प्रकाशक- नीलकंठ प्रकाशन. मुखपृष्ठ- दिलीप भंडारे |
‘हमीद दलवाई यांच्या एका पत्रकार मित्राने त्यांच्या निधनानंतर उत्सफूर्तपणे लिहिलेला हा मजकूर आहे... आपल्या फार जवळचे माणूस जाते त्यानंतर त्याच्या आठवणी जागवीत आपण त्याच्या जाण्याने पडलेला प्रचंड खड्डा भरून काढण्याचा प्रयत्न करतो तसे या मजकुराचे स्वरूप आहे. अशा आठवणीत चरित्राचा मुद्देसूदपणा, नेमकेपणा अपेक्षिणे गैर. हे एक प्रकारचे ‘जागरण’ आहे. मित्राच्या जाण्याने बेचैन झालेले मन भूतकाळ उगाळीत त्या मित्राचा पुनः कधीही न मिळणारा सहवास, त्यातले कडू गोड दिवस आठवते आहे’, असं विजय तेंडुलकरांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय.
***
एक
हमीद अस्वस्थ आणि आक्रमक व्यक्तिमत्त्वाचा माणूस होता. जी गोष्ट करायची ती निधडेपणाने, मनस्वीपणे, मनमुरादपणे, असा त्याचा खाक्या होता. मुस्लीम समाजात आधुनिक मूल्ये रुजवणे हे तर त्याचे मिशनच होते. त्याचा त्याला अहोरात्र ध्यासच लागला होता. गप्पांमध्येही इतर विषय त्याला सहन होत नसत. त्याच्या गप्पा ऐकणाराला वाटावे की, भारतात या प्रश्नाखेरीज दुसरा प्रश्नच अस्तित्वात नसावा.
मैत्रीही मनमुराद करायचा. माणसांचे त्याला व्यसनच होते. जीवनातली अनेक सुखे तो आसक्तीने उपभोगीत असे. दोस्त जमवून गप्पा मारणे, खाणे-पीणे, सिनेमे बघणे, गाणी ऐकणे, पुस्तके वाचणे... जे जे तो करायचा, त्यात तो स्वतःस पूर्णपणे झोकून द्यायचा.
पुण्याला वरचेवर यायचा. तो आला की ते दोन-चार दिवस आमचे राहायचेच नाहीत. ते त्याचे असायचे. आम्हा चारसहा मित्रांचे एरवीचे कार्यक्रम तो पार मोडून-तोडून टाकायचा. कधी मरगळ आली आणि कळले की, हमीद पुण्याला आला आहे की मरगळ अगदी विरून जायची. आम्ही त्याच्यापासून उदंड उत्साह घेतला.
हमीद रंगून बोलायला लागला की, एका हाताची बोटे छातीजवळ घेऊन हात पुढे-मागे झटकायचा. भुवया सतत वरखाली करायचा. जोकमधले स्फोटक वाक्य डोळे मोठे करून, जाड्या खर्ज आवाजात बोलायचा. बसला की मांडी उडवत बसायचा. परवाच्या दुखण्यात तो एवढा अशक्त झाला होता- इतर काही करता येत नव्हते, तर तळपायाची बोटे सारखी हलवत राहायचा. शरीराच्या कुठल्यातरी भागाची हालचाल नाही, असा क्षणही पाहण्यात नसायचा.
त्याच्या तोंडात सतत सिगारेट असायची. दिवसाकाठी तीन-चार पाकिटे ओढायचा. सिगारेटचा ब्रँडही बदलता असे. प्रथम पिवळा हत्ती, चारमिनार, विल्स. अलीकडे तो सिमला ओढीत असे. मधे केंट या परदेशी सिगारेटची त्याला आवड निर्माण झाली होती. बॅगेत अनेक औषधी गोळ्यांच्या स्ट्रिप्सही पडलेल्या असत. ग्लॉकोमामुळे डोके दुखायचे, मग क्रोसिनच्या गोळ्या घ्यायच्या.
हमीद देखणा होता. घारे डोळे, गोरा रंग, तरतरीत नाक, बोलणे नाकात-कोकणी व हेलात असायचे. आदल्या रात्री निरोप आल्यावर ‘पूनम’वर सकाळी भेटायला जायचो, तेव्हा हमीद रिसेप्शन-रूमपाशी फेऱ्या मारत, हातात पेपर उघडून वाचत, मधूनच घडी करून काखोटीला मारीत असायचा. ते त्याचे दिवसातले पहिले ताजे, टवटवीत, प्रसन्न दर्शन असायचे.
अंगात सुरेख टेक्श्चरचा, सौम्य आल्हाददायक रंगाचा खादी सिल्कचा बुशशर्ट असायचा. खाली खादीची पांढरी पँट असायची. लहानपणी सेवादलात असल्यामुळे आणि मोठेपणी टेक्श्चर व फील आवडतो म्हणून खादी घालीत असे. प्रवासात दिल्ली, आसाम, कलकत्ता कोठेही गेला तरी मिळतील तिथून छान छान कापडाचे पीसेस आणीत असे. त्याच्या रंगाच्या निवडीविषयीचे कौतुक बोलून दाखवताच तो म्हणे, ‘सिलेक्शन! अवचटजी इसे कहते है सिलेक्शन. इस बारेमें हमको माननाही पडेगा.’ ‘माननाही पडेगा’ ही त्याची आवडती टर्म. इतरांच्या बाबतीतही ती तो मुक्तपणे वापरे.
आम्ही बाहेर पडलो की, प्रथम कार्यक्रम ठरवायचो. त्याच्या आवडीनिवडी मला माहीत झाल्या होत्या. त्याला पहिल्यापासून वरचेवर लघवीला जावे लागे. कुणाकडे जायच्या आधी लघवीला जाऊऩ आले की, त्याला स्वस्थ वाटे. (हे कदाचित काही व्याधीमुळे असेल या शंकेने मी एकदा डॉक्टरकरवी लघवी व इतर तपासणी करून घेतली होती. पण रिपोर्टात सर्व काही ठीक निघाले होते.) म्हणून कार्यक्रम ठरवताना मी ‘आपण आधी अमक्याकडे जाऊ, तिथून तमक्या (हमीदच्या आवडत्या) हॉटेलात नास्ता करू, तिथे मागे मुतारीही आहेच, तिथून तिसरीकडे जाऊ’ असे ठरवीत असे. ते ऐकून हमीद म्हणे, ‘बस अवचटजी, इसलिये हम तुमको मानते है.’
...
हमीद सदैव प्रवासाला जायचा. परत आल्यावर त्याच्या गप्पा आणखीनच फ्रेश व्हायच्या. तिथं भेटलेली नाना तऱ्हेची माणसं, त्यांच्या लकबी यांचे पूनमधल्या खोलीत हमीदचे परफॉर्मिंग आर्टचे प्रयोग सुरू व्हायचे. आम्हाला हसवण्याच्या उद्देशाने सांगितलेल्या गप्पा असल्या तरी त्यातून नकळत त्या त्या गावचे चित्रच उभे राहात असे. हमीदच्या कलावंताच्या नजरेने ती ती वैशिष्ट्ये बरोबर टिपलेली असायची.
परवा दोन आजारपणांच्या मध्ये कोल्हापूरला जाऊन आल्यावर सांगत होता, ‘सालं ते गावच और. फेटेवाले, लुंगीवाले, मिशीवाले. रिक्षाने चाललो होतो. रस्ता होता, कडेला फुटपाथ होता. रस्त्याच्या मधूनच पाच-सहा आडदांड माणसं चाललेली. रिक्षाला रस्ताच नाही. रिक्षावाला थांबून बाहेर मान काढून म्हणाला ‘अबे राव, जरा हटा की. त्याबरोबर तिघे-चौघे एकदम वळले. त्यातला एक फुटपाथकडे हात करून रिक्षावाल्याला म्हणाला, ‘तूच घाल की तिकडनं.’ त्यावर रिक्षावाला काही बोलू लागताच दुसरा म्हणाला, ‘उचला रे याला रिक्षासगट.’ रिक्षावाल्याने निमूटपणे अबाऊट टर्न घेऊन दुसऱ्या रस्त्याने रिक्षा घेऊन गेला. आता काय यांच्यापुढे करणार बोला.’
मी म्हटले, ‘कोल्हापूरला मटन जहाल असतं. तू चापलं असशीलच.’ हमीद म्हणाला, ‘तिथं सगळीकडे मटन इकडच्यापेक्षा खूप तिखट. पण तिथेही एका खानावळीत आणखीच तिखट. तिथं गेलो होतो. जेवायला बसलो. शेजारच्या टेबलावर मारामारीचा प्रसंग. दोन-तीन पैलवान मंडळी नळी मागत होती. (नळी म्हणजे बोन पीस त्यातून मॅरो शोषून घेतात.) वेटर म्हणत होता, ‘अहो साहेब, पहिल्यांदा मटनाच्या बशीत येते तेवढीच नळी मिळते.’ मालक आला. त्याने भिंतीवर लावलेली पाटी दाखवली, ‘येथे नळी एकदाच मिळेल.’ त्यांना कसेबसे शांत केले. दुसऱ्या अशाच ‘तिखट’ हॉटेलात गेलो, तिथे गिऱ्हाइके ‘कट’ मागत होती. कट म्हणजे मटनाच्या रश्श्यावरच्या तेलाचा तवंग. ह्यात तिखट आणखीच उतरलेले असते. आता तो रश्श्याबरोबर येतो तेवढाच कट प्रत्येकाला मिळणार. जादा कसा येणार? त्याही हॉटेलात अशी पाटी लावली होती, येथे जादा कट मिळणार नाही. अशी ही माणसं. काय करणार यांच्यापुढे? अवचटजी, आहे का इलाज काही तुमच्याकडे यांच्यावर?’
हमीद मुसलमान प्रश्नाच्या अभ्यासासाठी भारतभर फिरला होता. मुसलमानांची सांस्कृतिक बैठक ज्या प्रांतात आहे, त्या उत्तर प्रदेशात तो फिरला होता. तिथले खानदान, अदब पाहून आला. देवबन, अलिगड ही मुसलमानांमधली विचारप्रवाहन निर्माण करणारी केंद्रे पाहून आला. लखनऊची नबाबी संस्कृती पाहून तो सांगत होता, ‘तिथे बोलण इतक सॉफ्ट की विचारायची सोय नाही. तिथले लोक मागून खंजीर खुपसून. पुढून आदाबर्ज करून ‘जनाब, आपको तकलीफ तो नहीं हुई?’ असे विचारतील.’
लखनऊला मनोहर तांबे नावाच्याय तिथे स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीय माणसाकडे हमीद उतरला होता. तांब्यांनी त्याचे छान आदरातिथ्य केले. हमीदने त्याचे ‘मराठी माणसाला न शोभेल असे आदरातिथ्य त्यांनी केले’, असे वर्णन करीत असे.
...
नव्या ठिकाणी गेल्यावर तो भाग पाहण्याची हमीदची दृष्टी एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलाची असायची. त्याने अगदी लहानपणीची आठवण एकदा मला सांगितली होती. त्याच्या आईली टी.बी. झाला म्हणून तिला मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये ठेवले. उपचारही होतील आणि देशावरच्या मोकळ्या हवेत बरेही वाटेल, असा त्यात विचार होता. छोट्या हमीदलाही तिने बरोबर नेले होते.
या भेटीविषयी हमीद मला एकदा म्हणाला होता, ‘मी प्रथमच गाव सोडून इतक्या लांब आलो होतो. माळरानावरचा सुसाट वारा मला आठवतोय. लांबच लांब पसरलेली सपाट जमीन पाहून मी चकितच होऊन गेलो. आमच्या तिकडे चिपळूणला टेकड्या-टेकड्यांचा भाग. तिकडे टेकडीवर गावं. टेकडी संपली की गाव संपले असे सहजच समजता येतं. इकडं सगळं आपलं सपाट. इथं गाव संपलं, असं लोकांना कशावरून समजत असेल, असा मला तेव्हा प्रश्न पडला होता.’
हीच बालसुलभ वृत्ती मोठा झाल्यावरही कायम राहिली होती. मध्यंतरी तो पाकिस्तानला जाऊन आला. बायकोकडचे काही नातेवाईक तिकडे आहेत. परदेशी जायचा त्याचा तो पहिलाच प्रसंग. तो सांगत होता, ‘परदेश म्हणजे काही तरी वेगळं असणार असं वाटायचं. नकाशात दोन देशांना वेगळे रंग दिलेले असतात, तसं काही दिसेल अशी कल्पना होती. बॉर्डर क्रॉस करायच्या क्षणाची उत्सुकता होती. प्रत्यक्षात वेगळं काही घडलंच नाही. ट्रेनने गेलो होतो. आधीचं स्टेशन भारताचं नंतरचं स्टेशन पाकिस्तानचं. मध्ये रेषा वगैरे काही आखलेली नव्हती. सगळा प्रदेश सारखा. सरहद्द म्हटल्यावर दोन्हींकडे बंदुकी एकमेकांवर रोखून लोक उभे असणार असे वाटायचे. तसेही नव्हते. लोक शेतात शांतपणे काम करीत होते.’
जरा थांबून तो पुढे सांगू लागला, ‘पुढे स्टेशनावर पाकिस्तानी पोलीस चेकिंगला आले. रस्त्यांवर स्त्रियांच्या बुरख्यांच्या जाहिराती दिसून लागल्या. आपल्याकडे कधी बुरख्यांच्या जाहिराती पाहिल्यात? मग हळूहळू ‘पाकिस्तान’ दिसू लागले.’
...
हमीद कधी खास मूडमध्ये असायचा. मग त्याला त्याचे लहानपण आठवायचे. चिपळूणजवळचे मिरजोळी हे त्याचे गाव. त्याच्या ‘इंधन’ कादंबरीत किंवा ‘लाट’ या कथासंग्रहातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये ते गाव पार्श्वभूमीला आहे. हमीद गावाकडच्या गोष्टी सांगायचा. तिथली गमतीशीर पात्रे सांगताना एका उत्साही पोराची त्याने एकदा हकीगत सांगितली होती. गावात एका विवाहित बाईबरोबर एका माणसाची भानगड होती. ती कळल्याने गावातले काही लोक अतिशय संतप्त झाले. तो माणूस बाईकडे रात्री गेल्याचे कळल्यावर सगळे त्या बाईच्या घरासमोर जमले व हा खाली आला की, त्याला ठोकायचे असे ठरवले. घरामागे ओढा होता. घराच्या मागच्या दाराने ओढ्यातून त्या माणसाने पळून जाऊ नये म्हणून एका उत्साही वीराला पहाऱ्याला तिथे उभे केले. हा वीर सोटा घेऊन उभा राहिला. तो बाईकडे गेलेला माणूस पुढच्या दाराने खाली आल्यावर लोकांनी त्याला धरले. पिटायचे ते पिटले. पुढे तडजोड होऊन सगळे घरी गेले. उत्साही वीर मात्र सोटा घेऊन ओढ्यातच उभा. सकाळी त्याच्या घरचे लोक त्याच्या मित्रांना विचारू लागले की, हा (वीर) कुठंय? तेव्हा सगळे शोधायला लागले, तर हा सोटा घेऊन अटेन्शनमध्ये ओढ्यात उभा असलेला दिसला.
...
हमीदला माणसांचे व्यसन होते. पुण्या-मुंबईत आणि भारतात इतरत्र खूप माणसे त्याच्या जिवाभावाची हती. हमीदची पत्त्यांची डायरी चाळली तरी त्याच्या अफाट मनुष्यसंग्रहाची कल्पना यायची. तो एकटा विचार करीत पडलाय असे दृश्य आजारपणाच्या आधी कधीच दिसायचे नाही. पुण्यात आल्यावर सकाळपासून आमची माझ्या स्कूटरवर भ्रमंती सुरू व्हायची. रावसाहेब पटवर्धन हयात असताना आम्ही त्यांच्याकडे जायचो. रावसाहेबांचे हमीदवर मुलासारखे प्रेम. आपल्या खर्ज आवाहा ‘काय दलवाई, कधी आलात? कार्य कसे चालले आहे’ वगैरे चौकशी करायचे.
प्रभाकर पाध्यांकडेही आम्ही दर भेटीच्या वेळी जायचो. सरिता व मंगेश पदकींच्याकडे, स.शि. व सुमित्रा भाव्यांकडे चक्कर असायची. ही त्यांची लेखक मित्रमंडळी. सरिता पदकींकडे पूर्वी तो उतरत असे. आम्ही गेलो तेव्हा सरिताबाई म्हणाल्या, ‘दलवाई, तुमच्याविषयी आमची तक्रार आहे. तुम्ही तुमच्या कार्यापायी ललित लेखन अजिबात बंद केले, हे बरोबर नाही.’ मी म्हटले, ‘अहो, लेखक आपल्याला मिळतील. पण मुसलमानात असा माणूस प्रथमच निपजला आहे. तेच कार्य जास्त महत्त्वाचे आहे.’ हमीद अशावेळी काहीच बोलत नसे.
मुंबईतल्या लेखकमित्रांचाही त्याच्या बोलण्यातून उल्लेख यायचा. सदानंद रेगे हे त्याचे जवळचे मित्र. रेग्यांविषयी तो एकदा म्हणाला, ‘रेगे हा भांडणं करतो, अशी त्याची प्रसिद्धी आहे. त्याच्याशी मैत्री झाली की, लगेच तो त्याच्याबरोबर भांडण करतो. म्हणून काही लोक आता उघड म्हणतात, ‘रेगे तुझ्याबरोबर आम्हाला मैत्री करायची नाही, कारण तुझ्याबरोबर आमचं भांडण व्हावं असं आम्हाला वाटत नाही.’’
पुण्यात ‘साधने’च्या कचेरीला त्याची हमखास भेट असायची. साधनेने व यदुनाथ थत्त्यांनी हमीदला सुरुवातीपासून उचलून धरलेले.
हमीद ज्यांना मार्गदर्शक मानायची अशी मंडळी म्हणजे श्री. पु. भागवत, अ. भि. शहा, वसंत नगरकर, मे. पुं. रेगे, नरहर कुरुंदकर. कुरुंदकरांनी हमीदच्या बरोबरीने मुस्लीम जातीयवादावर कोरडे ओढले. त्यांनी एकदा हमीदला नव्या वर्षाच्या शुभेच्छा पाठविल्या होत्या. कार्डावर त्यांनी त्यांच्या अशुद्ध लेखनाचे नियम पाळून लिहिले होते, ‘तुम्हाला नवे वर्ष सुखा-समाधानाचे, समृद्धीचे जावो असे मला म्हणवत नाही. कारण तसे म्हणणे म्हणजे आपण अंगिकारलेले कार्य सोडून द्या, असे म्हणण्यासारखे आहे. तुम्ही हे कार्य करीत राहावे अशी इच्छा असल्याने तुम्हाला नवे वर्ष खडतर कष्टाचे जावो असे लिहितो.’
शहांविषयी हमीदला खूपच आदर होता. ‘शहा हा अतिशय डिसेंट व उमदा माणूस आहे. आमचे काही वेळा वैचारिक मतभेद झाले तरी ते शहांनी त्या पातळीवरच ठेवले. मनानेच ते डेमोक्रॅटिक वृत्तीचे आहेत.’ असे तो म्हणे. शहा मुस्लीम सत्यशोधक अधिवेशनात उंच फरची टोपी घालून बसत. त्याची तो थट्टाही करे. शहांच्या ‘कमिटी फॉर कल्चरल फ्रिडम’ या समितीवर अमेरिकाधर्जिणी अशा शिक्का असल्याने व ती चालविणाऱ्या शहांशी हमीदचे संबंध असल्ने हमीदचे जातीय मुस्लीव व हिंदू विरोधक, कम्युनिस्ट मंडळी हमीदवर सी.आय.ए.चा एजंट असल्याची टीका करीत. हमीद म्हणे, ‘सालं, त्या सी.आ.ए.चा पत्ता तरी सांगा आम्हाला. मी अर्जच करणार आहे; डिअर सी.आय.ए. आम्ही तुमचे एजंट व्हायला तयार आहोत. तुमचे पैसे कुठे मिळतात ते कळवावे. म्हणजे त्या पत्त्यावरून नेण्याची व्यवस्था करू.’ जरा थांबून तो म्हणे, ‘अरे, सी.आ.ए. एजंट म्हणून ज्यांच्यावर पेपरमधून उघड टीका होते, त्यांना पैसे द्यायला सी.आय.ए.वाले काय मूर्ख आहेत? ज्याचा संशयही येणार नाही, अशीच माणसे त्यांचे एजंट असणार. उघड उघड एजंट व्हायला सी.आ.ए. हे काय वर्तमानपत्र आहे?’
शहा, कुरुंदकर, यदुनाथ हे समविचाराचे लोक हमीदचे मित्र असतील यात फारसे आश्चर्य नाही. हमीदचे ज्यांच्याशी कडवट मतभेद होते अशांशीसुद्धा तो उत्तम संबंध ठेवीत असे. काहींशी तर त्याची दाट मैत्रीही जमली होती. कर्तारसिंग थत्ते हे हिंदुत्वनिष्ठ चमत्कारिक गृहस्थ. शस्त्र बाळगता यावे म्हणून शीख धर्म स्वीकारलेला. मुसलमानांच्याविषयी, त्या सगळ्यांना ठार केले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. हमीदला ते भेटले की प्रथम म्हणायचे, मला दहा रुपये द्या. हमीदही निमूटपणे नोट काढून द्यायचा. एकदा हमीदला टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगसमोर कर्तारसिंग थत्ते भेटले. ते काही बोलायच्या आत हमीदने दहाची नोट त्यांच्या हातावर ठेवली आणि तो त्यांना म्हणाला, ‘माझ्या पूर्वजांनी तुमच्या पूर्वजांकडून जो जिझिया कर घेतला होता. त्याची प्रथम भरपाई होऊ द्या, मग दुसरे बोलू.’ कर्तारसिंग गडगडून हसले, व म्हणाले, ‘दलवाई, तुला आम्ही मानला. हिंदुस्थानातल्या सगळ्या हिंदूंना च्युत्त्या बनवलंस तू. आम्ही गेली वीस-पंचवीस वर्षे मुस्लीमविरोधाची धार लावत आणली होती. तू दोन वर्षांत ती बोथट करून टाकलीस. मानलं तुला!’
...
दोन
हमीद दलवाईला मुस्लीम समाज सुधारणेचा ध्यास लागला होता. जळी स्थळी तोच प्रश्न. या विषयावर त्याची अखंड बडबड ऐकून मी एकदा कंटाळलो व म्हणालो, ‘आता हे हिंदू व मुसलमान दोघेही खड्ड्यात जाऊ देत. आपण संध्याकाळी भेटू तेव्हा निराळ्या विषयावर बोलायचे.’ त्याला तो कबूल झाला. संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो. मी पाहिलेल्या एका चांगल्या सिनेमाची त्याला गोष्ट सांगू लागलो. मधेच थांबवून सिनेमातला संदर्भ घेऊन मला म्हणाला, ‘म्हणजे हे आमच्या शेख अब्दुल्लासारखं झालं. डू यू नो व्हेन शेख अब्दुल्ला...’ असे म्हणून मुस्लीम प्रश्नावर परत त्याचा धबधबा सुरू झाला.
एखाद्या प्रश्नावर एवढा झपाटलेला माणूस माझ्या पाहण्यात नाही. इतर मौजमजा चालली असली तरी ती करत असतानाही हमीदची या प्रश्नातली इन्व्हॉल्व्हमेंट कुठे कमी पडली नाही. माझ्यासमोर त्याची दहा-बारा वर्षे गेली. त्या आधी नुकते त्याचे काम सुरू झालेले होते. आजाराची गेली दोन वर्षे सोडली तर आठ-दहा वर्षे एवढाच काळ त्याला काम करायला मिळाला. पण एवढ्याशा काळात त्याने सबंध भारतातल्या मुसलमान समाजाला हादरा दिला. आणि दूरवर पाहता जागतिक इस्लामच्या इतिहासात अभूतपूर्व घटना करून दाखवली. त्याच्या कामगिरीचं गमक म्हणजे त्याने घेतलेली भूमिका आणि ती पुस्तकात न ठेवता तिचे मास-मूव्हमेंटमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याने केलेली धडपड.
‘अल्ला हा स्तुतीस पात्र असा जगातील एकमेव देव आहे. महंमद पैगंबर हा अल्लाचा रसूल (दूत) असून त्याच्याकरवी अल्लाने कुराण ही शिकवण माणसासाठी सांगितली आहे.’ ही इस्लामची थोडक्यात भूमिका. आजपर्यंत इस्लामच्या तेराशे वर्षांच्या इतिहासात या भूमिकेला कोणी जाहीररित्या आव्हान दिलेले नव्हते. ते हमीद दलवाईने दिले. यापूर्वी प्रागतिकक विचारसरणीचे अनेक मुस्लीम विचारवंत होऊन गेले. मौलाना आझादांसारख्यांनी कुराणाची निराळी इंटप्रिटेशन्स केली. न्या. छगलांनी मुस्लीम जातीच्या राजकारणावर टीका केली. पण कुराण हा ईश्वरी ग्रंथ आहे, यावर कोणी शंका घेतली नाही. काही मुस्लीम मार्क्सिस्ट झाले. त्यांनी मार्क्सिझम स्वीकारला. पण इस्लामच्या मूलतत्त्वांविषयी जाहीर भूमिका घेण्याचे त्यांनी टाळले. हमीदने त्याच्या कार्याच्या सुरवातीपासून ‘महंमद पैगंबर हा माणूस होता. त्याने त्यावेळच्या समाजधारणेसाठी कुराण हा ग्रंथ लिहिला, त्या काळात त्या समाजाला ते नियम आवश्यक वाटले असले तरी कालमानानुसार त्यातील काही नियम चुकीच्या पायावर आधारलेले आहेत, ते रद्द व्हावेत’ अशी भूमिका घेतली यात कुठेही कधीही त्याने लपवाछपवी केली नाही. कुठे तडजोडही केली नाही.
या त्याच्या भूमिकेमुळे इस्लामच्या जगतात खळबळ उडाली. अशा गद्दार माणसाला नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मृत्यूच्या छायेत हमीद सततच वावरत राहिला. मुस्लीम पुढाऱ्यांनी हमीदच्या मृत्यूनंतर साधे उपचार म्हणूनसुद्धा दुःखप्रदर्शन केले नाही. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे आलेल्या दुखवट्याच्या ठरावालाही त्यांनी विरोध केला, इतका त्यांच्या मनात हमीदविषयी कडवटपणा भरलेला होता.
पासष्ट-सहासष्ट साली हमीदचे भाषण मी पन्हाळ्याच्या शिबिरात ऐकले. वजनदार कुऱ्हाडीने घाव घालावा तसं वाटलं. त्याच्या भाषणाच्या आधी एस.एम. जोशांनी ‘मुस्लीम समाजातला आगरकर’ अशी त्याची ओळख करून दिलेली होती. परवा त्याच्या मृत्यूनंतरच्या पुण्यातल्या शोकसभेत नानासाहेब गोरे, बाबा आढाव, पु. ल. देशपांडे आणि इतर वक्त्यांनी त्याला महात्मा फुल्यांची उपमा दिली. पण ‘मुस्लीम समाजाचा महात्मा फुले’ अशी उपमा न देता, ‘हा सर्व समाजाला आवश्यक, महात्मा फुल्यांचा वारस आहे’ असे सर्वांनी म्हटले. आठदहा वर्षांतली हमीद दलवाईच्या कार्याची ही वाटचाल आहे.
हमीदने गांधीटोपी घालण्यावरून वडिलांच्या हातचा मार खाल्ला. पुढे हट्टाने तो टोपी घालू लागला. सेवादलात जाऊ लागला. गावच्या काही पुढाऱ्यांच्या हातचा मार खाल्ला, तरी डरला नाही. पुढे मुंबईला आल्यावर सेवादलाच्या संपर्कामुळे तो सोशालिस्ट पक्षाच्या परिघात वावरू लागल्यावर या प्रश्नाची इतर सहकाऱ्यांबरोबर चर्चा करू लागला. त्याला समाजवादी पक्षातही या विषयाचा कोणी सखोल विचार केलेला आढळला नाही. वैचारिक पातळीवर भोंगळपणा आणि कृतीच्या बाबतीत मुस्लिमांचा अनुनय असा प्रकार त्याला तेथे आढळला. पण त्या पक्षात त्याला बोलायची संधी मात्र मिळत गेली. त्याला तिथे स्थानही होते. मला भेटला त्या वर्षी तो संयुक्त समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवर होता. पण आपली मते मांडून पक्षाचे धोरण बदलेना म्हणून तो निराश झाला होता.
या सुमारास त्याच्या भूमिकेला अ. भि. शहा व कुरुंदकर यांनी उचलून धरले. मी तेव्हा यूथ ऑर्गनायझेशन – पुढे जिचे युवक क्रांती दल झाले- मधे काम करीत होतो. आम्ही पुण्यात त्याची टिळक स्मारक मंदिरात तीन व्याख्याने घडवून आणली. पुढे तो महाराष्ट्रभर व्याख्याने देत फिरला. भारतातल्या अन्य प्रांतातही हिंडला. थोडक्यात, त्याने विचारांचे स्वतंत्र व्यासपीठच उभे केले.
हमीदने या समाजापुढे असे मांडले की, स्वातंत्र्यपूर्व काळात मुसलमान फुटीर वृत्तीने का वागले, किंवा आजही भारतातले मुसलमान मुख्य प्रवाहात का समरस होत नाहीत, याचे खापर केवळ हिंदुत्त्ववाद्यांवर फोडून चालणार नाही. मुसलमानांच्या इतिहासाचे नीट परिशीलन केल्यावर मुस्लीम राजकारणामागच्या शक्ती ध्यानात येतील. इस्लामच्या तेराशे वर्षांच्या इतिहासात त्याला पराभव जवळपास माहीत नव्हता. एका छोट्याशा, कोणाला माहीत नसलेल्या देशात हा धर्म उदय पावला आणि एकतृतीयांश जगावर त्याचे राज्य पसरले. भारतातही मुस्लीम नेतृत्वाला आपण राज्यकर्ती जमात आहोत, याचा अजूनही अहंकार आहे. तेव्हा या प्रवृत्ती ज्यांच्यात परंपरेने जोपासल्या गेल्या आहेत, त्यांना सेक्युलर कसे बनवायचे, या आव्हानाचा विचार करा.
कडव्या हिंदूंना उद्देशून त्याने सांगितले, ‘इतिहासाच्या एका क्षणी हिंदुस्थानची फाळणी झाली. फाळणीची चिकित्सा होऊ शकेल, फाळणीचे गुन्हेगारही ठरवता येतील. पण ते चक्र उलटे फिरविण्याचे स्वप्न पाहू नका. कित्येक प्रांतातल्या लोकांनी या देशातून फुटायचा निर्णय त्यावेळी घेतला होता हे विसरू नका. आता भारतातल्या आठ कोटी मुसलमानांना पाकिस्तान आश्रय देणार नाही, शिवाय त्यांची तिकडे जायची तयारी नाही. ही आठ कोटी माणसे आपण ही समुद्रात बुडवू शकत नाही. तेव्हा यांच्याशी जुळवून घेण्याचाच विचार केला पाहिजे. त्यांना बरोबरीचे स्थान देऊन सर्वसामान्य मुस्लीम समाजाची मुल्लामौलवींच्या संधिसाधू पकडीतून कशी सुटका करता येईल ते पाहा. त्यासाठी त्यांचा द्वेष करणे सोडून त्यांच्यातल्या सामाजिक सुधारणांना हात घातला पाहिजे. मुसलमानात या विचाराचे तरुण पुढे येऊ पाहात आहेत. ते त्या समाजात कसे रुजतील हे पाहिले पाहिजे. जातीय दंगली करून प्रश्न सुटणे तर दूरच, पण अधिक बिकट होतील. आमच्यासारखे जे काम करतात त्यांची पंचाईत होईल.’
मुसलमान नेतृत्वामधल्या जातीय व आक्रमक प्रवृत्तींवर प्रहार करणारा हमीद हा एक मुस्लीम माणूस निघाल्याने त्याला खूप महत्त्व आले. तो एक मुस्लिमांच्या सामाजिक प्रक्रियेचा टप्पा ठरला. अ. भि. शहा, हमीद व इतरांनी सेक्यूलर फोरम स्थापन करून ‘सेक्युलरिस्ट’ हे इंग्रजी नियतकालिक काढून अखिल भारतीय स्तरावरच्या मुस्लीम इंटलेक्चुअल्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
शहांच्यामुळे हमीदच्या प्रेरणेला उत्तम वैचारिक बैठक मिळाली. शहांची इस्लामविषयावरची खाजगी लायब्ररी भारतातील उत्तम समजली जाते. त्यामुळे इस्लामविषयीचे जागतिक स्तरावरील चिंतन त्याच्या परिचयाचे झाले. दिल्लीचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी वसंत नगरकर यांच्या मुस्लीम प्रश्नाच्या गाढ्या व्यासंगाचा हमीदला खूप फायदा मिळाला. हमीदच्या भ्रमंतीत इस्लामिक हिस्टरीचे अलिगढ विद्यापीठातील जागतिक किर्तीचे विद्वान प्रा. हबीब यांची गाठ पडली. तेव्हा हमीदला मुस्लिमांमधला समविचारांचा माणूस प्रथमच भेटल्याचा आनंद झाला. दिलीप चित्रे ह्या प्रसिद्ध लेखकाने हमीदच्या लेखांची इंग्रजी भाषांतरे केली. शहांनी ती ‘क्वेस्ट’ व अन्यत्र छापवून आणली. त्यामुळे त्याची भूमिका अखिल भारतीय स्तरावर ज्ञात झाली.
हमीद केवळ भूमिका घेऊन थांबला नाही. तसा थांबला असता तर मोठा विचारवंत म्हणून त्याचा लौकिक राहिला असता. पण या पलीकडे काही नाही. त्याने आपल्या वैचारिक भूमिकेवरून मुस्लीम मास मूव्हमेंट बांधण्याचा सतत प्रयत्न केला.
हमीदने मुस्लीम स्त्रियांच्या तलाकचा प्रश्न हाती घेतला. इस्लामच्या कायद्यात शरियतमध्ये पुरुषाला चार बायका करण्याची मुभा व तोंडाने तीनदा तलाक उच्चारल्यावर बायकोला विनाजबाबदारी बेघर करण्याचा अधिकार दिलेला आहे. हमीदने मागणी केली की, हा मुस्लीम पर्सनल लॉ रद्द व्हावा. सर्व धर्मियांना समान नागरी कायदा लागू व्हावा.
यावर मुस्लीम नेतृत्वाकडून गदारोळ उठला : ही धर्मात ढवळाढवळ आहे. शरियत हा ईश्वरी कायदा आहे. त्यात कोणी बदल करू शकत नाही. शहा, हमीद आणि इतरांनी त्यांना दाखवून दिले की, इतिहासात शरियतमध्ये वेळोवेळी बदल झालेले आहेत. शरियतमध्ये चोरीच्या गुन्ह्याबद्दल हात तोडण्याची शिक्षा आहे. आणि इस्लामिक स्टेट्समध्येही ती अंमलात येऊ शकत नाही, इत्यादी.
हमीदने मुंबईला सहा मुस्लीम स्त्रियांचा समान नागरी कायद्याची मागणी करणारा मोर्चा काढला. तो खूप गाजला. इस्लामच्या इतिहासात असे प्रथमच घडत होते. पुण्याला भाई वैद्य, बाबा आढाव यांनी त्यांच्या पक्षातल्या व संपर्कातल्या मुस्लीम तरुणांची मीटिंग घेऊन हमीदला तेथे बोलावले. काही अंतराने चार-पाच सेशन्स झाल्यावर त्या तरुणांनी हमीदचे विचार स्वीकारून त्याच्याबरोबर काम करायचे ठरवले. या मंडळास ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ असे नाव दिले.
हमीदने समान नागरी कायद्याच्या मागणीबरोबर ‘वक्फ’ या मुस्लीम धार्मिक इस्टेटींच्या चौकशीची मागणी केली. या वक्फांच्या जीवावरच मुस्लिमांमधले जातीय नेतृत्व पोसले जाते. या इस्टेटी किती आहेत, त्यांचा विनियोग कसा होतो, याची सरकारला फारच थोडी माहिती आहे. हमीदने वक्फची चौकशी होऊन त्याचा विनियोग मुस्लीम समाजातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व्हावा, अशी मागणी केली.
उर्दू माध्यमाच्या शाळा बंद करून उर्दू हा एक ऐच्छिक भाषाविषय म्हणून ठेवण्यात यावा, अशी मागणी करणारी परिषद त्याने कोल्हापूरला डिसेंबर ७४मध्ये भरवली. त्याला साडेसातशे मुस्लीम प्रतिनिधी आले. परिषदेत अरेबिक लिपीचे, धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरसा या शाळांवर टीका झाली. ‘रेग्युलर शाळांमधे न जाता अशा शाळांमधे लहानपणी मुस्लीम मुले जाताता. त्यामुळे शिक्षणाचा सांधा तुटतो. म्हणून मुस्लीम समाजात गुन्हेगारीकडे वळण्याची प्रवृत्ती जास्त असते. अशा मदरशांचे ट्रस्टी कलेक्टर, मोठे ऑफिसर असतात. ते मात्र स्वतःच्या मुलांना मदरशांत घालून नुकसान करून घेत नाहीत. त्यांची मुले कॉन्व्हेंटमधे जातात’ अशीही एकाने टीका केली.
...
हमीदच्या वैचारिक धक्क्यामुळे मुस्लीम तरुणांची एक लाट सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे आली. पण पुढे आजतागायत तेच चेहरे कायम राहिले. नवी माणसे येऊच शकली नाहीत. त्यामुळे या जुन्या मंडळींच्या मर्यादा ह्या चळवळीच्याच मर्यादा बनल्या. ही चळवळ मुस्लीम जनमानसात रुजू शकली नाही.
हमीद स्वतःच या मुस्लीम समाजात रुजलेला नव्हता. आमच्यात जेवढा वेळ तो घालवायचा त्याच्या सहस्त्रांशही त्याने मुस्लीम समाजात घालविला नाही. त्याचा बहुतांश वावर ‘एलिट’ समाजात होता. त्यामुळे मुस्लीम समाजाला हमीदविषयी ‘सेन्स ऑफ बिलाँगिंग’ कधीच आला नाही. हमीदला त्या समाजाविषयी कळकळ नव्हती अशातला मुळीच भाग नाही. धडपड करून शकणाऱ्या नांदेडच्या एका मुस्लीम मुलीला तिचे शिक्षण बंद पडून नये म्हणून शंभर रुपये त्याने त्याच्या आजारपणाच्या काळातही आठवण ठेवून पाठविले होते. अशा तुरळक बाबी सोडल्या तर हमीद हा सर्वसामान्य मुसलमानांची मने जिंकू शकला नाही, त्यांच्यातला एक होऊ शकला नाही. त्यांना तो परकाच राहिला. त्याची ‘इंधन’ ही कादंबरी जवळपास आत्मचरित्रात्मक आहे. त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांच्या अनेक खुणा या कादंबरीत पसरलेल्या आहेत. ह्या कादंबरीचा नायक तरुण वयातच गाव सोडून जातो. हृदयरोगानंतर विश्रांतीसाठी म्हणून बऱ्याच वर्षांनी परत येतो. त्या गावात हिंदू-मुसलमान ताण वाढत जाऊन त्याचे भीषण पर्यवसान होत असताना तो केवळ एक प्रेक्षक असतो. मधे पडून ती प्रक्रिया थांबविण्याचा प्रयत्न करू लागताच त्याचे कोणी ऐकत नाही. एक जण तर त्याला म्हणतो, ‘तू इथून पळ काढलास. पंधरा वर्षे आम्ही ही सर्व झळ सोसली. आम्हाला उपदेश करण्याचा तुला काही अधिकार नाही.’ घडलेल्या घटनेनंतर तो गाव सोडतो. तसे करण्यावाचून दुसरा मार्गच त्याच्यापुढे राहात नाही.
या कादंबरीवरून हमीदच्या स्वभावातल्या या परकेपणाविषयीचा अंदाज बांधता येतो. लहानपणी गांधी टोपी घालतो म्हणून वडिलांनी मारलेले होते, याची डोक्यात तिडीक. वडील आणि गावातले इतर वडीलधारे लीगवाले, त्यामुळे या मुस्लीम राजकारणाविषयीच तिडीक बसली असावी. कलावंताचे संवेदनाक्षम मन असल्याने या जातीय राजकारणापायी होणारी निरपराध जीवांची फरपटही त्याला दिसत होती.
‘लाट’ कथासंग्रहातली ‘छप्पर’ या गोष्टीतली करीमची व्यक्तिरेखा ही हमीदच्या भूमिकेच्या संदर्भात फारच अन्वर्थक वाटते. घरात बहिणीला टी.बी. झाला म्हणून शहरातून आलेला भाऊ, करीम, अस्वस्थ होतो. तिला वेगळे ठेवा, तिचे उष्टे कोणी खाऊ नका असे सर्वांना बजावतो. पण मागासपणामुळे, मायेपोटी ते पाळले जात नाही. घरातली एकेक करीत करीत करीम व आई सोडून सगळी माणसे टी.बी. होऊन मरतात. करीम वेडा व्हायची पाळी येते. तो म्हणतो, ‘या काळोखाने सगळ्यांना खाल्ले. हे छप्परच उडवले पाहिजे. त्याशिवाय हा रोग घराबाहेर जाणार नाही.’ त्याची आई म्हणते, ‘अरे, वाडवडिलांनी बांधलेलं छप्पर का पाडतोस? त्यापेक्षा घरात सुधारणा कर...’
हमीदची सुरुवातीच्या काळातरी धडक ही करीमसारखीच होती. सद्हेतूने पण छप्पर उडवायची भाषा तो करीत होता. करीमची गोष्ट लिहिणारा कलावंत हमीद त्या आईची बाजू समजू शकत होता. पण समाजसुधारक हमीद काही मर्यादा ओलांडू शकला नाही.
...
... यावर कोणी म्हणेल की, ‘वैचारिक मांडणीचे काम हमीदने केले. चळवळीची किंवा संघटनेची बांधणी करण्याचे काम दुसऱ्या कोणी करावे.’ हे काम कोणी केले तर उत्तमच. पण तसे सहसा होत नाही. जो एखाद्या चळवळीचा प्रवर्तक असतो, त्याची आपल्या समाजात अतिशय खडतर अवस्था असते. त्याला अभ्यास करून, ग्रंथालय पालथे घालून ग्रंथनिर्मितीही करावी लागते आणि चळवळीतल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हेव्यादाव्यांना, कटकटींना तोंड देऊन सर्वांचा मेळ घालावा लागतो. फुले व आंबेडकरांनी हे केले. तेव्हा डोळस माणसाला अपयशाला अपयश म्हणूनच पुढे जावं लागतं.
***
अवचटांच्या मूळ पुस्तकातील मजकूर इथे दोन भागांत लेखाच्या स्वरूपात प्रसिद्ध केलाय. पुस्तकात दलवाईंचं आजारपण आणि नंतर मृत्यू इथपर्यंत अवचट येऊन थांबतात. आपण ब्लॉगच्या मर्यादेत अवचटांचे दलवाईंसोबतचे व्यक्तिगत अनुभव-आकलन आणि दलवाईंच्या सामाजिक भूमिकेचा-साहित्याचा त्यांचा अंदाज एवढाच भाग इथे संपादित करून कुठली लिंक तुटणार नाही याची शक्य तेवढी काळजी घेऊन दिला आहे.
मूळ पुस्तक पुण्यात टिळक रोडवर नीलकंठ प्रकाशनाच्या दुकानात पन्नास रुपयांना मिळतं.