृतीच्या बाबतीत मुस्लिमांचा अनुनय असा प्रकार त्याला तेथे आढळला. पण त्या पक्षात त्याला बोलायची संधी मात्र मिळत गेली. त्याला तिथे स्थानही होते. मला भेटला त्या वर्षी तो संयुक्त समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवर होता. पण आपली मते मांडून पक्षाचे धोरण बदलेना म्हणून तो निराश झाला होता.

या सुमारास त्याच्या भूमिकेला अ. भि. शहा व कुरुंदकर यांनी उचलून धरले. मी तेव्हा यूथ ऑर्गनायझेशन – पुढे जिचे युवक क्रांती दल झाले- मधे काम करीत होतो. आम्ही पुण्यात त्याची टिळक स्मारक मंदिरात तीन व्याख्याने घडवून आणली. पुढे तो महाराष्ट्रभर व्याख्याने देत फिरला. भारतातल्या अन्य प्रांतातही हिंडला. थोडक्यात, त्याने विचारांचे स्वतंत्र व्यासपीठच उभे केले.

हमीदने या समाजापुढे असे मांडले की, स्वातंत्र्यपूर्व काळात मुसलमान फुटीर वृत्तीने का वागले, किंवा आजही भारतातले मुसलमान मुख्य प्रवाहात का समरस होत नाहीत, याचे खापर केवळ हिंदुत्त्ववाद्यांवर फोडून चालणार नाही. मुसलमानांच्या इतिहासाचे नीट परिशीलन केल्यावर मुस्लीम राजकारणामागच्या शक्ती ध्यानात येतील. इस्लामच्या तेराशे वर्षांच्या इतिहासात त्याला पराभव जवळपास माहीत नव्हता. एका छोट्याशा, कोणाला माहीत नसलेल्या देशात हा धर्म उदय पावला आणि एकतृतीयांश जगावर त्याचे राज्य पसरले. भारतातही मुस्लीम नेतृत्वाला आपण राज्यकर्ती जमात आहोत, याचा अजूनही अहंकार आहे. तेव्हा या प्रवृत्ती ज्यांच्यात परंपरेने जोपासल्या गेल्या आहेत, त्यांना सेक्युलर कसे बनवायचे, या आव्हानाचा विचार करा.

कडव्या हिंदूंना उद्देशून त्याने सांगितले, ‘इतिहासाच्या एका क्षणी हिंदुस्थानची फाळणी झाली. फाळणीची चिकित्सा होऊ शकेल, फाळणीचे गुन्हेगारही ठरवता येतील. पण ते चक्र उलटे फिरविण्याचे स्वप्न पाहू नका. कित्येक प्रांतातल्या लोकांनी या देशातून फुटायचा निर्णय त्यावेळी घेतला होता हे विसरू नका. आता भारतातल्या आठ कोटी मुसलमानांना पाकिस्तान आश्रय देणार नाही, शिवाय त्यांची तिकडे जायची तयारी नाही. ही आठ कोटी माणसे आपण ही समुद्रात बुडवू शकत नाही. तेव्हा यांच्याशी जुळवून घेण्याचाच विचार केला पाहिजे. त्यांना बरोबरीचे स्थान देऊन सर्वसामान्य मुस्लीम समाजाची मुल्लामौलवींच्या संधिसाधू पकडीतून कशी सुटका करता येईल ते पाहा. त्यासाठी त्यांचा द्वेष करणे सोडून त्यांच्यातल्या सामाजिक सुधारणांना हात घातला पाहिजे. मुसलमानात या विचाराचे तरुण पुढे येऊ पाहात आहेत. ते त्या समाजात कसे रुजतील हे पाहिले पाहिजे. जातीय दंगली करून प्रश्न सुटणे तर दूरच, पण अधिक बिकट होतील. आमच्यासारखे जे काम करतात त्यांची पंचाईत होईल.’

मुसलमान नेतृत्वामधल्या जातीय व आक्रमक प्रवृत्तींवर प्रहार करणारा हमीद हा एक मुस्लीम माणूस निघाल्याने त्याला खूप महत्त्व आले. तो एक मुस्लिमांच्या सामाजिक प्रक्रियेचा टप्पा ठरला. अ. भि. शहा, हमीद व इतरांनी सेक्यूलर फोरम स्थापन करून ‘सेक्युलरिस्ट’ हे इंग्रजी नियतकालिक काढून अखिल भारतीय स्तरावरच्या मुस्लीम इंटलेक्चुअल्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

शहांच्यामुळे हमीदच्या प्रेरणेला उत्तम वैचारिक बैठक मिळाली. शहांची इस्लामविषयावरची खाजगी लायब्ररी भारतातील उत्तम समजली जाते. त्यामुळे इस्लामविषयीचे जागतिक स्तरावरील चिंतन त्याच्या परिचयाचे झाले. दिल्लीचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी वसंत नगरकर यांच्या मुस्लीम प्रश्नाच्या गाढ्या व्यासंगाचा हमीदला खूप फायदा मिळाला. हमीदच्या भ्रमंतीत इस्लामिक हिस्टरीचे अलिगढ विद्यापीठातील जागतिक किर्तीचे विद्वान प्रा. हबीब यांची गाठ पडली. तेव्हा हमीदला मुस्लिमांमधला समविचारांचा माणूस प्रथमच भेटल्याचा आनंद झाला. दिलीप चित्रे ह्या प्रसिद्ध लेखकाने हमीदच्या लेखांची इंग्रजी भाषांतरे केली. शहांनी ती ‘क्वेस्ट’ व अन्यत्र छापवून आणली. त्यामुळे त्याची भूमिका अखिल भारतीय स्तरावर ज्ञात झाली.
हमीद केवळ भूमिका घेऊन थांबला नाही. तसा थांबला असता तर मोठा विचारवंत म्हणून त्याचा लौकिक राहिला असता. पण या पलीकडे काही नाही. त्याने आपल्या वैचारिक भूमिकेवरून मुस्लीम मास मूव्हमेंट बांधण्याचा सतत प्रयत्न केला.

हमीदने मुस्लीम स्त्रियांच्या तलाकचा प्रश्न हाती घेतला. इस्लामच्या कायद्यात शरियतमध्ये पुरुषाला चार बायका करण्याची मुभा व तोंडाने तीनदा तलाक उच्चारल्यावर बायकोला विनाजबाबदारी बेघर करण्याचा अधिकार दिलेला आहे. हमीदने मागणी केली की, हा मुस्लीम पर्सनल लॉ रद्द व्हावा. सर्व धर्मियांना समान नागरी कायदा लागू व्हावा.

यावर मुस्लीम नेतृत्वाकडून गदारोळ उठला : ही धर्मात ढवळाढवळ आहे. शरियत हा ईश्वरी कायदा आहे. त्यात कोणी बदल करू शकत नाही. शहा, हमीद आणि इतरांनी त्यांना दाखवून दिले की, इतिहासात शरियतमध्ये वेळोवेळी बदल झालेले आहेत. शरियतमध्ये चोरीच्या गुन्ह्याबद्दल हात तोडण्याची शिक्षा आहे. आणि इस्लामिक स्टेट्समध्येही ती अंमलात येऊ शकत नाही, इत्यादी.

हमीदने मुंबईला सहा मुस्लीम स्त्रियांचा समान नागरी कायद्याची मागणी करणारा मोर्चा काढला. तो खूप गाजला. इस्लामच्या इतिहासात असे प्रथमच घडत होते. पुण्याला भाई वैद्य, बाबा आढाव यांनी त्यांच्या पक्षातल्या व संपर्कातल्या मुस्लीम तरुणांची मीटिंग घेऊन हमीदला तेथे बोलावले. काही अंतराने चार-पाच सेशन्स झाल्यावर त्या तरुणांनी हमीदचे विचार स्वीकारून त्याच्याबरोबर काम करायचे ठरवले. या मंडळास ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ असे नाव दिले.

हमीदने समान नागरी कायद्याच्या मागणीबरोबर ‘वक्फ’ या मुस्लीम धार्मिक इस्टेटींच्या चौकशीची मागणी केली. या वक्फांच्या जीवावरच मुस्लिमांमधले जातीय नेतृत्व पोसले जाते. या इस्टेटी किती आहेत, त्यांचा विनियोग कसा होतो, याची सरकारला फारच थोडी माहिती आहे. हमीदने वक्फची चौकशी होऊन त्याचा विनियोग मुस्लीम समाजातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व्हावा, अशी मागणी केली.

उर्दू माध्यमाच्या शाळा बंद करून उर्दू हा एक ऐच्छिक भाषाविषय म्हणून ठेवण्यात यावा, अशी मागणी करणारी परिषद त्याने कोल्हापूरला डिसेंबर ७४मध्ये भरवली. त्याला साडेसातशे मुस्लीम प्रतिनिधी आले. परिषदेत अरेबिक लिपीचे, धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरसा या शाळांवर टीका झाली. ‘रेग्युलर शाळांमधे न जाता अशा शाळांमधे लहानपणी मुस्लीम मुले जाताता. त्यामुळे शिक्षणाचा सांधा तुटतो. म्हणून मुस्लीम समाजात गुन्हेगारीकडे वळण्याची प्रवृत्ती जास्त असते. अशा मदरशांचे ट्रस्टी कलेक्टर, मोठे ऑफिसर असतात. ते मात्र स्वतःच्या मुलांना मदरशांत घालून नुकसान करून घेत नाहीत. त्यांची मुले कॉन्व्हेंटमधे जातात’ अशीही एकाने टीका केली.

...

हमीदच्या वैचारिक धक्क्यामुळे मुस्लीम तरुणांची एक लाट सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे आली. पण पुढे आजतागायत तेच चेहरे कायम राहिले. नवी माणसे येऊच शकली नाहीत. त्यामुळे या जुन्या मंडळींच्या मर्यादा ह्या चळवळीच्याच मर्यादा बनल्या. ही चळवळ मुस्लीम जनमानसात रुजू शकली नाही.

हमीद स्वतःच या मुस्लीम समाजात रुजलेला नव्हता. आमच्यात जेवढा वेळ तो घालवायचा त्याच्या सहस्त्रांशही त्याने मुस्लीम समाजात घालविला नाही. त्याचा बहुतांश वावर ‘एलिट’ समाजात होता. त्यामुळे मुस्लीम समाजाला हमीदविषयी ‘सेन्स ऑफ बिलाँगिंग’ कधीच आला नाही. हमीदला त्या समाजाविषयी कळकळ नव्हती अशातला मुळीच भाग नाही. धडपड करून शकणाऱ्या नांदेडच्या एका मुस्लीम मुलीला तिचे शिक्षण बंद पडून नये म्हणून शंभर रुपये त्याने त्याच्या आजारपणाच्या काळातही आठवण ठेवून पाठविले होते. अशा तुरळक बाबी सोडल्या तर हमीद हा सर्वसामान्य मुसलमानांची मने जिंकू शकला नाही, त्यांच्यातला एक होऊ शकला नाही. त्यांना तो परकाच राहिला. त्याची ‘इंधन’ ही कादंबरी जवळपास आत्मचरित्रात्मक आहे. त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांच्या अनेक खुणा या कादंबरीत पसरलेल्या आहेत. ह्या कादंबरीचा नायक तरुण वयातच गाव सोडून जातो. हृदयरोगानंतर विश्रांतीसाठी म्हणून बऱ्याच वर्षांनी परत येतो. त्या गावात हिंदू-मुसलमान ताण वाढत जाऊन त्याचे भीषण पर्यवसान होत असताना तो केवळ एक प्रेक्षक असतो. मधे पडून ती प्रक्रिया थांबविण्याचा प्रयत्न करू लागताच त्याचे कोणी ऐकत नाही. एक जण तर त्याला म्हणतो, ‘तू इथून पळ काढलास. पंधरा वर्षे आम्ही ही सर्व झळ सोसली. आम्हाला उपदेश करण्याचा तुला काही अधिकार नाही.’ घडलेल्या घटनेनंतर तो गाव सोडतो. तसे करण्यावाचून दुसरा मार्गच त्याच्यापुढे राहात नाही.

या कादंबरीवरून हमीदच्या स्वभावातल्या या परकेपणाविषयीचा अंदाज बांधता येतो. लहानपणी गांधी टोपी घालतो म्हणून वडिलांनी मारलेले होते, याची डोक्यात तिडीक. वडील आणि गावातले इतर वडीलधारे लीगवाले, त्यामुळे या मुस्लीम राजकारणाविषयीच तिडीक बसली असावी. कलावंताचे संवेदनाक्षम मन असल्याने या जातीय राजकारणापायी होणारी निरपराध जीवांची फरपटही त्याला दिसत होती.

‘लाट’ कथासंग्रहातली ‘छप्पर’ या गोष्टीतली करीमची व्यक्तिरेखा ही हमीदच्या भूमिकेच्या संदर्भात फारच अन्वर्थक वाटते. घरात बहिणीला टी.बी. झाला म्हणून शहरातून आलेला भाऊ, करीम, अस्वस्थ होतो. तिला वेगळे ठेवा, तिचे उष्टे कोणी खाऊ नका असे सर्वांना बजावतो. पण मागासपणामुळे, मायेपोटी ते पाळले जात नाही. घरातली एकेक करीत करीत करीम व आई सोडून सगळी माणसे टी.बी. होऊन मरतात. करीम वेडा व्हायची पाळी येते. तो म्हणतो, ‘या काळोखाने सगळ्यांना खाल्ले. हे छप्परच उडवले पाहिजे. त्याशिवाय हा रोग घराबाहेर जाणार नाही.’ त्याची आई म्हणते, ‘अरे, वाडवडिलांनी बांधलेलं छप्पर का पाडतोस? त्यापेक्षा घरात सुधारणा कर...’

हमीदची सुरुवातीच्या काळातरी धडक ही करीमसारखीच होती. सद्हेतूने पण छप्पर उडवायची भाषा तो करीत होता. करीमची गोष्ट लिहिणारा कलावंत हमीद त्या आईची बाजू समजू शकत होता. पण समाजसुधारक हमीद काही मर्यादा ओलांडू शकला नाही.

...

... यावर कोणी म्हणेल की, ‘वैचारिक मांडणीचे काम हमीदने केले. चळवळीची किंवा संघटनेची बांधणी करण्याचे काम दुसऱ्या कोणी करावे.’ हे काम कोणी केले तर उत्तमच. पण तसे सहसा होत नाही. जो एखाद्या चळवळीचा प्रवर्तक असतो, त्याची आपल्या समाजात अतिशय खडतर अवस्था असते. त्याला अभ्यास करून, ग्रंथालय पालथे घालून ग्रंथनिर्मितीही करावी लागते आणि चळवळीतल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हेव्यादाव्यांना, कटकटींना तोंड देऊन सर्वांचा मेळ घालावा लागतो. फुले व आंबेडकरांनी हे केले. तेव्हा डोळस माणसाला अपयशाला अपयश म्हणूनच पुढे जावं लागतं.
***

अवचटांच्या मूळ पुस्तकातील मजकूर इथे दोन भागांत लेखाच्या स्वरूपात प्रसिद्ध केलाय. पुस्तकात दलवाईंचं आजारपण आणि नंतर मृत्यू इथपर्यंत अवचट येऊन थांबतात. आपण ब्लॉगच्या मर्यादेत अवचटांचे दलवाईंसोबतचे व्यक्तिगत अनुभव-आकलन आणि दलवाईंच्या सामाजिक भूमिकेचा-साहित्याचा त्यांचा अंदाज एवढाच भाग इथे संपादित करून कुठली लिंक तुटणार नाही याची शक्य तेवढी काळजी घेऊन दिला आहे.
मूळ पुस्तक पुण्यात टिळक रोडवर नीलकंठ प्रकाशनाच्या दुकानात पन्नास रुपयांना मिळतं.

Friday, March 2, 2012

From Ramachandra Guha's Column

This post includes first three paragraphs of an article ('Jinnah Reassessed - Insights of a courageous thinker) written by historian Ramachandra Guha in his weekly column (Politics and Play) in The Telegraph

Only these three paragraphs are posted here because they directly connect with the motive of this blog.
To read the full article click here

The text below is posted here with the permission from Ramachandra Guha 
 ***

It was on a pavement near Bombay’s Flora Fountain, some 15 years ago, that I discovered Hamid Dalwai. On the hard dark stone the title of his book leapt out for attention: Muslim Politics in India. I bought it (for something like twenty rupees), and took it home to Bangalore. I have since read it at least half-a-dozen times.
Although little known today, Hamid Dalwai was perhaps the most courageous thinker to come from the ranks of Indian Muslims. Born in the Konkan, he moved to Bombay as a young man and threw himself into leftwing politics. He wrote some fine short stories, and also some superb political essays, these translated by his friend and fellow writer, Dilip Chitre, and published in book form as Muslim Politics in India. The book excoriates both Muslim reactionaries and Hindu obscurantists, and calls for liberals of all shades and faiths to come together on a common platform to build a secular, plural, and modern India.
When I included Hamid Dalwai’s work in an anthology of Indian political thought, some critics were puzzled. Others were enraged. The source of the puzzlement (and anger) was two-fold — first, that I had included a man the critics had never heard of; second, that I had excluded Maulana Azad. It is true that Dalwai is now largely forgotten. This is in part because he died in his early forties. As for choosing him over Azad, the fact is that while the Maulana was a great scholar and nationalist, his writings do not really speak to the problems of the present.
My admiration of Dalwai was confirmed by a later essay of his that I recently read. This is a reassessment of the life and legacy of Mohammad Ali Jinnah, translated by Dilip Chitre, and published in 1973 in the literary journal, Quest. That journal is now defunct, but Dalwai’s essay is included in an excellent recent anthology called The Best of Quest.

Followers

या कात्रणवहीसाठी माहितीसंकलन व टायपिंग, इत्यादी खटाटोप केलेल्या व्यक्तीनंच वरील वह्याही तयार केल्या आहेत. त्याच्या सुट्या वेगळ्या वहीसाठी पाहा: रेघ